पंतप्रधान उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले २२०० रुपयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:47 PM2018-04-02T23:47:40+5:302018-04-02T23:47:40+5:30

वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.

Prime Minister gave away Ujjwala gas connection to 2200 rupees | पंतप्रधान उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले २२०० रुपयात

पंतप्रधान उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले २२०० रुपयात

Next
ठळक मुद्देलाभार्थी महिलांची ‘लोकमत’जवळ कैफियत : गॅस भरून देण्यासाठीही मागतात १७०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. कोरपना तालुक्यात एका गॅस एजन्सीने आदिवासी महिलांकडून तब्बल २२०० रुपये घेऊन या योजनेत कनेक्शन दिले. इतकेच नव्हे, तर सिलिंडर संपल्यानंतर गॅस एजन्सीकडून पुन्हा १७०० रुपये मागितले जात आहेत. मग ही योजना कशासाठी, अशी कैफियत कोरपना तालुक्यातील रायपूर येथील लाभार्थी महिलांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालय गाठून मांडली.
गडचांदूर येथील मिताशा इंडेन गॅस एजंसीचे प्रतिनिधी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांची यादी घेऊन गावात आले होते. त्या यादीत नावे असणाऱ्यांनी २२०० रुपये जमा करा आणि योजनेतून गॅस कनेक्शन घ्या, असे सांगितले. उसणवारी घेऊन रक्कम जमा केली व गॅस कनेक्शन घेतले. रकमेची पावती दिली नाही. असाच प्रकार इतरही गावात घडला. गॅस कनेक्शनचे कार्ड दिले.पण त्यावर ग्राहक क्रमांकच नाही. महिना दोन महिन्यांनी सिलिंडर संपले असता सदर गॅस एजन्सीना कळविले. मात्र पुन्हा १७०० रुपये जमा करावे लागणार असे सांगितले. योजनेच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गडचांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना ही बाब सांगितली. त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली असता एसडीओंना गॅस एजन्सीवर कारवाईचे आदेशही दिले. मात्र समस्या सुटली नाही, अशी व्यथाही यावेळी रायपूर येथील लाभार्थी महिलांनी सांगितली.

कोरपना तालुक्यातील रायपूर, शिवापूर, गोविंदपूर, कोथोड(बु.) व कोथोड (खुर्द) ही सर्व गावे शंभर टक्के आदिवासी गावे आहेत. या गावातील महिलांकडून मिताश गॅस एजन्सीने प्रत्येकी २२०० रुपये घेऊन पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन दिले. आता सिलिंडर संपले. ते भरून देण्यासाठी पुन्हा १७०० रुपये मागत आहे. याबाबत एजंसी मालकाशी संपर्क केला तर फोन लागत नाही. येत्या ९ एप्रिलपर्यंत या महिलांना सिलिंडर भरून मिळाले नाही, तर सिलिंडर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.
- अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, अध्यक्ष, श्रमिक एल्गार.

लाभार्थ्यांच्या नावांची यादी एजंसीने गावात पाठविली. गॅस सोडविण्यासाठी २२०० रुपये मागितले. उसणवारी करून रक्कम जमा केली. याची पावतीही दिली नाही. त्यांनी कनेक्शन आॅनलाईनसुद्धा करून दिले नाही. गॅस संपल्यानंतर ते भरून द्या म्हटले, तर पुन्हा १७०० रुपये मागितले. यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
- कल्पना प्रकाश आत्राम, लाभार्थी, रायपूर. ता. कोरपना.

याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे. तक्रारीवरून शहानिशा करण्यासाठी आम्ही पुरवठा विभागाला माहिती दिली आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करणार आहे.
- विनोद रोकडे, ठाणेदार, गडचांदूर

Web Title: Prime Minister gave away Ujjwala gas connection to 2200 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.