बुलडाणा बनतोय ‘टँकर वाडा’; २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 03:19 PM2019-05-11T15:19:58+5:302019-05-11T15:25:00+5:30

बुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

Buldhana; Water supply through 211 tankers in 211 villages | बुलडाणा बनतोय ‘टँकर वाडा’; २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

बुलडाणा बनतोय ‘टँकर वाडा’; २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Next

- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे. दरम्यान, भूजल पातळी दोन मिटरने खालावली असतानाच प्रकल्पांमधील जलसाठ्यातही अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक राहला आहे. परिणामस्वरुप ‘पाणी हरपल; रान करपल’ अशी काहीसी स्थिती जिल्ह्याची झाली आहे.
शनिवारी आॅडीओ ब्रीजच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील निवडक सरपंच आणि ग्रामसेवकांसह अधिकारी वर्गाशी टंचाईच्या मुद्द्यावर संवाद साधणार असल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाईची माहिती घेतली असता ही बाब प्रकर्षाने समोर आली. अवघ्या ११ दिवसात टँकरची संख्या तब्बल ४५ ने वाढून २२१ वर पोहोचली आहे तर १७१ वरून तहाणेने व्याकूळ झालेल्या गावांची संघ्या २११ पोहोचली आहे. त्यावरून मे अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता कुठले स्वरुप धारण करेल याची कल्पना यावी.
वर्तमान स्थितीतच जिल्ह्यातील १२७२ आबाद गावांपैकी १७ टक्के अर्थात २११ गावांची तहान ही टँकरवर भागविल्या जात असून ५७४ गावांची भिस्त ही विहीर अधिग्रहणावर आहे. जिल्ह्यातील तब्बल ४५ टक्के गावांमध्ये विहीर अधिग्रहीत कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे मे महिन्या अखेर जिल्ह्यातील तब्बल ७२ टक्के गावांची तहाण ही अधिग्रहीत विहीरीवर अवलंबून राहणार आहे. येत्या काळात ९१६ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन यंत्रणेने केले असून टंचाई कृती आराखड्यात अनुषंगीक बाबी प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दीड दशकातील जिल्ह्यात पडलेला हा दुष्काळ तीव्र स्वरुपाचा असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी एक हजार १२३ गावात दोन हजार ६१७ उपाययोजा प्रस्तावीत असून त्यापैकी प्रत्यक्षात ६८५ गावात एक हजार १०२ उपाययोजना पूर्णत्वास गेल्या आहेत. यावर १९ कोटी ७४ लाख २४ हजार रुपयांचा आतापर्यंत खर्च झालेला आहे.
दुसरीकडे जिल्ह्याची भूजल पातळी ही जवळपास दोन मीटरने खालावली आहे. जिल्ह्याचा भूजल दुष्काळ निर्देशांकही उणे ११ च्या आसपास पोहोचला आहे. वरकरणी तो तुलनेने कमी असला तरी दहा वर्षाच्या सरासरीच्या आधारावर तो काढण्यात येत असतो. त्यामुळे मध्यंतरी अपघाव पद्धतीने पडलेल्या पावसामुळे हा निर्देशांक कमी दिसतो आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील टंचाईची स्थिती गंभीर बनत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये प्रत्यक्षात दुष्काळ जाहीर झालेला आहे.
५५ प्रकल्प कोरडे
जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची संख्या एकूण ९१ आहे. या पैकी ५५ लघु प्रकल्प आजच कोरडे पडलेले आहे तर मोठे व मध्यम प्रकल्पापैकी चार प्रकल्प मृत जलसाठ्यात गेले आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आजघडीला प्रत्यक्षात अवघा ४.४७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हा जलसाठाही किती दिवस पुरेल हा प्रश्नच आहे. परिणामी यंदा मान्सून वेळेत न आल्यास जून अखेरच टंचाईची दाहकता जिल्ह्यात भीषण स्वरुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Buldhana; Water supply through 211 tankers in 211 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.