नैसर्गिक x नैतिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:53 AM2017-10-08T02:53:28+5:302017-10-08T02:53:45+5:30

‘नैसर्गिक असावे’ असे आपण म्हणतो आणि त्यासोबतच ‘नैतिकता पाळावी’ असेही आपल्याला वाटते, पण हे कसे काय शक्य होणार? कारण मानवी व्यवहारातील पन्नास टक्क्यांहूनही अधिक नैसर्गिक व्यवहार नैतिक नसतात.

Natural x ethical | नैसर्गिक x नैतिक

नैसर्गिक x नैतिक

Next

- डॉ. नीरज देव

‘नैसर्गिक असावे’ असे आपण म्हणतो आणि त्यासोबतच ‘नैतिकता पाळावी’ असेही आपल्याला वाटते, पण हे कसे काय शक्य होणार? कारण मानवी व्यवहारातील पन्नास टक्क्यांहूनही अधिक नैसर्गिक व्यवहार नैतिक नसतात. अधिकच स्पष्ट बोलायचे, तर नैसर्गिक अन् नैतिक हे बहुधा परस्पर विरोधीच असतात.

नैसर्गिकता फुलपाखरासारखी स्वच्छंद असते. ती बागडत असते, या फुलावरून त्या फुलावर, या झाडावरून त्या झाडावर. तिला छंद असतो सुखाचा अन् बंधन असते इच्छेचे. फार फार तर शारीरिक - मानसिक बलाचे. सुखाच्या शोधातून आरंभ होणारी नैसर्गिकतेची यात्रा सुखाच्या क्षणिक तृप्तीत विश्राम पावते. सुख म्हणजे अनुकूल वाटणारी भावना. तिला देणेघेणे नसते नीति-अनीतिचे. त्यामुळेच की काय, नैसर्गिकता जपणाºया मनाच्या भागाला अर्थात वासनामय मनाला मनोविश्लेषक मनाचा मूलभूत गाभा मानतात.
जगातील बहुतांश व्यक्ती नैसर्गिक आवेगाच्या प्रवाहात नैतिकतेची ऐशीतैशी करताना आढळतात. अर्थात, ते नैसर्गिकच असते म्हणा ना! नाही पटत? मग क्षणभर अशी कल्पना करा की, तुम्हाला अदृष्य होण्याची सिद्धी प्राप्त झाली, तर तुम्ही काय कराल? जे जे सभयतेच्या वा नैतिकतेच्या चौकटीत करणे तुम्हाला शक्य नाही, पण करावे असे तुमच्या मनाला वाटते, ते ते बिनदिक्कत तुम्ही कराल.
नुसत्या अदृश्य होण्याच्या कल्पनेनेसुद्धा तुम्ही ते मनोमनी केले असेल. तेथे ना नैतिकता आडवी येत ना नीतिमत्ता. कारण तेथे असते फक्त नैसर्गिकता. अगदी याउलट नैतिकतेत असते. ती धर्म, मानवता, संस्कार अशा शेकडो बंधनात बांधलेली असते. तिची सुरुवातच मुळी नकारापासून असते अन् शेवट ‘मी नैसर्गिक प्रलोभनांना डावलले’ या समाधानात होतो वा ‘का डावलले?’ या असमाधानात होतो.
नैतिकता माणसाला सुखाने जगू देत नसते. प्लेटो म्हणायचा की, ‘तुम्ही ज्या वेळी चोरून लाडू खात असता, त्या वेळी तुमचे मन तुम्हाला खात असते. लाडूच काय, पण चोरून-लपून आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला खात असते. आपण चुकीचे करतो, अनैतिक करतो, असे मनाला वाटून बोचत राहात असते. बघा नं... अशा कैक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात जाणवतील. जसे आईवडिलांना फसवून प्रियकर-प्रेयसीला भेटणे, प्रेयसीला भेटताना भेटण्याचा आनंद तर असतो, पण त्याच वेळी आपण आई-वडिलांना फसवतो, ही अपराधीपणाची भावनासुद्धा सोबत असते.
नैतिकता प्रत्येक गोष्टीला सभ्यतेच्या चष्म्यातून पाहाते. सभ्यता म्हणजे काय, तर सत्याला आवरण घालून आपण आपल्याशी वा इतरांशी केलेली वर्तणूक, अर्थात अर्धसत्य! भूक लागलेली असताना ती लागलेली नाही, असे दाखविणे सभ्यतेचीच खूण असते.
भूक कोणतीही असू शकते, खाणे-पिणे, इतकेच नव्हे, तर नावलौकिक, मानमरातब, त्याग इ. त्यामुळेच की काय, नैतिकतेपासून सत्य कोसो दूर असते. खरे तर सत्याला कोणाचाच चश्मा चालत नसतो. मग तो धर्म, संस्कृती, मानवता कोणताही असो, चश्मा लावला की सत्य आपोआप दूर होते.
नैसर्गिकता व नैतिकता यातील स्पष्ट भेद सत्याचार अन् शिष्टाचार या दोन शब्दांत व्यक्त करता येतो. मला आठवते, एकदा कोणीतरी बर्नार्ड शॉला विचारले होते, ‘गांधी जगातील सर्वात भद्र पुरुष आहेत, असे अमुक अमुकने म्हटले. आपले यावर काय मत आहे?’ तो चटकन उत्तरला, ‘असतीलही, पण क्रमांक दोनचे.’ ‘मग एक क्रमांकाचा कोण?’ क्षणाचाही विलंब न लावता तो उत्तरला, ‘मी!’ नैसर्गिकता मनाला भावणारे, सत्य वाटणारे सांगते, तर नैतिकता लोकांचा विचार करीत शिष्टाचार पाळते!

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)

Web Title: Natural x ethical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.