लाईफलाईन एक्स्प्रेस २१ दिवस सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:27 PM2017-11-29T23:27:57+5:302017-11-29T23:28:19+5:30

राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या ‘लाईफलाईन एक्स्प्रेस’चा सोमवारी शुभारंभ केला.

Lifeline Express for 21 days | लाईफलाईन एक्स्प्रेस २१ दिवस सेवेत

लाईफलाईन एक्स्प्रेस २१ दिवस सेवेत

googlenewsNext
ठळक मुद्देलाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन : तज्ज्ञ डॉक्टरांकडून रूग्णांची आरोग्य तपासणी

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या ‘लाईफलाईन एक्स्प्रेस’चा सोमवारी शुभारंभ केला. २७ नोव्हेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत बल्लारपूर येथे भारतीय रेल्वेच्या पुढाकाराने महेंद्र फायनान्सच्या सौजन्याने जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. कॅन्सर, कुटुंब नियोजन, डोळे, कान या संदर्भातील आजार तसेच दंतचिकित्सा, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे परीक्षण आदींवर या सात रेल्वे डब्यांच्या लाईफलाईन एक्स्प्रेसमध्ये उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वेच्या या लाईफलाईन एक्सप्रेसचे आगमन झाले. गेल्या २६ वर्षांपासून भारतीय रेल्वे, महेंद्र फायनान्स व इन्पॅक्ट इंडिया फाँऊडेशन यांच्यामार्फत दूर्गम भागातील जनतेला या आरोग्य एक्स्प्रेसद्वारे सेवा दिली जाते. देशभरातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला अधिकचे आरक्षित रेल्वे प्लॅटफार्म आहे, अशा ठिकाणी स्थानिक लोकांच्या प्रतिसादानुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूच्या मदतीने या एक्स्प्रेसमध्ये आरोग्य सेवा दिली जाते.
यात प्रामुख्याने मोती बिंदूची शस्त्रक्रीया, कानाच्या छोट्या शस्त्रक्रीया, चष्म्याचे वाटप, मशीनचे वाटप, फाटलेल्या ओठांवरच्या शस्त्रक्रीया, कर्करोगावरची तपासणी व त्या संदर्भातील आवश्यक शस्त्रक्रीया या एक्स्प्रेसमध्ये केली जाते. या ठिकाणी मुंबईच्या टाटा ट्रस्ट रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असते. तसेच गरजेनुसार स्थानिक डॉक्टरांची मदत घेतली जाते. कॅन्सरसारख्या आजारामध्ये भारतातील सर्व कॅन्सर रुग्णालयातल्या तज्ञांची गरजेनुसार मदत तसेच क्लीस्ट शस्त्रक्रीयांसाठी संबंधीत रुग्णाला अन्यत्र हलविण्याबाबत मार्गदर्शन केले जाते.
जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य तपासणी मोहीमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. सोमवारी या संदर्भातील औपचारिक उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी आ.नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, नगराध्यक्ष हरीष शर्मा, सुशिलसिंग, विनय देशपांडे, योगेश कुळकर्णी, अनिलप्रेम सागर दरशे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी टोंगे आदी उपस्थित होते.
सात डब्यांची रेल्वे
या एक्स्प्रेसला सात रेल्वे डब्बे असून यामध्ये पहिला कोच स्वंयपाकासाठी राखीव आहे. दुसरा कोच डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी राखीव आहे. तिसऱ्या व चौथ्या कोचमध्ये अद्ययावत शस्त्रक्रीया रुम आहे. पाचवा कॅन्सर डिटेक्शन कोच आहे. सहावा कुटूंब नियोजन कोच तर सातवा दंत चिकित्सेसाठी राखीव कोच ठेवला आहे. २० जणांची तज्ज्ञ चमू या ठिकाणी काम करीत असून यामध्ये तज्ञ डॉक्टरांचाही समावेश आहे. सकाळी ९ ते सांयकाळी ५ पर्यंत या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. बल्लारपूर येथील बचत भवनाजवळून प्रवेशासाठी जागा असून याच ठिकाणी रुग्ण नोंदणी कक्ष उभारले आहे.

Web Title: Lifeline Express for 21 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.