ऐतिहासिक स्थळांच्या कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:18 PM2019-06-12T14:18:20+5:302019-06-12T14:18:37+5:30

ठेकेदाराकडे असलेले दीडशे कारागीर काम बंद करुन दहा दिवसापूर्वी गावाकडे निघून गेले. पर्यटन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विकास कामाला खीळ बसली.

'Break' to work on historic sites | ऐतिहासिक स्थळांच्या कामांना ‘ब्रेक’

ऐतिहासिक स्थळांच्या कामांना ‘ब्रेक’

Next

- काशिनाथ मेहेत्रे 
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा ऐतीहासीक शहराचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास व्हावा या हेतुने ३११ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजुर करण्यात आला. त्यापैकी साडेबारा कोटी रुपयांची कामे अकरा महिन्या पासून युध्द पातळीवर सुरु झाली. मात्र संबंधित ठेकेदाराला आजपर्यंत पैसे मिळाले नाही. त्यामुळे ठेकेदाराचे दीडशे कारागीर काम सोडून निघुन गेल्याने शहर विकास आराखड्यातील कामे रखडली आहेत.
सिंदखेड राजा विकास आराखडा आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुर करण्यात आला होता. या आराखड्यासाठी ३११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सतत पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाने साडेबारा कोटी व केंद्र शासनाने साडेबारा कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, खासदार जाधव आ. डॉ. खेडेकर व मान्यवरांच्या हस्ते कामाचा शुभारंभ देखील झाला. २० जुलै २०१८ रोजी ठेकेदाराला वर्क आॅर्डर देण्यात आली. ठेकेदाराने कर्नाटक राज्यातून कोदवा दगड आयात केला. लातुर, नांदेड, कर्नाटक राज्यातील दीडशे कुशल कारागीर आणले.
अकरा महिन्यापासून युध्दपातळीवर कामाला सुरवात देखील केली. लखोजीराव जाधवांचा राजवाडा, रंगमहाल, सावकार वाडा, नीळकंठेश्वर मंदीर व काळाकोट भुईकोट किल्लयातील कामाचा समावेश होता. अकरा महीने झाले तरीही शासनाने ठेकेदाराला पैसे दिले नाही.
नागपूर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे वेळोवेळी निधीची मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी व आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पर्यटन विभागाकडे निधीसाठी पाठपुरावा केला. परंतु आजपर्यंत निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नाईलाजाने ठेकेदाराकडे असलेले दीडशे कारागीर काम बंद करुन दहा दिवसापूर्वी गावाकडे निघून गेले. पर्यटन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विकास कामाला खीळ बसली. विकास आराखड्यातील निधी त्वरीत उपलब्ध करुन पर्यटनाला चालना मिळावी अशी मागणी पर्यटकांनी केली.
सिंदखेडराजा हे ऐतिहासिक शहर आहे. मोठ्या संख्येने पर्यटक शहराला भेट देतात. येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. पर्यटन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नागरिक व पर्यटक करीत आहेत.


निधी उपलब्ध न झाल्यामुळे व पाणीटंचाई असल्यामुळे कामे बंद पडली. निधी उपलब्ध होताच कामे सुरु करु.
-डॉ .विराग सोनटक्के
सहाय्यक संचालक
पुरातत्व विभाग, नागपूर

Web Title: 'Break' to work on historic sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.