पंचामृत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:53 AM2017-09-17T00:53:21+5:302017-09-17T00:53:35+5:30

आता सणांचे दिवस सुरू होतील. या काळात आवर्जून पूजा केली जाते. आणि पूजा म्हटली की पंचामृत आलेच! या पंचामृताचा वापर फक्त पूजेपुरता न करता विविध पेयांतही करून बघायला हरकत नाही.

Panchamrut! | पंचामृत!

पंचामृत!

- भक्ती सोमण

आता सणांचे दिवस सुरू होतील. या काळात आवर्जून पूजा केली जाते. आणि पूजा म्हटली की पंचामृत आलेच! या पंचामृताचा वापर फक्त पूजेपुरता न करता विविध पेयांतही करून बघायला हरकत नाही.

हाहा म्हणता नवरात्र जवळ आलीच; पुढच्या महिन्यात दिवाळीही आली. नवरात्रीत देवीचे उपवास आणि पूजा तर दिवाळीत लक्ष्मीपूजन होते. पूजा करताना आठवणीने आणि तेही आवर्जून वापरले जाते ते पंचामृत. पंचपाळ्यात दूध, तूप, मध, दही, साखर घालूून थोडेथोडे देवाला दाखवले जाते आणि नंतर ते सर्व दुधात एकत्र करून नैवेद्य म्हणून प्यायला दिले जाते. हे पाच घटक एकत्र करून पिताना मन प्रसन्न होते. या घटकांचा शरीराला विविध प्रकारे फायदा होतो. उपवासाच्या काळात शरीरात अ‍ॅसिडिटी निर्माण होते ती कमी करण्याचे काम थोड्या प्रमाणात पंचामृत करते. तूप आणि मधामुळे भूक चाळवत नाही. तसेच शरीरात ऊर्जा राखण्याचे कामही होते. येणारं बाळ सुदृढ व्हावं म्हणून गर्भवतीला पंचामृत प्यायचा सल्ला देतात. असे एक ना अनेक फायदे असल्याने त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात व्हायला हवा!
आपण रोजच्या आहारात दूध, साखर, तूप, दही, मध यांचा वापर करतोच. उपवासाच्या काळात तर अगदी फायद्याची ठरतील अशी पेये पंचामृतापासून करू शकतो. दुधात पंचामृताला लागणारे घटक एकत्र करून ‘पंचामृत मिल्कशेक’ करता येऊ शकते. दुधात आवडीचे फळ आणि पंचामृत मिक्स करून वर आइसक्रीमचा स्कूप घालून ते ड्रिंक म्हणून देता येईल. घरांत फळांचे स्क्वॅश असतात. तसाच पंचामृताचा करायचा. ऋतुमानानुसार मिळणाºया आवडत्या फळांचे ज्यूस, फळांचे तुकडे आणि हे पंचामृत एकत्र करून त्याला आवडीप्रमाणे नाव देऊन हे पंचामृत देता येऊ शकते. उदाहरणार्थ आता स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होईल. स्ट्रोबेरीच्या ज्यूसमध्ये पंचामृत स्क्वॅश एकत्र करून ‘गुलाबो पंचामृत’ किंवा ‘अमृत गुलाबो’ असे हटके नाव देऊन ते पिता येईल. मुलांना ते नक्की आवडेल.
याविषयी शेफ तुषार प्रीती देशमुख म्हणाले, पंचामृतात पौष्टिकतेचे सर्व रस आहेत. फक्त पूजेसाठी त्याचा उपयोग न करता नेहमीच्या आहारातही त्याचा उपयोग आपण आवर्जून केला पाहिजे. बरेचदा मुले दूध प्यायला नकार देतात. अशावेळी पंचामृत आणि फळे एकत्र करून दिलेल्या ड्रिंक हा पर्याय आहे. तर ब्राऊनी खायला देताना वर पंचामृताचा लेअर, ड्रायफ्रूट्स घालून ती देता येईल.
पौष्टिकतेच्या दृष्टीने पंचामृताचे महत्त्व खूप मोठे आहे. मग त्याला फक्त पूजेपुरतेच का मर्यादित ठेवायचे बरे! मी तर आता पंचामृत दैनंदिन आयुष्यात वापरायचे ठरवले आहे. तुम्ही काय करणार!

सॅलेडचे ड्रेसिंग...
आजकाल फळ आणि भाज्यांच्या सॅलेडमध्ये मस्टर्ड सॉस, मॅयोनिज वगैरे विविध प्रकार ड्रेसिंग म्हणून वापरतात. त्याने एक वेगळी चव या सॅलेडना येते. मात्र यात पौष्टिक क्रीमीपणा आणायचा असेल तर थोडा वेगळा प्रकार म्हणून फळांच्या सलेडमध्ये पंचामृताचा वापर नक्कीच करता येऊ शकतो. कोबी, गाजर यांच्या सॅलेडमध्ये पंचामृत घालता येऊ शकते. प्रयत्न तर करून बघा!

Web Title: Panchamrut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.