संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा अजेंडा मांडून प्रणबदा झाले आणखी मोठे, काँग्रेसने काय मिळवले?

By तुळशीदास भोईटे | Published: June 7, 2018 10:03 PM2018-06-07T22:03:14+5:302018-06-07T22:03:14+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी सहभागी झाल्यामुळे उफाळलेल्या वादाचे त्यांच्या भाषणातील मुद्द्यांच्या आधारे केलेले विश्लेषण:

Pranab Mukherjee presented Congress agenda on RSS dias | संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा अजेंडा मांडून प्रणबदा झाले आणखी मोठे, काँग्रेसने काय मिळवले?

संघाच्या व्यासपीठावर काँग्रेसचा अजेंडा मांडून प्रणबदा झाले आणखी मोठे, काँग्रेसने काय मिळवले?

Next

महात्मा गांधी संघाच्या कार्यक्रमात दोनवेळा सहभागी झाले होते. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी चीन युद्धाच्यावेळच्या संघाच्या सहकार्याबद्दल संघाच्या स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी केले होते. पाकिस्तान युद्धाच्यावेळी दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेत मदत केल्याबद्दल तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी संघाचे तत्कालिन सरसंघचालक श्रीगुरुजींना सर्वपक्षीय बैठकीत सहभागी केले होते. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी विश्व हिंदू परिषदेच्या एकात्म जल यात्रेत सहभागी झाल्या होत्या. संघाचे पदाधिकारी एकनाथ रानडेंच्या निमंत्रणाचा स्वीकार करुन त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरिअलचे उद्घाटनही केले होते. तरीही काँग्रेसने यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होण्याचा खूपच बाऊ केला. कुठेतरी काँग्रेसला आपल्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा जाईल अशी भीती वाटली असावी.



 

मुखर्जींना आमंत्रत करण्यामागे संघाचा अजेंडा काँग्रेसचे नुकसान करण्याचा असावा असा संशयही असावा. त्यामुळेच बहुधा काँग्रेसने आक्रमकतेने संघावर ट्विटर हल्लाही चढवला. अर्थात संघ किंवा भाजपचे संभ्रम तयार करुन राजकारण साधण्यातील कौशल्य लक्षात घेतले तर काँग्रेसची भीती अगदीच अनाठायी म्हणता येत नाही. फक्त त्यातून एक जाणवले, काँग्रेसच्या स्वत:च्याच ज्येष्ठ नेत्यावर किंवा त्यांच्या राजकीय कौशल्यावर विश्वास नाही. प्रणबदांनी मात्र संघभूमीत, सरसंघचालकांसोबत व्यासपीठावर बोलतानाही ते काँग्रेस या धर्मनिरपेक्ष पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याचे लक्षात ठेवले. मात्र त्याचवेळी माजी राष्ट्पती असल्याचेही ते विसरले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपले विचार ठामपणे मांडले. त्याचवेळी आब राखत, संयमित भाषेतच त्यांनी संघाला त्यांच्या दृष्टीने भारत देश आणि देशभक्ती काय आहे त्याची जाणीव करुन दिली.
"राष्ट्रवाद आणि देशभक्तीवर माझी भूमिका मांडण्यासाठी येथे आलो आहे" असे प्रणब मुखर्जी म्हणालेत तेव्हा चाहूल लागली.

गेल्या काही वर्षात भाजपाची सत्ता असताना देशभर घडत असलेल्या जातीय, धार्मिक हिंसाचारावर कोरडे ओढण्यासाठी "कोणत्याही प्रकारच्या हिंसेपासून समाजाने दूर राहिले पाहिजे, मग ती मौखिक असो वा शारीरिक" या शब्दांमधून भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादाचा पुकारा करत आपला अजेंडा राबवणाऱ्या संघाच्या व्यासपीठावर "राष्ट्वाद हा भाषा, जाती, धर्म, जाती यांनी प्रभावित होत नसतो" असे सांगतानाच "विविधता असली तरी भारतीयता हीच आपली ओळख" असेही त्यांनी बजावले. "भारताचा आत्मा हा विविधतेतच वसलेला आहे", असे सांगतानाच सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाव न घेता ताशेरे ओढले तेही संयमित शब्दात. "जनतेच्या आनंदातच राजाचाही आनंद असला पाहिजे" या संसदेच्या भिंतीवर कोरलेल्या पौराणिक वचनाचा दाखला काही त्यांनी असाच दिला नाही. तसेच "संवादाच्या माध्यमातूनच विभिन्न विचारधारांच्या लोकांच्या समस्यांचे निराकारण शक्य असते" हा सल्ला काही उगाचच दिला नाही. 



 

सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी राष्ट्रहित सर्वोपरि मानणाऱ्या संघाच्या व्यासपीठावरच सांगितलेली स्वत:ची देशभक्तीची व्याख्या... "देशाच्या प्रति असलेली निष्ठा हीच खरी देशभक्ती"
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतानाच आपण माजी राष्ट्रपतीही आहोत, हे प्रणबदा विसरले नाहीत. त्यामुळेच त्यांनी आपली धर्मनिरपेक्ष भूमिका ठामपणे मांडताना कुठेही संयम सोडला नाही. काँग्रेस मात्र तसा संयम दाखवू शकली नाही. टोकाची भूमिका घेणारे ट्विट आणि व्हिडिओ प्रसारीत झाले. काँग्रेसची धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्यासाठीची धडपड त्यातून दिसून आली. त्याचवेळी प्रणबदांची संयमित शैलीतील धर्मनिरपेक्ष भूमिका प्रभावीरीत्या ठसली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित अजेंड्याच्या जाळ्यात काँग्रेसच फसली. प्रणब मुखर्जी मात्र जाळ्यात न गुरफटता आणखी मोठे ठरले. काँग्रेसने प्रणबदांच्या भाषणानंतर घेतलेली भूमिका ही सारवासारवच ठरली. 

Web Title: Pranab Mukherjee presented Congress agenda on RSS dias

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.