छत्तीसगढच्या पोलीसांनी खामगावातून चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत!

By अनिल गवई | Published: April 13, 2024 02:25 PM2024-04-13T14:25:55+5:302024-04-13T14:27:21+5:30

सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ, चोरीचे सोने गाळून तयार करून दिले बिस्कीट.

police of chhattisgarh seized stolen goods from khamgaon in buldhana | छत्तीसगढच्या पोलीसांनी खामगावातून चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत!

छत्तीसगढच्या पोलीसांनी खामगावातून चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत!

अनिल गवई, खामगाव: चोरीचा उलगडा करताना छत्तीसगढ राज्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खामगावातून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. अटकेतील चोरट्याने दिलेल्या माहितीच्या आधारे छत्तीसगढ पोलीसांनी शुक्रवारी उशीरारात्री ही कारवाई केली. त्यामुळे खामगाव शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये एकम खळबळ माजली असून, चोरट्याने चोरीचे सोने गाळून संबंधित गलाई करणार्याने बिस्कीट करून दिल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील अंत्रज हे मुळगाव असलेल्या एका चोरट्याने छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे चोरी केली. या चोरी प्रकरणाचा तपास करताना छत्तीगढ पोलीसांनी लहू दादाराव पवार नामक चोरट्याला अटक केली. त्याने चोरीचे सोने खामगाव शहरातील एका व्यावसायिकाकडे गाळून बिस्कीट तयार केल्याचा जबाब छत्तीसगढ पोलीसांना दिला. या माहितीच्या आधारे छत्तीसगढ पोलीसांचे पाच ते सहा जणांचे एक पथक संबंधित चोरट्यासह खामगाव शहरात धडकले. 

शुक्रवारी रात्री छत्तीसगढ पोलीसांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला नोंद केली. त्यानंतर चोरट्याला सोबत घेऊन अग्रसेन चौकाजवळील एका गलाई करणार्याकडून ५० ते ६० ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. या गंभीर बाबीला शहर पोलीस स्टेशनमधील सुत्रांनी दुजोरा दिला. दरम्यान, छत्तीसगढ पोलीसांच्या या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ माजली असून, खामगाव शहरातील सराफा व्यावसायिक चोरीचे सोने खरेदी करीत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर चोरीचे सोने गाळून एका गलाई करणार्याने बिस्कीट आणि इतर वस्तू तयार करून दिल्याचीही धक्कादायक बाब या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याची चर्चा पोलीस वतुर्ळात होत आहे.

Web Title: police of chhattisgarh seized stolen goods from khamgaon in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.