विजेअभावी ई-लर्निंग संच पडले धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:06 AM2018-01-22T00:06:52+5:302018-01-22T00:07:16+5:30

शासनाने शाळा डिजिटल करण्यासाठी गतवर्षी शाळांना ई-लर्निंग संच पुरविले. या संचामध्ये काही शाळांना मोठ्या सिक्रनचा पडदा तर काही शाळांना स्मार्ट टीव्ही व त्यासाठी इतर साहित्य देण्यात आले.

The power failure e-learning set fell in the dust | विजेअभावी ई-लर्निंग संच पडले धूळखात

विजेअभावी ई-लर्निंग संच पडले धूळखात

googlenewsNext
ठळक मुद्देसीमेवरील इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेची स्थिती : महाराष्ट्राच्या वीज सेवेपासून गाव वंचित

संघरक्षित तावाडे।
आॅनलाईन लोकमत
जिवती : शासनाने शाळा डिजिटल करण्यासाठी गतवर्षी शाळांना ई-लर्निंग संच पुरविले. या संचामध्ये काही शाळांना मोठ्या सिक्रनचा पडदा तर काही शाळांना स्मार्ट टीव्ही व त्यासाठी इतर साहित्य देण्यात आले. यामाध्यमातून विद्यार्थी ई-लर्निंगचे धडे घेत, दृक, श्राव्य साधणाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल, असा शासनाचा हेतू होता. मात्र महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील इंदिरानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ई-लर्निंग शिक्षणाला अपवाद ठरत आहे.
इंदिरानगर गावात महाराष्ट्र राज्याकडून विद्युत पुरवठा झालेला नाही. इंदिरानगर हे गाव तसे दोन्ही राज्यात येते. या गावाला महाराष्ट्रासोबत तेलंगणाच्याही सुविधा मिळतात. येथे ५५ घरांची वस्ती असून महाराष्ट्राची जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत एक ते पाच वर्ग असून ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुका मुख्यालयापासून शाळा लांब अंतरावर असली तरी येथील शिक्षक दररोज शाळेत हजर राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
गतवर्षी मे महिन्यात विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे मिळावे, या हेतूने जिल्हा परिषदेकडून संच देण्यात आले. मात्र गेल्या नऊ महिन्यापासून शाळेला विजेची प्रतीक्षा करावी लागत आहे. भिंतीला पडद्याची स्क्रिन लावून आहे. सर्व सेट तयार आहे. पण गावातच वीज नाही, त्यामुळे ई-लर्निंगचे संच कुचकामी ठरत आहे. दोन वर्षांपासून महाराष्ट्राने केवळ खांब उभे केले आहेत. पण विजेचा पुरवठा झाला नाही. तर दुसरीकडे गावात तेलंगणाची वीज आहे. पण महाराष्ट्राची शाळा असल्याने वीज देण्यास त्यांनी नकार दिल्याचे शिक्षकांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने गावात विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी शिक्षक व पालकांनी केली आहे.
सीमावादात अडकली वीज सेवा
इंदिरानगर हे गाव तेलंगणा व महाराष्ट्र राज्यात असून वादग्रस्त १४ गावापैकी एक गाव आहे. येथे दोन्ही राज्याच्या सुविधा असून गेल्या अनेक वर्षांपासून येथे तेलंगणाची वीज सेवा सुरू आहे. दोन वर्षापुर्वी महाराष्टÑ सरकारने येथे खांब उभे केले. मात्र वीज पुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
एकाच खोलीत भरतात पाच वर्ग
इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्ग असले तरी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी केवळ एकच वर्गखोली आहे. वाढीव खोलीसंदर्भात येथील शिक्षक, केंद्रप्रमुख पाठपुरावा करीत आहेत. पण शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

शाळेला वीज मिटर देण्यासंदर्भात आपण वरिष्ठ अधिकारी व वीज कंपनीच्या अधिकाºयांशी वारंवार बोललो आहे. पण गावात वीज नसल्याने ई-लर्निंग संच बंद आहे. वीज कंपनीने याची दखल घेऊन वीज पुरवठा सुरू केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे देता येईल.
- ए. बी. चव्हाण, शिक्षक, इंदिरानगर.

Web Title: The power failure e-learning set fell in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.