Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 02:22 PM2018-09-10T14:22:31+5:302018-09-10T14:23:59+5:30

Bharat Bandh Update: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 10 सप्टेंबररोजी खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव, मलकापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

Bharat Bandh: Congress Workers Protest In khamgaon | Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका

Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका

Next

खामगाव - पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 10 सप्टेंबररोजी खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव, मलकापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. इंधन दरवाढीचा सर्वत्र भडका आंदोलनातून दिसून आला. खामगावात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात ‘दे धक्का’ आंदोलन वाहनं लोटत पेट्रोल पंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला गांधीगिरीच्या मार्गाने माल्यार्पण करून निषेध नोंदवण्यात आला. 

सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होऊन इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. या भाववाढीमुळे शेतकरी, शेतमजुर, व्यापारी व सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असुन जनतेच्या त्रासात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. या व अशा शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे जनता अधिकच त्रस्त झाली आहे. या सर्व प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने 10 सप्टेंबररोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला सर्वत्र प्रतिसाद मिळाला. खामगावात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा निषेध मोर्चा काढण्यात आला. 

एकीकडे जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत करायची व त्याच जनतेला इंधन दरवाढ करुन त्यांचे जगणे महाकठीण करायचे. या दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये सवलत देण्यास स्पष्ट नकार द्यायचा हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप दिलीपकुमार सानंदा यांनी केला. या मोर्चात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे सुद्धा सायकलवर सिलेंडर ठेवून सहभागी झाले होते. माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, अलकादेवी सानंदा, सरस्वतीताई खाचने यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील प्रमुख मार्गाने दुचाकी, कार, ऑटो लोटत  पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. 

मलकापूर बंदला उस्फुर्त प्रतिसाद

 इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मलकापूरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेस व्यापारी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. बुलढाण्यामध्ये रस्त्यावर रुटमार्च काढण्यात आला. मोदी सरकार हाय हाय, इंधन दरवाढ कमी झालीच पाहीजे,अशी कशी होत नाही घेतल्या शिवाय राहत नाही, मोदी सरकारचा निषेध असो अशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. बसस्थानक चौक,संत गाडगेबाबा चौक, हनुमान चौक, सिनेमा रोड, निमवाडी चौक, स्टेशन रोड, मुक्ताईनगर रोड, चारखंबा चौक, वल्ली चौक आदी मार्गावरून संचलन करत बंदचे आवाहन करण्यात आले. त्याला व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. रूटमार्चमध्ये डॉ. अरविंद कोलते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते संतोषराव रायपूरे, अॅड. साहेबराव मोरे, माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख, हाजी रशिदखाँ जमादार, अॅड. मजिद कुरेशी, राजेंद्र वाडेकर, राजू पाटील, तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शाहिद शेख, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, नगरसेवक बंडू चवरे, अनिल गांधी, डॉ. अनिल खर्चे, भारिप बमसचे अजय सावळे, अॅड. संजय वानखेडे, समाधान इंगळे, मनोहरराव पाटील, विनय काळे, अरूण गवात्रे, फिरोजखान आदिसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होते. मलकापूरात सर्वच व्यापारी बांधवांनी बंद पाळला, बसेस, खासगी वाहतूक, शाळा महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली.

जळगाव जामोदमध्ये कडकडीत बंद

पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात जळगाव जामोद तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. त्याला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. शहरांमधील मार्केट भाजी बाजार शाळा, महाविद्यालये पूर्ण बंद आहेत. पदाधिकारी व कार्यकर्ते शहरात फिरत असून भाजप शासनाविरुद्ध घोषणा देत आहेत. पेट्रोल डिझेल याची दरवाढ रद्द करा यासाठी पुकारलेल्या या बंदमध्ये तालुक्यातील पिंपळगाव काळे, खेर्डा या गावांनी शंभर टक्के बंद पाळला. खेर्डा येथे रास्ता रोको करण्यात आला. चार तालुक्यामधील इतर गावांमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी फिरत असून कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. 

शेगावात ठिकठिकाणी रास्तारोको

भारत बंदच्या समर्थनार्थ शेगावात मनसे पदाधिकारी  व कार्यकर्ते यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले. काँग्रेस  नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, शहराध्यक्ष  दिपक सलामपुरीया, नगरसेवक   शिवाजी बुरूंगले, माजी नगराध्यक्ष   शैलेंद्र पाटील , जिल्हा सरचिटणीस कैलासबापू  देशमुख, राजू पारखेडे, फिरोजखान, पवन पचेरवाल, चंद्रकांत  माने, अॅड. दिलीप  पटोकार, मनोज शर्मा,  तालुका अध्यक्ष  चेतन फुंडकर, अॅड. गणेश  पिसे,  राजू ठाकुर, अन्सारखान व कार्यकर्त्यांनी  बंदचे आवाहन केले. शहरातील सर्व प्रतिष्ठाने, शाळा बंद दिसून आल्या. नांदुरा येथे सुद्धा सर्व पेट्रोल पंप, दुकाने बंद आहेत. 
 

Web Title: Bharat Bandh: Congress Workers Protest In khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.