MLC Election: सर्वांनाच इशारा देणारे विधानपरिषद निकाल

By तुळशीदास भोईटे | Published: May 24, 2018 04:13 PM2018-05-24T16:13:49+5:302018-05-24T16:13:49+5:30

विधानपरिषदेच्या पाच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचे निकाल आज जाहीर झाले. या निकालांमधून प्रत्येक पक्षाला काही तरी इशारा मिळाला आहे.

MLC Election: Alert to all political parties | MLC Election: सर्वांनाच इशारा देणारे विधानपरिषद निकाल

MLC Election: सर्वांनाच इशारा देणारे विधानपरिषद निकाल

Next

विधानपरिषदेच्या पाच स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निकाल आज जाहीर झाले. भाजपाने दोन, शिवसेनेने दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागी विजय मिळवला. एकही जागा नसलणाऱ्या शिवसेनेला दोन जागा मिळवत २०१९साठी आत्मविश्वास वाढवता आला आहे. भाजपाला दोन जागा मिळवताना अमरावतीला काँग्रेसमुक्त करता आली आहे. तसेच राष्ट्रवादीला एक जागा टिकवता आली आहे. तर काँग्रेसचा पुरता बोऱ्याच वाजला आहे. मात्र असे असले तरी हे निकाल ज्यांना फायदा झाला आहे त्यांना एकीकडे विजयाचा आनंद देत असतानाच काही इशारेही देणारे ठरले आहेत.

सुरुवात सर्वात जास्त फायदा झालेल्या शिवसेनेपासून. शिवसेनेकडे निकाल जाहीर झालेल्या पाचपैकी एकही जागा नव्हती. नाशिकची जागा यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या शिवाजी शहाणेंनी गेल्यावेळी शिवसेनेसाठी लढता लढता गमावली होती. तरीही ती काही शिवसेनेकडे नव्हतीच. त्यातच भाजपाही साथीला नव्हती. तरीही २०७ मतदार सोबत असताना शिवसेनेने बेरजेच्या राजकारणाच्या बळावर राष्ट्रवादीचा पाडाव गेला. खरेतर राष्ट्रवादीकडे स्वत:चे १००, काँग्रेसचे ७१, भाजपाचे १६८ आणि मनसेचे ५ असे २४४ असे बळ होते तर शिवसेनेकडे फक्त २०७. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी आमचा राष्ट्रवादीला पाठिंबा नव्हता असे म्हटले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र नेतृत्वाच्या आदेशाचे दाखले देतच शिवसेनेला पाडायचेच अशी व्यूहरचना सांगितली गेली होती. झाले भलतेच. त्याचे कारण जातीचे राजकारण जसे आहे तसेच काहींबद्दलचा भाजपा लोकप्रतिनिधींच्या मनातील असंतोषही. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या तोंडून सर्वच पक्षांच्या नेत्यांबद्दल आभार व्यक्त करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही उल्लेख झाला, त्यातूनही बरेच काही स्पष्ट झाले. नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्याही मतदारांनी आपापल्या पक्षाच्या श्रेष्ठींना स्पष्ट इशारा दिला की मुंबईत बसून आम्हाला गृहित धरु नका. नाशिकचा पराभव राष्ट्रवादीसाठी तर धडा आहेच, पण त्यातही काहीही करुन शिवसेनेला पाडायचेच असे ठरवलेल्या भाजपासाठी तर नाशिकमधील शिवसेनेचा विजय हा मोठाच दणका.

परभणी-हिंगोलीत शिवसेनेला मिळवलेला विजय हा विजयी उमेदवार विप्लव बाजोरियांचे आमदार पिताश्रींच्या वेगळ्या रणनितीमुळे अपेक्षितच मानला जाऊ लागला होता. त्यातच राष्ट्रवादीने लातूर-उस्मानाबादसाठी ही जागा काँग्रेसला सोडली आणि मग बाजोरियांचे काम आणखीच सोपे झाले. काँग्रेसच्या सुरेश देशमुखांना राष्ट्रवादीची साथ मिळालेली दिसली नाही आणि कमी मतदार असूनही शिवसेनेने ३५ मताधिक्याने भगवा फडकवला. तेथेही राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी त्यांना विचारात न घेता परस्पर मतदारसंघ सोडणाऱ्या आपल्या नेत्यांना स्पष्ट इशाराच दिला.

नाशिक, परभणी-हिंगोली या दोन जागा कमवणाऱ्या शिवसेनेला हक्काच्या कोकणचा निकाल असाच इशारा देणारा. कोकण आपलाच असे मानणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी ही जागा गृहित धरली असावी. तेथे टक्कर सुनील तटकरेंशी आहे. ते सर्व बळ पणाला लावतील. त्यात पुन्हा नारायण राणे भाजपाकडे गेले असले तरी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष १०० जागांसह एक मोठे बळ राखून आहे, याचा विचार झालेला दिसला नाही. त्यात पुन्हा भाजपालाही चुचकारण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न दिसले नाहीत. यासर्वाचा फटका आशा असलेली जागा गमावण्यातून बसला. ४२१ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंना २००च्या फरकाने पराभूत केले. येथे शिवसेनेसाठी इशारा. कोकणाला गृहित न धरण्याचा. 

अमरावती मतदारसंघ. काँग्रेस तेथे लढलीच का? असा प्रश्न पडावा असा एकतर्फी विजय भाजपाच्या प्रवीण पोटेंनी मिळवला. हा विजय भाजपाची यंत्रणा त्यातही प्रवीण पोटेंनी गेली काही वर्षे सातत्याने प्रत्येक मतदार लोकप्रतिनिधीशी ठेवलेला व्यक्तिगत संपर्काचेही फळ आहे. त्यातच उमेदवार मिळत नसल्याने ऐनवेळी घोड्यावर बसवलेले अनिल मधोगरिया फक्त औपचारिकता म्हणून लढले की काय असेच वाटले. काँग्रेसचीही मते त्यांना मिळवता आली नाहीत. किंवा प्रवीण पोटेंमुळे उगाच दुसऱ्याला ती का द्यायची असे काँग्रेसच्याही लोकप्रतिनिधींनी ठरवले असावे. त्यातूनच अनिल मधोगरियांना फक्त १७ मते मिळू शकली. तर प्रवीण पोटेंनी ४५८ मते मिळवत ४४१ मतांनी जणूकाही एकतर्फी विजय मिळवला. त्यापेक्षा निवडणूकच झाली नसती तर बिनविरोध विजय मिळवता आला असता! भाजपाचे बुरे दिन येऊ लागले असून आता आपोआपच आपले अच्छे दिन येणार या भ्रमात वावरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांसाठी हा मोठाच दणका. अमरावतीत पराभव होणे यात धक्कादायक काही नाही, मात्र असा लज्जास्पद पराभव होणे हा दणका आहे. मोठाच दणका आहे. पुन्हा तेच गृहित धरु नका. ऐनवेळी मैदानात उतरुन लढता येत नसते हे बजावणारा. 

एकीकडे अमरावतीत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भाजपासाठी वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघही विजयदायी ठरला असला तरी जसा अपेक्षित होता तेवढा मोठा नाही. एकप्रकारे इशारा देणाराच. फरक एवढाच की कोकणाला गृहित धरणाऱ्या शिवसेनेला तेथे पराभवाचा दणका बसला तर पूर्व विदर्भात बळ जास्त असल्यामुळे भाजपाला ठरवलेल्या मतांपेक्षा चक्क शंभर मते कमी मिळूनही विजय मिळाला. भाजपाने यावेळी उमेदवार बदलला. मुलगा विधानसभेत आमदार असल्याने गेल्यावेळचे आमदार नितेश भांगडिया यांच्याऐवजी संघटनात्मक काम पाहणारे रामदास आंबटकर यांना उमेदवारी दिली. त्यांची संघटनात्मक बांधणी चांगली. मात्र आर्थिक क्षमता तेवढी नाही. जे केले ते पक्षाने. त्यात पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खास शैलीत मतदारांना संदेश दिलेला. त्यामुळे मतदानाच्या दिवशी भाजपाचे आणि इतर असे मिळून ६५० मतांचे समीकरण मांडले गेले, तरी प्रत्यक्षात मतमोजणी झाली तेव्हा भाजपा विजयी तर झाली मात्र ५२८वर अडली. २६२ बळ असणाऱ्या काँग्रेसला ४९१ पर्यंत पोहचता आले. भाजपाला साथ देण्याचा शब्द देणाऱ्या अनेकांनी इंद्रकुमार सराफांच्या हातााला साथ दिली असावी. थोडक्यात विजय मिळाला असला तरी प्रत्येकाला गृहित धरु नका अशी छोटीशी का होईना टीप असलेला. 

एकूणच विधानपरिषदेच्या सहापैकी पाच जागांचा निकाल आज जाहीर झाला तो सर्वच पक्षांना इशारे देणाराच. या निवडणुकीत अर्थशक्तीला महत्व असतेच. आर्थिक देवाण-घेवाणीसाठी ही निवडणूक गाजतेच. पण उमेदवारांच्या वैयक्तिक संपर्कालाही खूप महत्व असते.  तशी ही निवडणूक प्रत्यक्ष मतदारांचा कल अभिव्यक्त करीत नसली तरी राजकीय क्षेत्रातील मुड नक्कीच दाखवते. त्यामुळे मिशन २०१९च्या तयारीत असलेल्या सर्वच पक्षांनी या निकालामधून मिळालेले इशारे समजून घेण्याची आवश्यकता आहे. 

Web Title: MLC Election: Alert to all political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.