मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाला ‘रेफर टू’ चे ग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:23 AM2017-11-15T01:23:36+5:302017-11-15T01:23:47+5:30

विदर्भ प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूरच्या शासकीय उपजिल्हा  रुग्णालयाला रेफर टू बुलडाणा, अकोलाचे ग्रहण लागले आहे. सुविधाअभावी  कोट्यवधीची वास्तु शोभेची वस्तु ठरताना दिसत असून, परिसरातील हजारो  रुग्णांची त्यामुळे आबाळ होत आहे. 

Malkapur Subdivision Hospital receives 'Refer to Two'! | मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाला ‘रेफर टू’ चे ग्रहण!

मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाला ‘रेफर टू’ चे ग्रहण!

googlenewsNext
ठळक मुद्देपाच वर्षांपासून मोठय़ा शस्त्रक्रिया नाही 

हनुमान जगताप। 
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मोठा अपघात झाला की सुविधा मिळत नाहीत, महिलांचे सिझेरीयन  करण्याचे नाव नाही.  येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील पाच वर्षांपासून मोठय़ा  शस्त्रक्रिया झाल्या नसल्याचे वास्तव आहे.  उपाय काय तर बाहेर हलवा, अशा  पद्धतीने विदर्भ प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूरच्या शासकीय उपजिल्हा  रुग्णालयाला रेफर टू बुलडाणा, अकोलाचे ग्रहण लागले आहे. सुविधाअभावी  कोट्यवधीची वास्तु शोभेची वस्तु ठरताना दिसत असून, परिसरातील हजारो  रुग्णांची त्यामुळे आबाळ होत आहे. 
मलकापूर व परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी येथे उपजिल्हा  रुग्णालयाची प्रशस्त उभारणी शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. प्रामुख्याने  मलकापूर व नांदुरा तालुक्यातील लोकांची सोय त्यावेळी झाली. त्यातल्या त्यात हा  परिसर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने वारंवार होणार्‍या अपघातात जखमींना  आधार म्हणून त्याकडे बघितल्या जाते.
सुरुवातीच्या काळात ठीकठाक चाललेल्या या रुग्णालयात मागील पाच वर्षांपासून  रुग्णांची परवड होताना दिसत आहे. आवश्यक त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव,  औषध साठय़ात वारंवार येणारा तुटवडा, शस्त्रक्रिया विभागात साहित्यांची कमतर ता, यासह विविध अडचणीमुळे प्राथमिक उपचार वगळला तर मोठय़ा शस्त्रक्रिया  होत नसल्याची ओरड मोठय़ा प्रमाणात आता होऊ लागली आहे.
मोठय़ा अपघातात कुणी जखमी झाल्यास किंवा गरोदर महिलांचे सिझेरियन  करावयाचे झाल्यास स्थानीय प्रशासनाच्यावतीने ‘रेफर टू अकोला, बुलडाणा’ असे  पर्याय ठेवले जातात. परिणामी, नागरिकांना नाइलाजास्तव खासगी दवाखान्यात  किंवा अकोला, जळगाव खान्देश किंवा इतरत्र धाव घ्यावी लागत आहे. त्यात लाखो  रुपयांची झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. कारण सुविधांअभावी बुलडाणा  जिल्ह्यात सुसज्ज मानली जाणारी मलकापूरची वास्तु शोभेची वास्तु ठरत आहे.
यासंबंधी प्रस्तुत प्रतिनिधीने उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली असता, मागील  अनेक दिवसांपासून संपलेला औषधसाठा एवढय़ात उपलब्ध झाला, तोही कमी  प्रमाणात, अशी माहिती मिळाली. प्रामुख्याने साथीच्या आजारात आवश्यक  खोकल्याचे औषध बर्‍याच दिवसांपासून उपलब्ध नाही. इंजेक्शनसाठी  सिरीजदेखील बाहेरून आणावी लागते. असे अनेक प्रकार समोर आले आहेत.  त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना स्थानीय लोकप्रतिनिधी मात्र मूग  गिळून बसले आहेत. दुसरीकडे नागरिकांची मात्र सुविधांअसावी आरोग्याविषयी  हेळसांड होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मलकापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेला आहे. या मार्गावरही  शहरालगतच्या पट्टय़ात नेहमी मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन  स्थितीत येथील रुग्णालयामध्ये दर्जेदार सुविधा, रक्तपुरवठा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची  सातत्याने गरज भासते. 

‘त्या’ स्मृतींना उजाळा
उपजिल्हा रूग्णालयात सात वर्षांपूर्वी येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.अरविंद  कोलते यांनी स्वत: सुमारे ३00 वर महिलांच्या गरोदरपणात शस्त्रक्रियाच केल्या  नाही, तर त्यांच्या प्रसूति सुखरूप केल्याची नोंद आहे. आता तशी परिस्थिती नाही.  त्यामुळे ‘त्या’ स्मृतींना उजाळा मिळत असून, स्त्री रोग तज्ज्ञासोबत सुविधा उपलब्ध  झाल्यास नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळता येईल.

मोठय़ा शस्त्रक्रिया व्हाव्यात, असे आम्हालाही वाटते; मात्र आवश्यक ते साहित्य  तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, त्यामुळे अडचणी येत आहेत. त्याबाबतचा पाठपुरावा आम्ही  वरिष्ठांकडे केला आहे. वारंवार संपर्कात आहोत. डिसेंबर महिन्यापर्यंत त्यात  आम्हाला यश येईल, असा विश्‍वास आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.
- डॉ.अमोल नाफडे, 
वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय मलकापूर.

Web Title: Malkapur Subdivision Hospital receives 'Refer to Two'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.