पायलीची सामसूम... ...चिपट्याची धामधूम

By सचिन जवळकोटे | Published: December 21, 2017 10:10 AM2017-12-21T10:10:59+5:302017-12-21T10:12:39+5:30

गावच्या शाळेत अस्सल मराठी म्हणींचा अभ्यास घेण्यात गुरुजी मग्न. बाहेरच्या पारावर पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात चार-पाच कार्यकर्ते दंग. अशावेळी गुरुजी अन् कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन.

Stretchy face ... ... cluttering | पायलीची सामसूम... ...चिपट्याची धामधूम

पायलीची सामसूम... ...चिपट्याची धामधूम

गावच्या शाळेत अस्सल मराठी म्हणींचा अभ्यास घेण्यात गुरुजी मग्न. बाहेरच्या पारावर पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात चार-पाच कार्यकर्ते दंग. अशावेळी गुरुजी अन् कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन.

आतून गुरुजी : मुलांनोऽऽ, आज तुम्हाला काही म्हणी शिकवतो. घ्या लिहून.
बाहेर कार्यकर्ता : (मथळे वाचत) गुजरातमध्ये मोदी-शहा टीम कशीबशी तरली.
गुरुजी : नागोबा-म्हसोबा पैशाला दोन... पंचमी झाल्यावर पूजतंय कोण ?
कार्यकर्ता : आशिष-किरीट जोडीकडून मात्र मुंबईत जणू दिवाळी साजरी.
गुरुजी : उथळ पाण्याला खळखळाट फार.
कार्यकर्ता : ‘मोदी लाटे’ची स्वप्नं पाहणारी महाराष्ट्रातली नेते मंडळी आतून अस्वस्थ.
गुरुजी : ऐन दिवाळीत दाढदुखी !
कार्यकर्ता : हार्दिक पटेलकडून आरोप, ‘गुजरात निवडणुकीत इव्हीएम घोटाळा!’
गुरुजी : नाचता यईना.. अंगण वाकडं !
कार्यकर्ता : शिवसेना अन् राष्ट्रवादीलाही गुजरातमध्ये ‘स्वत:ची जागा’ समजली.
गुरुजी : करायला गेले नवस अन् आज निघाली अवस !
कार्यकर्ता : राहुल गांधींच्या करिष्म्याचे उद्धव ठाकरे अन् अजित पवारांकडून चक्क कौतुक.
गुरुजी : दुभत्या गाईच्या लाथा गोड !
कार्यकर्ता : गुजरातवर अधिक लक्ष देण्याच्या नादात कॉँग्रेसनं गमावलं हक्काचं हिमाचल.
गुरुजी : रोग म्हशीला, इंजेक्शन पखालीला.
कार्यकर्ता : महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आता तरी पुन्हा एक होणार का ?
गुरुजी : तुझं माझं जमेना.. अन् तुझ्या वाचून करमेना.
कार्यकर्ता : दरम्यान, ‘२०१९ कुणाचं?’ यावरून भाजप-शिवसेनेत आत्तापासूनच शाब्दिक संघर्ष.
गुरुजी : बाजारात तुरी अन् ७७ ७७७ ला मारी!
कार्यकर्ता : शपथविधीची घाई लागलेले नारायणराव भेटले देवेंद्रपंतांना. खडसेंच्या पुनर्वसनाचा विषय मात्र तूर्तास बाजूला.
(एवढ्यात गुरुजींना ठसका लागतो. मग मुलंच पुढची अस्सल गावरान म्हण सांगतात.)
वर्गातली मुलं : (एकसुरात) पायलीची सामसूमअन् चिपट्याची धामधूम !
 

Web Title: Stretchy face ... ... cluttering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.