मी कॅब रद्द केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 10:19 AM2018-04-30T10:19:33+5:302018-04-30T10:38:51+5:30

एका रद्द झालेल्या कॅबची बातमी झाली आणि तिच्यामुळे अभिषेक मिश्रा आणि मसूद अस्लम हे दोघेही प्रसिद्ध झाले. 

vhp member ola cab cancel issue | मी कॅब रद्द केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि...

मी कॅब रद्द केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि...

- मुकेश माचकर

दिल्ली-मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये प्रवासासाठी कॅब बुक करणंही नॉर्मल आणि काही कारणाने प्रवास अशक्य असेल तर ती रद्द करणंही नॉर्मल असतं. याचीही बातमी बनू शकते, ती गल्ली ते दिल्ली गाजू शकते आणि तिच्यावर चर्चा होऊ शकते, असा कोणी कधी विचार केला नसेल. पण, एका रद्द झालेल्या कॅबची बातमी झाली आणि तिच्यामुळे अभिषेक मिश्रा आणि मसूद अस्लम हे दोघेही प्रसिद्ध झाले. 
अभिषेक मिश्रा हा विश्व हिंदू परिषदेचा एक कार्यकर्ता आहे. 
मसूद अस्लम हा ओला कंपनीकडे नोंदणीकृत कॅब चालवतो.
अभिषेकने ओलाकडे कॅब बुक केली.
आता आपल्याकडे अजून तरी कॅब बुक करताना ड्रायव्हरचं धर्म, गोत्र, जात, त्याने कोणत्या मुहूर्तावर गाडी खरेदी केली, तिचा रंग शुभ आहे की अशुभ, तिचे दरवाजे कोणत्या दिशेला उघडतात, ती गोमूत्राच्या इंधनावर चालते की गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांवर, वगैरे मौलिक माहिती विचारून कॅब बुक करण्याची सोय नाही. आपण कुठून कुठे जाऊ इच्छितो, ते सांगून त्या पट्ट्यासाठी उपलब्ध गाड्यांपैकी एक आपल्यासाठी निवडली जाते. ड्रायव्हरने ट्रिपला रुकार दिला की त्याची माहिती आपल्याकडे पोहोचवली जाते. 
तशीच ती अभिषेककडेही आली. ड्रायव्हरचं नाव होतं मसूद अस्लम. अभिषेक मिश्राने ही कॅब कॅन्सल केली आणि लगेच त्या व्यवहाराच्या स्क्रीनशॉटसह ट्वीट केलं, ‘मी ओला कॅब कॅन्सल केली, कारण ड्रायव्हर मुस्लिम होता आणि मला माझे पैसे जिहादींना द्यायचे नाहीत.’
अभिषेक हा ट्विटरवरचा लोकप्रिय हिंदुत्ववादी ‘थिंकर’ आहे (हा त्याचा शब्द), तीन-चार मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी त्याचे फॉलोअर आहेत. या पार्श्वभूमीवर त्याच्या ट्वीटची वाहवाहीही झाली आणि प्रखर टीकाही झाली. ड्रायव्हरचा धर्म पाहून आपण कॅब रद्द करणार, सरसकट सगळ्या मुस्लिमांना जिहादी ठरवणार, हे कसं चालेल, असा सवाल उमटला. काहींनी त्याला आठवण करून दिली की तू कोणतंही वाहन वापरलंस तरी त्याचं इंधन मध्यपूर्वेतून येतं. ते सगळे मुस्लिम देश आहेत. तू इंधन वापरणंच बंद कर आणि पायी चालू लाग. उदारमतवाद्यांमध्ये खळबळ उडाली की कट्टरतावादयांना अधिक स्फुरण चढतं. तसं अभिषेकला महापराक्रमाचं स्फुरण चढलं. वार्ताहर त्याचा बाइट मागू लागले. मग अभिषेकने, मोठा गौप्यस्फोट केल्याच्या थाटात सांगितलं की कोणा एका रेश्मा नायर नावाच्या महिलेने कॅबच्या मागच्या काचेवर ऊग्र हनुमानाचं चित्र पाहून, अशी चित्रं लावणारे ड्रायव्हर बलात्कारी असू शकतात, असं सांगून ती कॅब रद्द केली आणि तसं ट्वीट केलं. 
ती तसं करू शकते तर मीही असं करू शकतो, हा माझा पर्सनल चॉइस आहे, असा अभिषेकचा युक्तिवाद होता. शिवाय तिने हे केलं तेव्हा कुठे होते उदारमतवादी, ही कधीच खरखरून बंद पडलेली टेपही लावली. 
आता पर्सनल चॉइस हा पर्सनल मामला आहे खरा. तिथवर, अगदी जातीधर्माच्या कारणाने कॅब रद्द करणंही समजू शकतं. अनेक लोक औषधाची गोळी घेण्यासाठीही विशिष्ट धर्माच्या किंवा जातीच्या माणसाकडून पाणी घेत नाहीत. आपल्या सोसायटीत कोणाला घर द्यायचं, हेही काही माणसं ठरवतात. देशाच्या अनेक भागांमध्ये शाकाहारींची संख्या जास्त झाली की ते त्या भागात मांसाहारी पदार्थ मिळणारच नाही, अशी व्यवस्था करतात. तिथे कॅब रद्द करणं किरकोळच आहे. असं अनेकजण करत असतीलच. पण, अभिषेकने ते करून त्याचं ट्वीट केलं, वर त्याला ‘जिहादी’ शेपटी जोडली. हा काही पर्सनल चॉइस नाही. ही एक जाहीर कृती आणि जाहीर विधान आहे, त्याचे पडसाद उमटणारच.
दुसरी गोष्ट कुणा रेश्मा नायरने असं काहीतरी केलं ते बरोबर होतं की चूक?
ते बरोबर होतं, असं अभिषेकला वाटत असलं पाहिजे. अन्यथा त्याने ते रिपीट का केलं असतं?
रेश्मा नायरने हनुमानाच्या फोटोमुळे कॅब नाकारली, हे अभिषेकच्या लक्षात आल्यावर त्याने रेश्माचा निषेध केला नाही, ती बातमी ट्वीट केली नाही, त्यावर गदारोळ केला नाही. तसं केलं असतं तर आज अभिषेकची जी थट्टा सुरू आहे, ती रेश्माची झाली असती. ती झालीच नसती, तर उदारमतवाद्यांना फक्त हिंदूच दिसतात, वगैरे आक्रंदनात काही तथ्य होतं. रेश्मा नायरच्या चुकीचा पर्दाफाश करण्याऐवजी अभिषेकने तीच चूक (ती चूक आहे, असं आपल्याला वाटतं, अभिषेक आणि त्याच्या समविचारींना रेश्माने केलं ते चूक वाटतं आणि त्यांनी केलं ते बरोबर वाटतं) रिपीट करून ‘ती करू शकते तर मी का करू शकत नाही’, अशी गुर्मी त्याने दाखवली. ही या मंडळींची एक मजा आहे. पाटीभर शेण खाल्लं तर ते शेण आणि चमचाभर खाल्लं तर पंचगव्य अशी त्यांची काहीतरी धारणा आहे. तिने आधी केलेली चूक ही चूक आहे, याने नंतर केलेली चूक मात्र बरोबर आहे, कारण हे तिला धडा शिकवणं आहे, असं काहीतरी डोक्यावर पडलेलं तर्कशास्त्र आहे या मंडळींचं. हा न्याय लावायचा, तर एखाद्याने एक खून केला, तर तो खून आणि दुसऱ्याने हा खून कसा चुकीचा होता, हे दाखवून देण्यासाठी त्याच प्रकारच्या शस्त्राने दुसरा खून करून दाखवला, तर तो मात्र कौतुकास्पद पर्दाफाश ठरवावा लागेल. एकाला फाशी आणि दुसऱ्याला पदक द्यावं लागेल.
अर्थात अभिषेक आणि कंपनीच्या तर्कशास्त्राने (सुदैवाने अजून तरी) जग चालत नसल्याने हा सगळा मानभावी कांगावा ट्विटरवरच उघडा पडला आणि अभिषेकची खिल्ली उडवणाऱ्या ट्वीट्सचा मारा सुरू झाला. 
मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव विकास होतं आणि तो कधी येईल का, याबद्दल मला काहीच खात्री नव्हती, असं एक ट्वीट प्रसृत झालं आणि ते सुपरहिट झालं.
आणखी काही नमुने पाहा...
मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव अच्छे दिन होतं आणि चार वर्षांपासून आम्ही त्याची वाट पाहतोय, तो फिरकलेलाच नाही.
मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव भगवान होतं आणि माझा देवावर विश्वास नाही. (वैसे भी अभिषेक अँड कंपनी के होते, किसी का भी विश्वास उठ सकता है भगवान से.)
मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव रोहित शेट्टी होतं आणि कोणत्याही क्षणी कारचा स्फोट झाला असता किंवा ती हवेत उंच उडाली असती.
मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव मोदी होतं आणि तो जॅग्वार आणतो असं सांगून बैलगाडी घेऊन आला होता.  
मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव यमराज होतं आणि मला मरण्याची घाई नाही.
मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव विप्लब देव होतं आणि तो कारच्या जागी पुष्पक विमान घेऊन मला स्वर्गात न्यायला आला होता.
मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हर नास्तिक होता आणि इतक्या धाडसी माणसासाठी गाडी मी चालवायला हवी होती. 
या सगळ्या गदारोळातून एका स्पर्धेचा जन्म झाला आहे. गल्ली ते दिल्ली कॅब कॅन्सलेशन स्पर्धा. इथे पुढे जी वाक्यं दिली आहेत, त्यात ड्रायव्हरचं नाव गुपित आहे. ते जर तुम्ही अचूक ओळखलंत तर स्वत:च स्वत:ला मार्क द्यायचे.
१.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि इतकी हवा भरलेल्या, ५६ इंची छातीच्या चालकानेच गाडीतली जागा व्यापल्यानंतर मला जागा उरेल का, अशी मला शंका आली.
२.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि अल्पवयीन चालकाबरोबर प्रवास करणं (भले तो पक्ष चालवत असला तरी) कितपत सुरक्षित राहील, याची मला धास्ती होती.
३.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि त्याने आल्या क्षणापासून माझी प्रत्येक गोष्टीसाठी माफी मागायला सुरुवात केली. मग मी माफी मागून कॅब कॅन्सल केली आणि कॅब कॅन्सल करून पुन्हा माफी मागितली.
४.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि मला पाठीत खंजीर घेऊन कात्रजच्या घाटात जायचं नव्हतं.
५.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि त्या बाई येल विद्यापीठाचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे, असं सांगत होत्या.
६.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि त्याच्या गाडीत चहाची बिलं, उंदराच्या गोळ्या, न खपलेल्या गाण्याच्या सीडी आणि क्लीन चिट यांच्यामुळे खुद्द त्यालाच बसायला जागा नव्हती, तर मी कुठे बसणार?
७.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि तो सारखा ‘नाणार, नाही नेणार, नाही होऊ देणार, आधी घेणार, मगच देणार,’ असं काहीतरी बोलत होता आणि पैशांच्या ऐवजी राजीनामे मागत होता.
८.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि माझे पैसे मला गोगुंडांना द्यायचे नव्हते.
९.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि त्या बाईंनी मागच्या सीटवर हत्ती बसवला होता आणि उरलेल्या जागेत अॅडजस्ट करून घ्या, असं त्यांचं म्हणणं होतं.
१०.    मी कॅब कॅन्सल केली कारण ड्रायव्हरचं नाव XXX होतं आणि तो पेन्सिल नाचवत ओरडत होता, ती माझ्या डोळ्यात गेली असती.
आता १० प्रश्नांची उत्तरं अचूक दिलीत, तर स्वत:वर खूष होऊन एक कॅबची राइड बुक करा आणि कोणत्याही वेडपट कारणासाठी ती रद्द करू नका. आता तुम्हाला केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान वगैरे ट्विटरवर फॉलो करत असतील, तर मात्र तुम्हाला तो अधिकार आहे... हक बनता है!!!

 

Web Title: vhp member ola cab cancel issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.