लोणार सरोवराच्या गाळात वातावरणीतील बदलाच्या नोंदी, प्रदूषणामुळे वातावरणीय बदलांचा वेग वाढतोय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 09:50 AM2018-02-08T09:50:42+5:302018-02-08T09:50:49+5:30

निसर्ग बिघडलेल्या गोष्टी त्याच स्तरावर पुन्हा सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतो; पण मानवी हस्तक्षेपामुळे या चक्राला फटका बसत आहे.

climate change is increasing due to pollution! | लोणार सरोवराच्या गाळात वातावरणीतील बदलाच्या नोंदी, प्रदूषणामुळे वातावरणीय बदलांचा वेग वाढतोय!

लोणार सरोवराच्या गाळात वातावरणीतील बदलाच्या नोंदी, प्रदूषणामुळे वातावरणीय बदलांचा वेग वाढतोय!

Next

- निलेश जोशी

बुलडाणा : जागतिक स्तरावर वातावरणामुळे सध्या अनेक बदल होत असून, कमी-अधिक पावसाळा, उन्हाळ्याची तीव्र दाहकता अशा स्वरुपात त्याचे दृष्यपरिणाम आपणाला वर्तमानात दिसत आहेत. निसर्गाने भरभरून दिलेल्या संपत्तीचा अवाजवी वापर केला जात आहे. त्यातून अनेक समस्या जन्मास येत आहेत. निसर्ग बिघडलेल्या गोष्टी त्याच स्तरावर पुन्हा सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतो; पण मानवी हस्तक्षेपामुळे या चक्राला फटका बसत आहे. लोणार सरोवरातील सेडिमेंट कोअरच्या (गाळाचा थर) माध्यमातून त्याचे पुरावे आता समोर येत आहेत.
त्यामुळे लोणार सरोवर हे एक प्रकारे भारत आणि जागतिक स्तरावरील वातावरणाच्या बदलांचे संकेत देणारे ठिकाण वैज्ञानिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वातावरणीय बदल आणि ऊर्जेचे नवीन पर्याय या विषयावर दोन ते ४ फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद येथे नुकतीच तज्ज्ञांची कार्यशाळा झाली. त्यानुषंगाने लोणार सरोवर आणि वातावरणीय बदलासंदर्भात भारतीय भू-चुंबकीय संस्थेचे डॉ. नाथानी बसवय्या यांनी वातावरणातील बदलांच्या अभ्यासासाठी लोणार सरोवराची उपयोगीता हा मुद्दा अधोरेखीत केला.

लोणार सरोवर हे मान्सूनच्या सेंट्रल झोनमध्ये येते, त्यामुळे त्याची उपयोगिता वैज्ञानिकांच्या दृष्टीने मोठी आहे. त्याच्या अभ्यासातून वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणात झालेले बदल ठळकपणे समोर आणता येण्यासारखे आहेत. प्रदूषणामुळे गेल्या ५० वर्षात वातावरणामध्ये मोठे बदल झालेले आहेत. हवेतील आर्द्रता कमी झाली. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. चुंबकीय स्थितीवरही प्रदूषणाचा परिणाम होत असल्याचे त्यांच्या संशोधनातून समोर येत आहे. त्याचा आधार हा लोणार सरोवरातून काढलेल्या सेडिमेंट कोअरमध्ये आहे. गाळाच्या या थरात गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास दडलेला आहे. त्यावर सध्या त्यांचे संशोधन सुरू आहे. या गाळाच्या थरात ग्लायसोसाईट हे क्रिस्टल आढळले आहेत.
दरम्यान, कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढत्या उत्सर्गामुळे वातावरणात बदल होत असून, हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वृक्षारोपण, वस्तूंचे रिसायकलींग आणि लोकसंख्या नियंत्रण या मुद्द्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे, त्यासाठी १०० टक्के प्रयत्न केल्यास सध्या वाढलेले कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण सुस्थितीत येण्यासाठी किमान २०० वर्षांचा काळ लागेल, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. औरंगाबाद येथे झालेल्या कार्यशाळेत प्रामुख्याने हे अनेक मुद्दे त्यात चर्चिल्या गेले होते. त्यात लोणार सरोवर आणि वातावरणीय बदल हा मुद्दा महत्त्वाचा होता.
 

नागरिकरणही समस्या
नागरिकरणही प्रदूषणाला कारणीभूत आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल राखणे गरजेचे होणार आहे. शहरी भागावर लोकसंख्येचा वाढता ताण कमी करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. आज प्लॅस्टिक आपण रिसायकल करतोय; पण थर्माकोल वेस्टचा रिसायकलिंगचा विचार केला गेलेला नाही. निसर्गचक्रात मानवी हस्तक्षेप सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी झाल्याचे पुरावे लोणार सरोवरात उभारण्यात आलेल्या पुरातन वास्तू तथा मंदिरावरून स्पष्ट होते. त्यांच्या कार्बनीक डेटिंगवरून दहा हजार वर्षांपूर्वी हा हस्तक्षेप झाल्याचे स्पष्ट होत आहे.

कोण आहेत डॉ. बसवय्या
डॉ. नाथानी बसवय्या हे इंडिन इंस्टीट्यूट ऑफ जिओ मॅग्नेटीझमचे प्रमुख वैज्ञानिक असून, लोणार सरोवरावर १९९८ पासून ते अभ्यास करत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणीय बदल होत आहेत, हे सर्व प्रथम अभ्यासपूर्ण मांडणाऱ्या जर्मनीमधील अलेक्झांडर हुंबोल्ट यांच्या नावाने दिली जाणारी जागतिक स्तरावरील शिष्यवृत्ती मिळविणारे व्यक्ती म्हणून डॉ. बसवय्या यांची ओळख आहे. २० वर्षांपासून लोणार सरोवरावर ते अभ्यास करीत आहेत. मान्सूनच्या सेंट्रल झोनमध्ये लोणार सरोवर आहे. पावसाळ्यात पाण्यासोबत लोणार सरोवरात माती वाहून जाते. त्यातून निर्माण झालेल्या गाळात जागतिक हवामान बदलाचा इतिहास नोंदवला गेला आहे, असे त्यांचे मत आहे. त्यानुषंगानेच लोणार सरोवरातून सेडिमेंट कोअर काढून त्याच्या अभ्यासातून वातावरणात होणाºया बदलावर त्यांचा अभ्यास आहे. भूतकाळात नागरी संस्कृतीवर आलेल्या संकटांचीही कल्पना या अभ्यासातून समोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

प्रदूषण रोखणे काळाची गरज
प्रदूषण रोखणे ही आज काळाची गरज बनली आहे. त्यासाठी प्रथमत: अर्थव्यवस्था मजबूत असणे गरजेचे आहे. राजकीय हस्तक्षेपही कमी असावा लागतो. निसर्गाचा गौण खजिना आपण अविरत वापरत आहोत. निसर्गाच्या बिघडलेल्या गोष्टी निसर्गत:च सुरळीत करण्याचे एक तंत्र निसर्गानेच विकसित केले आहे; परंतु मानवी हव्यासापोटी ते निसर्गाचे मॅकेनिझमच आज विस्कळीत होत आहे. त्यामुळेच नवीन ऊर्जास्रोतांची निर्मिती, उपलब्ध ऊर्जा वाचवणे आवश्यक आहे. त्यातून प्रदूषण रोखणे शक्य आहे. त्यासाठी सोलार एनर्जी हा एक चांगला पर्याय आहे; परंतु आज घडीला जागतिक स्तरावर भारत हा सौरऊर्जेचे साहित्य खरेदी करणारा केवळ एक ग्राहक आहे. त्याच्या निर्मितीमध्ये जपान आणि चीन जागतिक स्तरावर पुढारलेले आहेत. अशा अनेक बाबींचा उहापोह वातावरण बदलांच्या पाठीमागे आहे.

हुंबोल्ड यांनी केला प्रथम अभ्यास
जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये १७६९ मध्ये शाही घराण्यात जन्मलेल्या अलेक्झांडर हुंबोल्ड यांनी सर्वप्रथम वातावरणीय बदल प्रकाशझोतात आणले. पृथ्वीच्या भूचुंबकीय क्षेत्राचा अभ्यास सर्वप्रथम त्यांनी केला. प्रामुख्याने एक निसर्ग संशोधक ते होते. त्यांनी भूचुंबकीय क्षेत्रातील विज्ञानाचा एक प्रकारे पाया रचला. लॅटीन अमेरिकेत त्यांनी फिरून या विषयावर संशोधन केले होते. त्यांनी या क्षेत्रातील पायाभूत संकल्पना प्रथमत: मांडल्या.
 

Web Title: climate change is increasing due to pollution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.