दूरदृष्टी असलेले संयमी नेतृत्व

By यदू जोशी | Published: July 22, 2018 02:12 AM2018-07-22T02:12:59+5:302018-07-22T02:13:45+5:30

नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपद हे सगळे वयाच्या पन्नाशीच्या आत मिळण्याचे भाग्य देवेंद्र फडणवीस यांना लाभले.

Spartan leadership with foresight | दूरदृष्टी असलेले संयमी नेतृत्व

दूरदृष्टी असलेले संयमी नेतृत्व

Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ४८वा वाढदिवस आहे. नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपद हे सगळे वयाच्या पन्नाशीच्या आत मिळण्याचे भाग्य त्यांना लाभले. अर्थात, हे भाग्य त्यांना अविचल पक्षनिष्ठा, प्रचंड अभ्यासू वृत्ती आणि अहोरात्र मेहनत यांतून मिळाले आहे. दूरदृष्टी असलेले आश्वासक नेतृत्व ही ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

वेंद्र फडणवीस यांच्याशी कॉलेज जीवनापासून मैत्री असलेल्यांना माहिती आहे की, कोणताही शॉर्टकट त्यांना कधीही मान्य नव्हता आणि आजही तसेच आहे. संपूर्ण अभ्यासाअंती ते स्वत:चे मत बनवितात व ते सगळ्यांनी स्वीकारलेच पाहिजे, असा त्यांचा आडमुठेपणा कधीही नसतो. संबंधितांना विषयाचे महत्त्व पटवून त्यांच्या सहभागानेच ते पुढे जातात. हे सगळे करण्यासाठी आततायीपणा नाही, तर संयम हवा असतो. तो त्यांच्या ठायी प्रचंड आहे. म्हणूनच समृद्धी महामार्गाला शिवसेनेपासून सर्वांचा असलेला विरोध हा पाठिंब्यात बदलण्याचा चमत्कार ते करू शकले. त्यांच्या याच संयमी स्वभावाचा प्रत्यय नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाबाबतही येईल. एखादा प्रकल्प आणताना मोबदल्यात स्वत:ची वैयक्तिक भागीदारी, हिश्शेवाटी सुरक्षित करण्याची ‘लवासा’वृत्ती
वा ‘बुल्स’वृत्ती त्यांच्यात नाही. महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावताना, हा ‘इंटरेस्ट फ्री’ स्वभाव त्यांना कामी येतो.
राज्यहिताचा पुढील पाचपन्नास वर्षांचा विचार करून, पायाभूत प्रकल्प आणले पाहिजेत, ही दूरदृष्टी त्यांच्यामध्ये आहे. मुंबई, पुणे, नागपूर मेट्रोपासून समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, पुणे-मुंबई हायपरलूप, मेक इन महाराष्ट्रचा ध्यास त्यांनी घेतला आहे. तात्कालिक विचार करणाऱ्यांकडून त्यांना विरोध होतो, पण तो टिकू शकणार नाही. जातींमध्ये अडकलेल्या राजकारणाला विकासाचा चेहरा देण्याचे काम ते करीत आहेत आणि आजच्या पिढीला तेच हवे आहे. बहुजन तरुणांचे बोट धरून त्यांना जनसंघ-भाजपात आणणाºया पित्याचे देवेंद्र हे पुत्र आहेत. जातीपातीचा विचार त्यांना कॉलेज जीवनापासून कधीही शिवलेला नाही. तेव्हाही ते आरक्षणाचे कट्टर समर्थक होते. एखाद्या विषयात जातीच्या चष्म्यातून त्यांच्यावर टीका होते, तेव्हा ते क्षणभर व्यथित होतात, पण पुढच्याच क्षणी सकारात्मक ऊर्जा घेऊन सक्रियही होतात.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेला माणुसकीचा स्पर्श कौतुकास्पद आहे. आपल्याच कार्यालयात त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष उघडला. त्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून जेवढी मदत साडेतीन वर्षांत झाली, तेवढी आधीच्या १५ वर्षांत मिळून झालेली नव्हती. अमृता करवंदे या अनाथ तरुणीने तिची जात कोणती, असा केलेला आर्त सवाल ‘लोकमत’ने राज्यासमोर मांडला आणि त्यानंतरच्या दहाच दिवसांत अनाथांना सरकारी नोकºयांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत, संवेदनशीलतेचा परिचय मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दिला.
एका वर्षात एक हजार खेड्यांचा कायापालट करणारी योजना त्यांनी सीएसआर फंडातून उभी केली. टाटा-अंबानी-बिर्लांपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेक मान्यवरांना त्यात सहभागी करून घेतले. अमीर खानच्या पाणी फाउंडेशनने राज्यभर मोठे काम उभे केले, त्यामागे मुख्यमंत्र्यांचे भक्कम बळ होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी आदर राखत, त्यांच्या सूचना स्वीकारत ग्रामविकास योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत पोपटराव पवारांसारख्या क्रियाशील माणसाला पुढारपण देण्याची गुणग्राहकता मुख्यमंत्र्यांनी दाखविली. मोठेपणा कुणाला द्यायचा आणि कामाची जबाबदारी कुणाला द्यायची, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
थेट मुख्यमंत्री झालेल्या फडणवीस यांना सहज गुंडाळून टाकू, ही भावना नोकरशहांमध्ये सुरुवातीला होती. मात्र, यशवंतरावांसारखा प्रशासनाचा आवाका, शरदरावांसारखी अभ्यासू वृत्ती आणि विलासरावांसारखा अफाट जनसंपर्क यांचा संगम या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे अन् कोणताही विषय आला की, त्याची माहिती त्यांना असतेच असते, अशी पावती तेच नोकरशहा आज देतात. यातच फडणवीस यांचे यश आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर एकही मुख्यमंत्री पाच वर्षांचा सलग कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत. फडणविसांनी अडथळ्यांची शर्यत पार करीत पाच वर्षे पूर्ण केली, तर तो अलीकडचा विक्रम असेल. तसे करून दाखविण्याचे राजकीय कौशल्य त्यांच्या ठायी आहे.
ज्यांना फडणवीस कळले, ते त्यांच्याकडे सकारात्मक व समाजाच्या व्यापक हिताचे विषय नेतात आणि ते लगेच मान्यदेखील होतात. ज्यांना फडणवीस कळले नाहीत, ते त्यांच्याकडे जाऊन इतरांच्या कागाळ्या करतात. नकारात्मक बोलतात. फडणवीस यांच्या डायरीत अशा काडीबाजांचे चार गुण कमीच होतात. ‘वर्षा’वर भल्यांची नोंद ठळकपणे होते अन् बुरे हळूहळू गायब होतात. तिथे एक अदृष्य चाळणी काम करते, ही अफवा नाही वास्तव आहे. मुख्यमंत्रीपदाच्या सुरुवातीच्या दोन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या विश्वासातील नेत्यांची अशी फळी निर्माण करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. मुळात फडणवीस गट निर्माण करण्याच्या ते स्वत:च विरोधात राहिले, पण पुढील पाचपंचवीस वर्षांच्या राजकारणाचा विचार करून गेल्या दीड वर्षांत त्यांनी ‘आपल्या’ माणसांना बळ देण्याचे काम केले आहे. सगळे काही स्वत:च न करता, सहकारीमंत्र्यांना तेवढीच जबाबदारी देताना ते आज दिसत आहेत.
जाता जाता : नानाजी देशमुख, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब लहाने, सुमतीताई सुकळीकर, भाऊसाहेब फुंडकर आदी दिवंगत नेत्यांच्या नावे फडणवीस सरकारने लोकाभिमुख योजना आणल्या. मुख्यमंत्र्यांचे वडील गंगाधरराव हे निष्ठावंत आणि दिलदार नेते होते. त्यांच्या नावाने मात्र काहीही झालेले नाही. आपल्या वडिलांच्या नावे आपल्याच कार्यकाळात एखादी योजना वा उपक्रम कसा सुरू करायचा, असा संकोच मुख्यमंत्री स्वभावानुसार करीत असणार. मात्र, स्व. गंगाधररावांवर त्यामुळे अन्यायच झाला आहे. गंगाधररावांचा कुठलाही चरित्रग्रंथ नाही. मध्यंतरी तसा प्रयत्न झाला, पण तो आकारास आला नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढील वाढदिवसापर्यंत तरी आपल्या आईस असा ग्रंथ समर्पित करावा.

Web Title: Spartan leadership with foresight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.