'ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:51 AM2019-01-30T02:51:15+5:302019-01-30T06:28:33+5:30

जॉर्ज फर्नांडिस यांचा अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील सहभाग सर्वांसाठीच आश्चर्यकारक होता.

Neither George became pro-Hindutva, nor Vajpayee socialist: Nil Damle | 'ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी'

'ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी'

Next

जॉर्ज फर्नांडिस यांचा अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील सहभाग सर्वांसाठीच आश्चर्यकारक होता. डाव्या विचारसरणीचे कट्टर समर्थक असलेल्या जॉर्ज यांचे उजव्या विचारसरणीचे तसेच समर्थक असलेल्या वाजपेयी यांच्याबरोबर सख्य जमले तरी कसे?
जॉर्ज फर्नांडिस यांचे चरित्र पत्रकार निळू दामले लिहित असून, राजहंस प्रकाशनातर्फे ते लवकरच प्रकाशित
होत आहे. या चरित्रलेखनासाठी अभ्यास करत असताना श्री. दामले यांना जाणवलेले जॉर्ज.

राजकारणातील अनेकांसाठी जॉर्ज यांचा वाजपेयी सरकारमधील सहभाग भुवया उंचावणारा होता. पुस्तक लिहिताना यावर काही जाणवले का?
निळू दामले— जयप्रकाश नारायण यांनी बिहारमध्ये आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सहभाग होता. त्याच वेळी वाजपेयी व जॉर्ज यांची ओळख झाली. नंतर जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा त्यांच्या
सर्वच संघटना या नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाल्या. जॉर्ज त्या आंदोलनात सुरुवातीपासून होताच. तेव्हापासून जॉर्ज व वाजपेयी परस्परांशी परिचित होते. दोघांच्याही व्यक्तिमत्त्वात एक साम्य आहे व ते म्हणजे त्यांच्यातील उमदेपणा. दोघेही स्वभावाने एकदम दिलदार होते. अडचणीत आलेल्या कोणालाही त्वरित मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. कोणी काही केले तर त्याचे कौतुक केल्याशिवाय दोघांनाही राहवत नव्हते. त्यांच्या स्वभावातील या साम्यानेच त्यांना एकत्र आणले असे मला वाटते.

दोघांच्याही विचारधारा भिन्न असतानाही जमले कसे?
दामले— मला वाटते हा डावा, तो उजवा असा विचार आपण करतो. तसे दिसतही असते. पण मोठा विचार करणारी माणसे अशी विचारधारा कायम ठेवूनही विरोधी विचारधारा असणाऱ्यांबरोबर राहू शकतात. जॉर्ज यांच्यावर त्या वेळी भरपूर टीका झाली, मात्र सत्तेसाठी, स्वार्थासाठी त्यांनी हे धोरण स्वीकारले असे ना जॉर्ज यांना कोणी म्हणाले, ना वाजपेयी यांना! त्यांच्यासाठी ते एकत्र येणे फक्त सत्तेसाठी नव्हते, तर त्यांना नको असलेली विचारधारा सत्तेबाहेर ठेवण्यासाठीचे एकत्र येणे होते. त्यात कोणाचाही फायदा नव्हता किंवा तोटाही नव्हता.

जॉर्ज यांनी आपल्या तत्त्वांना मुरड घातली असेही बोलले जात होते
दामले—मला तरी तसे वाटत नाही. त्या सरकारला पाठिंबा देण्याचे स्वत: जॉर्ज यांनीच चांगले समर्थन केले आहे. कितीतरी वेळा अनेक योजनांना जॉर्ज यांनी विरोध केला आहे. अरुण शौरी एक विधेयक पुढे रेटण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना जॉर्ज यांनी तीव्र विरोध केला. जॉर्ज यांचे अखेर ऐकावेच लागले. त्या सरकारच्या काळात अगदी शेवटपर्यत ना जॉर्ज हिंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी. पण तरीही दोघे एकत्रच होते. तेसुद्धा कसलेही वादविवाद न होता. याला कारण सुरुवातीला सांगितले तेच आहे, उमदेपणा! दोघांनाही आपापल्या मर्यादा माहिती होत्या व वैशिष्ट्येही. त्यामुळेच त्यांचे सख्य जुळून आले असावे.

पूर्ण काळ ते सरकारमध्ये बरोबरच होते?
दामले— फक्त बरोबर नव्हते तर त्या काळात
जॉर्ज यांनी अनेकदा वाजपेयी यांच्या सांगण्यावरून सरकार वाचवण्याची जबाबदारीही पार पाडली. वाजपेयीच त्यांच्यावर विश्वासाने ही जबाबदारी सोपवत. त्याचा जॉर्ज यांनी कधीही गैरफायदा घेतला नाही.

दोघांमध्ये आणखी
काय साम्य होते?
दामले—जॉर्ज म्हणजे प्रचंड सकारात्मक होते. अगदी तसेच वाजपेयीसुद्धा होते. दोघांच्याही विचारात औषधालाही नकारात्मकता नव्हती. त्यामुळेही त्यांचे सख्य जुळले असावे. विरोध झाला तरी तो समजून घेऊन काम पुढे नेण्याची त्यांची भूमिका असायची. सरकार तयार करताना जॉर्ज यांना वाजपेयी यांनी बोलावले ते या सकारात्मकतेतून व जॉर्जही आले ते त्याच भूमिकेतून.

Web Title: Neither George became pro-Hindutva, nor Vajpayee socialist: Nil Damle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.