भीमशक्तीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
By Admin | Updated: February 29, 2016 00:39 IST2016-02-29T00:39:16+5:302016-02-29T00:39:16+5:30
सामान्य जनतेच्या ज्वलंत समस्या घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भीमशक्ती जिल्हा चंद्रपूरच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

भीमशक्तीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
चंद्रपूर : सामान्य जनतेच्या ज्वलंत समस्या घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भीमशक्ती जिल्हा चंद्रपूरच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा बाबुपेठ येथून जिल्हा अध्यक्ष एन.डी. पिंपळे व अॅड. एम.पी. तेलंग, श्यामराव खंडारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे व शिक्षणात समानता निर्माण करावी, मान्यताप्राप्त शाळांना अनुदान देण्यात यावे, बीपीएलधारकांना वीज वितरण कंपनीद्वारे १०० युनिटपर्यंत ८७ पैसे प्रति युनीट दर निर्धारित करून त्याची अंमलबजावणी करावी, कंत्राटी पद्धती बंद करून कामगारांना स्थायी करण्यात यावे, बीपीएल कुटुंबास शासकीय योजनेतून मिळालेल्या घरकुलांचा गृहकर कमी करण्यात यावा, एस.टी,एन.टी., ओबीसी प्रवर्गातील बीपीएल कुटुंबांना घरकूल मंजूर करावे, मंजूर असलेल्या लेआऊटवरील झोपड्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे, डॉ. आंबेडकर वॉर्डाच्या जागेचा सर्व्हे करून लेआऊट मंजूर करण्यात यावा. आदी मागण्यांसाठी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
भीमशक्तीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना भेटून त्यांच्या मार्फतीने मागण्याचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठविण्याचे व स्थानिक समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी शिष्टमंडळास दिले.
शिष्टमंडळात एन.डी. पिंपळे, अॅड. एम.पी. तेलंग, सुभाष खाडे, शामराव खंडारे यांचा समावेश होता. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संजय राऊत, प्रदीप केवटे, पियुश धुपे, गोपाल बरिया, प्रशांत मावलीकर, अमीत ताकसांडे, चरणदास दुर्गे, महेश उईके, प्रवीण ठाकूर, प्रदीप नरवाडे, दयाल शेंडे यांनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)