शेतकरी योद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:50 PM2017-09-03T12:50:46+5:302017-09-03T12:52:47+5:30

प्रासंगिक : शेतक-यांच्या दारिद्र्याचेच नव्हे तर भारतातील एकूण गरिबीचे मूळ हे चुकीच्या शासकीय धोरणात आणि शेतीमालाला मिळणा-या अत्यल्प भावात आहे. देशोदेशींच्या अभ्यासांती मत बनवून ठासून सांगण्याचे काम शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी केले. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक नागरिकांची विधायक चळवळ उभी करणारे कृतिशील विचारवंत, अर्थतज्ज्ञ शरद जोशी यांचा रविवारी जन्मदिन. यानिमित्ताने शेतकरी योद्ध्याच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.

Farmer Warrior | शेतकरी योद्धा

शेतकरी योद्धा

Next

- डॉ. श्याम तेलंग

पोस्ट विभागात कारकून असलेले वडील आणि आई गृहिणी, अशा सर्वसामान्य कुटुंबात शरद जोशी यांचा जन्म ३ सप्टेंबर १९३५  रोजी सातारा येथे झाला. जोशी कुटुंबाचा शेतीशी दुरान्वये संबंध नव्हता. शरद जोशी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोस्ट विभागात वर्ग एक अधिकारी पदावर दहा वर्षे काम केले. पुढे स्वीत्झर्लंड देशात उमेदीच्या काळातील आठ वर्षे घालवली. तेथे ते यूएन या आंतरराष्ट्रीय संस्थेत मोठ्या पगारावर कार्य करत होते. याच ठिकाणी त्यांना  मानवी जीवनात आर्थिक समृद्धीच्या अनेक पदरांचे दर्शन झाले. स्वीत्झर्लंडमधील आर्थिक, सामाजिक विकासामागे शेतीतील समृद्धी हाच महत्त्वाचा दुवा असल्याचे दिसून आले. याचा त्यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देत भारतात सहकुटुंब परतण्याचा निर्णय घेतला. १ मे १९७६ रोजी ते परतले.

पुण्यात दाखल झाल्यानंतर कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांचा विरोध असतानाही त्यांनी प्रयोगासाठी शेती करण्याचे ठरवले. यासाठी खेड तालुक्यातील आंबेठाण गावात १ जानेवारी १९७७ रोजी २५ एकर कोरडवाहू जमीन खरेदी केली. याच जमिनीचे नामकरण ‘अंगारमळा’ असे केले. पुण्यापासून हे अंतर ४० किलोमीटरवर आहे. मात्र त्याठिकाणची आणि पुण्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीत प्रचंड तफावत आढळली. अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या भीषण विषमतेमुळे शरद जोशी बदलत गेले. देशाचे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दोन भाग पडले आहेत. एक भाग हा इंडिया ज्याला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. दुसरा भाग हा भारत. जो खेड्यात राहतो. या खेड्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याची चव चाखलेलीच नव्हती. ही स्थिती शरद जोशी यांना अस्वस्थ करून गेली.

खेड्यातील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी खेड्यात राहणे पसंत केले. त्याठिकाणी शेती केली. या स्वनाभुव आणि चिंतनातून शेतक-यांची नुकसानीतील शेती हेच त्यांच्या अविकासाचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले. या वर्गाला प्रगत करायचे असेल तर शेती सुधारणेला पर्याय नाही. शेती उत्पादनाला मिळणारा भाव आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांना मिळणारा भाव डोळे विस्फरायला लावणारा होता.या सर्व समस्यांच्या मुळाशी ही सरकारी बंधने असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. शेतक-यावर सरकारची प्रचंड बंधने आहेत. या बंधनाची ना कधी शेतकरी चर्चा करतो, ना समाज. सत्ताधारी कोणीही असो, शेतक-यांचे सरकार म्हणवून घेतो, मात्र शेतकरी हिताविरोधात धोरणे राबवतात. या समस्यांचे निदान करताना शरद जोशी यांना केवळ शेतकरी दुर्बल असल्यामुळे ही सरकारे जुमानत नसल्याचे स्पष्ट केले.

देशातील शेतीक्षेत्रात अनेक संशोधने झाली, हरितक्रांती, श्वेतक्रांती झाली. शेतीचे उत्पादन कैकपटीने वाढले. तरीही शेतकरी स्वातंत्र्यानंतर गरीब होत गेला आहे. कधी नैसर्गिक संकट, कधी आपत्ती तर कधी शासकीय संकट आ वासून आलेले असते. या सर्वांचा मुकाबला संघटितपणे करणे आवश्यक होते. शेतीच्या नावावर देण्यात येणारी करोडो रुपयांची सबसिडी, सवलतींचा उपयोग शेतकºयांची पिळवणूक करण्यासाठीच होत होता. यावर १९७७ पासूनच लिखाण, अभ्यास, चिंतन सुरू केले होते. मुबलक नैसर्गिक साधने, कृषिपूरक हवामान, मेहनती शेतकरी, मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची उपलब्धता असतानाही शेतकरी हलाखीत जीवन जगतो. ही अवस्था लेखणीतून उतरली. इतरांची मते खोडून काढली. तरीही परिस्थितीत कोणताही बदल होण्याची सुतराम शक्यता नव्हती. यामुळे केवळ विचार मांडून, लिखाण करून थांबणे शक्य नव्हते. यातूनच ८ ऑगस्ट १९७९ रोजी त्यांनी शेतकरी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली.

या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खेडोपाडी विखुरलेल्या अशिक्षित, मेहनती समाजाला जोशी यांनी एका छत्राखाली आणले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत आत्मसन्मानाची जाणीव करून देण्याचे अशक्यप्राय कार्य पार पाडले. यातूनच आत्मसन्मान जागृत ठेवणारी सुप्रसिद्ध घोषणा पुढे आली ‘भीक नको घेऊ घामाचे दाम’. देशातील अनेक घटक श्रीमंत होत असताना शेतकरी मात्र गरीब होत चालला आहे. यासाठी निसर्ग नव्हे तर चुकीची शासकीय धोरणे जबाबदार असल्याचे शेतक-यांना उदाहरणे देत समजावून सांगितले. या विचाराला मानणारे गावोगावी अभ्यासू कार्यकर्ते तयार झाले. खुल्या अर्थव्यवस्थेचा कट्टरपणे पुरस्कार केला. जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी कुठेही कमी पडणार नाही. फक्त सरकारने शेतीमधील हस्तक्षेप बंद करावा. ‘इंडिया’तील व्यावसायिकांना जसे स्वातंत्र्य आहे. तसेच स्वातंत्र्य ‘भारता’तील शेतक-यांना द्यावे, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत हा योद्धा प्राणपणाने लढला. भारतातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या योद्ध्याची आठवण झाली की, डोळे आपसूकच ओलावतात.

शेतक-यांचे नुकतेच एक उस्फूर्त आंदोलन झाले. या आंदोलनातील ऊर्जा नि:संशय आपल्याच विचाराची होती. कुठल्याही व्यक्ती किंवा पक्षाऐवजी विचाराचे नेतृत्व शेतकरी स्वीकारत आहेत. आपण पाहिलेले दुस-या स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र येत आहे. हा दिवस पाहण्यासाठी. शरद जोशी साहेब आज आपण हवे होतात...

(लेखक नांदेड शहरातील नेत्रतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Farmer Warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.