आता ‘शिवशाही’तही आवडेल तेथे प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:49 AM2017-12-09T01:49:17+5:302017-12-09T01:51:06+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही ही वातानुकूलीत बस सेवा महाराष्ट्रभर विविध आगारांमधून सुरू केली आहे. महामंडळातर्फे राबविण्यात येणार्‍या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’  या  योजनेंतर्गत पासधारकांनासुद्धा आता शिवशाही या बससेवेचा लाभ घेता येणार आहे. ही पास शिवशाही आसनी बससेवेसाठी ग्राह्य असून, जिल्ह्यात या पासचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

Now you can stay in Shivshahi too! | आता ‘शिवशाही’तही आवडेल तेथे प्रवास!

आता ‘शिवशाही’तही आवडेल तेथे प्रवास!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात पासचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू शिवशाही आसनी बससेवेसाठी ग्राह्य

ब्रह्मनंद जाधव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही ही वातानुकूलीत बस सेवा महाराष्ट्रभर विविध आगारांमधून सुरू केली आहे. महामंडळातर्फे राबविण्यात येणार्‍या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’  या  योजनेंतर्गत पासधारकांनासुद्धा आता शिवशाही या बससेवेचा लाभ घेता येणार आहे. ही पास शिवशाही आसनी बससेवेसाठी ग्राह्य असून, जिल्ह्यात या पासचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 
नवतंत्रज्ञानाच्या युगात एसटीनेही कात टाकली असून, प्रवाशांना दज्रेदार सुविधा देण्यासाठी वातानुकूलीत शिवशाही ही बस महाराष्ट्राच्या अनेक आगारांमधून सुरू करण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून वायफाय, सीसी टीव्ही आणि स्लीपर कोचच्या सुविधायुक्त व वातानुकूलीत शिवशाही बससेवा प्रवाशांना किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
प्रवाशांच्या सुविधेसाठी परिवहन महामंडळाकडून ‘आवडेल तेथे   कोठेही प्रवास’ ही योजना राबविण्यात येते. यामध्ये सात किंवा चार  दिवसांची पास काढून प्रवाशांना प्रवास करता येतो. आता शिवशाही या बससेवेमध्ये ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेंतर्गत प्रवाशांना पास देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात ५ डिसेंबरपासून सुरू झाली असून, सात दिवसांची पास व चार दिवसांची पास अशा दोन प्रकारच्या पास सेवेचा लाभ प्रवाशांना देण्यात येत आहे.  ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेंतर्गत शिवशाही बससाठी देण्यात येणारी पास ही शिवशाही आसनी बससाठीच ग्राह्य ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शिवशाही शयन बससेवेतून या पासवर प्रवास करता येणार नाही, तसेच नवीन पासेस उपलब्ध होईपर्यंत सध्या वापरात असलेल्या निमआराम बससेवेच्या पासच्या मूल्यात रबरी शिक्क्याने मूल्य परिवर्तन करून ही पास दिल्या जाणार आहे. ही पास साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, मिडीबस, निमआराम या निम्न दर्जाच्या बससेवेसाठी वैध राहील, तसेच आंतरराज्य मार्गावरील पास राज्यातसुद्धा वैध राहील.  गर्दीचा हंगाम व कमी गर्दीचा हंगाम याचे मूल्य वेगवेगळे ठेवण्यात आले असून, १५ ऑक्टोबर ते १४ जून हा गर्दीचा हंगाम समजला जातो. तर १५ जून ते १४ ऑक्टोबर कमी गर्दीचा हंगाम समजला जातो. त्यानुसार पासचे मूल्य ठेवण्यात आले आहे. 

पाच रुपये अपघात सहाय्यता निधी
शिवशाही बसच्या पासचे मूल्याव्यतिरिक्त प्रतिपास ५ रुपये अपघात सहाय्यता निधीची आकारणी करण्यात येणार आहे. मॅन्युअल पासांवर अपघात सहाय्यता निधी ५ रुपये असा रबरी शिक्का ठळकपणे उमटविण्यात येणार आहे. मुलांच्या पासचे दर हे पाच वर्षांपेक्षा जास्त व १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत. 

सात दिवसांच्या पासचे मूल्य
गर्दी हंगामात प्रौढ प्रवाशांसाठी १७८0 व मुलांसाठी ८९0 रुपये. कमी गर्दी हंगामात प्रौढसाठी १६४५ व मुलांसाठी ८२५ रुपये आहे. आंतरराज्य मार्गासाठी गर्दी हंगामात प्रौढ १९२0 व मुले ९६0 रुपये. तर कमी गर्दी हंगामात प्रौढ १७८0 व मुलांसाठी ८९0 रुपये आहे. 

चार दिवसांच्या पासचे मूल्य 
गर्दी हंगामात प्रौढ प्रवाशांसाठी १0२0 व मुलांसाठी ५१0 रुपये. कमी गर्दी हंगामात ९४0 व मुलांसाठी ४७0 रुपये आहे. आंतरराज्य मार्गगर्दी हंगामात प्रौढ ११00 व मुले ५५0 रुपये. तर कमी गर्दी हंगामात प्रौढ १0२0 व मुलांसाठी ५१0 रुपये आहे. 

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’  या योजनेंतर्गत शिवशाही बससेवेसाठी पास उपलब्ध करून देण्याच्या सूचना परिवहन महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत. त्यानुसार शिवशाही बसच्या प्रवासासाठी पासचा लाभ देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. 
- ए.यू. कच्छवे,
विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा. 

Web Title: Now you can stay in Shivshahi too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.