मतभेद मिटतील! मनभेदाचं काय? 

By Balkrishna.parab | Published: June 5, 2018 08:38 PM2018-06-05T20:38:54+5:302018-06-05T20:38:54+5:30

नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने सर्वस्व पणाला लावून शिवसेनेच्या उमेदवाराला चारलेली धूळ यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले गेलेले आहेत. अशा परिस्थितीत ही भेट होत असल्याने या भेटीबाबत उत्सुकता निर्माण होणे साहजिकच आहे.

Amit Shah & Uddhav Thackeray Meet News | मतभेद मिटतील! मनभेदाचं काय? 

मतभेद मिटतील! मनभेदाचं काय? 

googlenewsNext

भाजपाध्यक्ष अमित शाह हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बुधवारी संध्याकाळी  मातोश्रीवर येणार असल्याचे वृत्त आल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेत शिवसेनेला मिळालेली सापत्न वागणूक, विविध निवडणुकांमध्ये भाजपाने केलेली शिवसेनेची गळचेपी, नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने सर्वस्व पणाला लावून शिवसेनेच्या उमेदवाराला चारलेली धूळ यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले गेलेले आहेत. अशा परिस्थितीत ही भेट होत असल्याने या भेटीबाबत उत्सुकता निर्माण होणे साहजिकच आहे.

2014 नंतर पहिल्या तीन वर्षांमध्ये दिल्ली आणि बिहारचा अपवाद वगळता देशातील इतर भागात भाजपाने जोरदार मुसंडी मारली. मात्र राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपाविरोधातील सर्व पक्षांची एकजूट होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने त्याचा फटका भाजपाला बसू लागला आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात सपा, बसपा, काँग्रेस आणि रालोद असे सर्वच बिगर भाजपा पक्ष एकत्र आल्याने गोरखपूर आणि फुलपूरपाठोपाठ कैराना मतदारसंघातही पराभवाचा धक्का बसल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातच महाराष्ट्रातही गोंदिया-भंडारा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने भाजपाला चितपट केले. महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय चित्र पाहता आगामी निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला सोबत घेणे अपरिहार्य असल्याचे भाजपाच्या धुरीणांनी ताडले आहे. म्हणूनच शिवसेनेने कितीही कडवट टीका केली तरी सेनानेतृत्व आणि शिवसैनिकांना दुखवायचे नाही. असे धोरण भाजपाने स्वीकारले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर भेट होत असल्याने या भेटीत आगामी निवडणुका आणि युतीबाबत चर्चा निश्चितपणे होईल. मात्र भाजपाचा पूर्वोतिहास आणि अमित शाह यांनी मध्यंतरी स्वीकारलेले शिवसेनेची गळचेपी करणारे धोरण यामुळे या भेटीत उद्धव ठाकरे हे मवाळ भूमिका घेण्याची शक्यता फारच कमी आहे. तर एनडीएतील घटक पक्ष टिकवण्याचे आव्हान समोर असल्याने अमित शाह यांचे धोरण मवाळ असण्याची शक्यता आहे. असे असले तरी युतीबाबत उद्याच निर्णय होईल असे नाही. पण शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्याच्या दृष्टीने ही भेट एक सकारात्मक पाऊल ठरू शकते. त्यातून दोन्ही बाजूंकडील मतभेद काहीसे कमी होऊन परस्पर सहकार्य आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होऊ शकते. 

मात्र नेत्यांच्या पातळीवर मतभेदांची दरी सांधली गेली तरी युतीचा मार्ग तितकासा सहज आणि सुकर नसेल. त्याला कारण म्हणजे गेल्या चार वर्षांत शिवसेना आणि भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले तीव्र मनभेद. एकीकडे शिवसेना नेतृत्व मोदी आणि भाजपावर जोरदार टीकास्र सोडत असतानाच शिवसैनिकांनीही सोशल मीडियापासून  थेट जनतेपर्यंत पोहोचत मोदींच्या धोरणांविरोधात रान उठवले. प्रसंगी अत्यंत कटून शब्दात टीका केली. तर भाजपाचे कार्यकर्ते आणि सोशल मीडिया सेलनेही शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीसारखा आपलेपणा राहिलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीची मोट बांधायची असल्यास केवळ वरच्या पातळीवर मतभेद दूर होऊन चालणार नाहीत, तर कार्यकर्त्यांच्या पातळीवर निर्माण झालेल्या मनभेदाची दरी सांधण्याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर असेल. अन्यथा युती होणे अवघड होईल आणि अशी युती झाली तरी त्यातून फारसा लाभही होणार नाही. 

Web Title: Amit Shah & Uddhav Thackeray Meet News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.