यंदा ‘पाणीबाणी’ नाही; बुलडाणा शहरवासीयांना ऑगस्टपर्यंत दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:47 AM2018-03-31T00:47:59+5:302018-03-31T00:47:59+5:30

बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. 

no drinking water problem to Buldana city Residents, relief till August! | यंदा ‘पाणीबाणी’ नाही; बुलडाणा शहरवासीयांना ऑगस्टपर्यंत दिलासा!

यंदा ‘पाणीबाणी’ नाही; बुलडाणा शहरवासीयांना ऑगस्टपर्यंत दिलासा!

Next
ठळक मुद्देयेळगाव धरणात पुरेसा जलसाठा 

हर्षनंदन वाघ । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. 
यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे अनेक ठिकाणी जलसंकट ओढवले आहे. तथापि, शहरवासीयांना मात्र या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेद्वारे १ लाख लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाइपलाइन तर काही भागात थ्री व्हॉल्व्ह सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 
यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभात शहर परिसरात चवथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत काही वर्षात कमी पर्जन्यमानामुळे येळगाव धरणात जलसाठा कमी प्रमाणात होता. परिणामी नागरिकांना उन्हाळ्याच्या शेवटी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते; मात्र यावेळी मागील दोन वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. धरणात ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट नसले तरी जनतेने पाण्याचे नियोजन व काटकसरीने वापरण्याची गरज आहे.  

येळगाव धरणात ५.१0 दलघमी जलसाठा
बुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात पाणीसाठय़ाची क्षमता १२.४0 दलघमी आहे. यावर्षी पावसाळय़ाच्या शेवटी धरण जवळपास १00 टक्के भरले होते. सध्या धरणात ५.१0 दलघमी जलसाठा असून, ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरवासीयांसह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यापूर्वीच पावसाळा सुरू होणार असल्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. 

‘अवैध नळधारकांवर कारवाई व्हावी!’
शहर परिसरात अनेक भागात अवैध नळधारक आहेत. अशा नळधारकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पालिकेद्वारे पाणीटंचाई काळात किंवा उन्हाळ्यात दिले जाते; मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या कारवाईकडे कोणीही लक्ष देत नाही. परिणामी दरवर्षी अवैध नळधारकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. पालिकेने आताच अवैध नळधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. 

शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन नळाला तोट्या लावाव्यात तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी. 
- करणकुमार चव्हाण
मुख्याधिकारी, नगरपालिका, बुलडाणा

Web Title: no drinking water problem to Buldana city Residents, relief till August!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.