इतिहास बदलवणारी असईची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:45 AM2017-10-01T11:45:50+5:302017-10-01T11:47:03+5:30

प्रासंगिक : भोकरदनहून बुलडाण्याकडे जाताना माहो-याच्या अलीकडे एक कमान लागली, त्यावर असईच्या लढाईचा ठळक उल्लेख दिसतो. या लढाईला इतिहासात वेगळेच महत्त्व आहे. यात मराठ्यांचा पराभव झाला. एका अर्थाने मराठी साम्राज्याचा -हास सुरू झाला आणि महाराष्टासह दक्षिण भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया मजबूत झाला. त्यांना चौखूर उधळणारा वारा रोखणारा उभ्या हिंदुस्थानात  कोणी शिल्लक राहिला नाही म्हणून असईच्या लढाईला एक वेगळे राजकीय महत्त्वसुद्धा आहे. २३ सप्टेंबर १८०३ रोजी झालेल्या लढाईला दिलेला हा उजाळा...

The Battle of Asiuchi, which transforms history | इतिहास बदलवणारी असईची लढाई

इतिहास बदलवणारी असईची लढाई

googlenewsNext

- सुधीर महाजन
असच एकदा येता-जाता असईचा दौरा केला. महाराष्टातील कोणत्याही खेड्यासारखे अडवळणावरचे खेडे, जुई नदीच्या काठावरचे. गावापासून दक्षिणेकडे किलोमीटरभर अंतरावर भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली एक थडगे, ज्याची दुरुस्ती अलीकडे केलेली. तेथे एक माहिती फलक. या लढाईत प्राण पणाला लावलेल्या लेफ्टनंट-कर्नल पॅट्रिक मॅक्सवेलची ही कबर. पूर्वी यावर पंचधातूची पट्टी होती. त्यावर सर्व उल्लेख होता; पण ती पट्टी चोरीला गेली. इतकी वर्षे उघड्यावर असणा-या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तूंचे होते तेच झाले. या अडवळणाच्या गावात वर्षातून दोन-पाच ब्रिटिश भेट देतात. कारण कोणाच्या तरी खापर पणजोबांनी येथे चिरनिद्रा घेतलेली. ती त्यांच्या घराण्याची शौर्यगाथा. म्हणून ब्रिटिशांसाठी हे युद्ध महत्त्वाचे.

१८०२ साली दौलतराव होळकरांनी पुण्यावर स्वारी केली आणि पेशवा दुस-या बाजीरावाने आपले पद टिकवण्यासाठी इंग्रजांचा आश्रय घेतला. होळकर आणि शिंदे या दोन बड्या सरदारांमधून विस्तव जात नव्हता आणि दोघांनाही पेशवा आपल्या अंकित हवा होता, म्हणून होळकरांनी थेट राजधानीवर धडक मारली आणि बाजीराव अलगद ब्रिटिशांच्या मांडीवर, त्यांनी त्याला तैनाती फौजांसह अटींनी बांधले आणि पुन्हा पेशवे पदावर बसविण्याच्या मसलती सुरू झाल्या. गव्हर्नर जनरल मॉर्निंग्टन, आॅर्थर वेलस्ली, पुण्याचा रेसिडेंट बॅरी क्लोज, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी मुत्सद्देगिरीने दौलतराव होळकरांना पुण्याच्या बाहेर काढले. आॅर्थर वेलस्लीने सैन्याची जमवाजमव सुरू केली, कारण होळकरांशी पुण्यात लढणे शक्य नव्हते. त्यांची फौज मोठी होती. पुणे ताब्यात घेऊन तसे त्यांच्या हाती काही लागले नसल्याने फौजेत बेदिली माजली होती. अखेर बाजीरावाला पेशवेपदी बसवणार असे इंग्रजांनी दौलतराव होळकरांना सांगितले. याच वेळी शिंद्यांबरोबर चर्चा चालू होती. 

इकडे वेलस्लीने फौजा घेऊन तुंगभद्रा पार करीत मराठी रियासतीत प्रवेश केला. इकडे दौलतराव होळकरांनी पुण्यातील मुक्काम हलवून अहमदनगर जिल्ह्यातील चांदोरे या आपल्या वतनाकडे निघण्याची तयारी सुरू केली. या हालचालींवर ग्वाल्हेरच्या शिंद्यांचे लक्ष होते. पुण्यातील आपला प्रभाव संपला हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी नागपूरकर भोसले आणि इतर मराठा सरदारांशी संगनमत सुरू केले. ब-हाणपुरात शिंदे-भोसले यांनी जमवाजमव सुरू केली, हे लक्षात येताच वेलस्लीने ४ जून १८०३ च्या सुमारास पुण्याहून अहमदनगरकडे कूच केले. शिंदे -भोसले यांनी पुण्याकडे कूच केले, तर गोदावरीच्या पलीकडेच त्यांना अडवता येईल ही त्यामागची व्यूहरचना होती; पण अहमदनगरच्या किल्ल्यात शिंद्यांची तुकडी होती आणि त्याची चकमक येथेच उडाली. हा किल्ला ताब्यात घेऊन वेलस्लीने एक तुकडी तातडीने कायगाव टोक्याला पाठविली. तो फौजांसह २९ आॅगस्टला औरंगाबादेत दाखल झाला.

औरंगाबादमध्येच मराठ्यांच्या हालचालीची माहिती मिळाली. त्यावर्षी मराठवाड्यात पाऊस कमी होता. त्यामुळे फौजा हलवणे अवघड नव्हते. मराठे आणि निजाम यांच्यामध्ये उभे राहता यावे म्हणून वेलस्लीने पूर्वेकडे पिंपळगावकडे कूच केले, तर स्टिव्हन्सन जालन्यात पोहोचला. येथूनच मराठे व इंग्रज एकमेकांच्या मागावर होते. वेलस्लीने गोदावरी पार करून राक्षसभुवन गाठले, तर शिंद्यांची फौज परतूरजवळ तळ देऊन होती. त्यांनी परतूर सोडून उत्तरेकडे कूच केले आणि वेलस्ली परतूरला पोहोचला. शिंदे अजिंठ्याकडे निघाले. त्यांचा मुक्काम भोकरदनला पडला. स्टिव्हन्सन आणि वेलस्ली यांनी दोन दिशांनी मराठा फौजांना घेरण्याचे ठरवले. स्टिव्हनसन शेलगाव, बदनापूर, हसनाबादमार्गे भोकरदनकडे निघाला, तर वेलस्लीने बदनापूरहून नळणीकडे कूच केले. २२ सप्टेंबरला तो पावगी खेड्याजवळ, तर स्टिव्हनसन पूर्णा काठावर होते. २३ चा मुक्काम नळणीला करण्याची त्यांची योजना होती. २३ सप्टेंबर १८०३ वार शुक्रवार. वेलस्लीने नळणी पार केले. इकडे बापू गोखले आणि अप्पा देसाई या मराठी सरदारांनी सैन्याची मांडणी करून युद्धाची तयारी सुरू केली होती. 

स्टिव्हन्सन भोकरदनजवळ पोहोचला. आपण शत्रूच्या इतक्या जवळ आलो याची जाणीव वेलस्लीला झाली आणि त्याने भिडण्याचा निर्णय घेतला; पण मराठ्यांशी समोरासमोर लढायचे नाही हा निर्णय घेत त्याने फौजांसह पिंपळगाव आणि वरूड या खेड्याजवळ नदी पार केली. शिंद्यांच्या फौजांना त्यांच्यावर मारा करता आला नाही. जागा घेत ब्रिटिश फौजांनी तोफांचा मारा सुरू केला आणि युद्धाला तोंड फुटले. दिवसभर तुंबळ युद्ध झाले. यात लेफ्टनंट-कर्नल पॅट्रिक मॅक्सवेल कामी आला. शेवटचा हल्ला असई गावावर झाला. या लढाईत ब्रिटिशांचे ४२८ सैनिक तर मराठ्यांचे ६ हजार सैनिक ठार झाले. इंग्रजांच्या फौजा शिस्तबद्ध लढण्याने त्यांची हानी कमी झाली. वेलस्लीच्या फौजेचा हा विजय होता. स्टिव्हन्सन दुस-या दिवशी सकाळी असईला पोहोचला. शिंद्यांच्या फौजा अजिंठामार्गे ब-हाणपूरकडे निघून गेल्या. पुढे वेलस्लीने ब-हाणपूर असीरगड जिंकत ग्वाल्व्हेरवर धडक मारली. असईची ही लढाई त्यासाठी महत्त्वाची, मराठ्यांची तशी  शेवटची. मराठी फौजांनी मराठवाड्यातील पालखेड, राक्षसभुवन, खर्डा यापूर्वी तीन लढाया जिंकून मराठी साम्राज्य मजबूत केले होते. असईची लढाईसुद्धा  जिंकली असती तर इतिहास कदाचित वेगळा असता.

Web Title: The Battle of Asiuchi, which transforms history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.