जालियनवाला बाग : क्रौर्याचे शतकस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 03:34 AM2018-04-15T03:34:29+5:302018-04-15T03:34:29+5:30

आज १५ एप्रिल २०१८. परवाच्या १३ एप्रिल २०१८ रोजी भारतीय इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट घटनेला ९९ वर्षं पूर्ण झाली आणि त्या भयंकर घटनेने शतकवर्षात प्रवेश केला.

Jalianwala Bagh: Criminal Century Reminder | जालियनवाला बाग : क्रौर्याचे शतकस्मरण

जालियनवाला बाग : क्रौर्याचे शतकस्मरण

googlenewsNext

- विजय तापस

आज १५ एप्रिल २०१८. परवाच्या १३ एप्रिल २०१८ रोजी भारतीय इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट घटनेला ९९ वर्षं पूर्ण झाली आणि त्या भयंकर घटनेने शतकवर्षात प्रवेश केला.
ती घटना म्हणजे अमृतसर ‘जालियनवाला बाग’ इथे ब्रिटिश सत्तेने घडवून आणलेलं भारतीयांचं अतिशय निर्दयी, अमानुष हत्याकांड. या हत्याकांडाने भारतीय समाजात हाहाकार निर्माण होणं, ती एक राष्ट्रीय आपत्ती म्हणून सामोरी येणं आणि ब्रिटिश सत्ताधारी वर्गाबद्दल कमालीची घृणा, तिरस्कार आणि संताप समाजात उफाळून येणं अत्यंत नैसर्गिक, स्वाभाविक म्हणायला हवा. तसा तो व्यक्त झालाही. तत्कालीन सगळे राष्ट्रीय पुढारी, समाजनेते, सामान्य जनता यांना या घटनेने समूळ हादरवून टाकलं. सगळ्यांचा आक्रोश एक होता, जखम एक होती, संताप एक होता आणि जे हकनाक मारले गेले, शहीद झाले त्यांच्यासाठी वाहणारे अश्रू न थांबणारे होते.

अमृतसर शहरातल्या जालियनवाला बागेत जे अमानुष हत्याकांड घडलं त्याला एक धगधगती पार्श्वभूमी होती. आज आपण निरपेक्षपणे इतिहासाकडे पाहिलं तर जालियनवाला बाग इथं झालेलं हत्याकांड ही रक्तरंजित घटनांच्या साखळीतील एक कडी होती असंच आपल्याला दिसेल. १० एप्रिल ते १२ एप्रिल १९१९ या कालावधीत अमृतसर शहरात ज्या घटना घडल्या त्याची अमानुष प्रतिक्रिया म्हणजे जालियनवाला बाग इथे झालेला नरसंहार म्हणता येईल. एका बाजूला स्वातंत्र्यसैनिक आणि दुसऱ्या बाजूला हृदयशून्य ब्रिटिश सरकार. या दोन शक्तींच्या तडाख्यात शेकडो जिवांची आयुष्ये भस्मसात झाली आणि हजारोंना विकलांगता आली.
१० एप्रिलला सकाळी एक संतापलेला निर्धारी घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होतं दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणीचं. डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात ब्रिटिश सरकारच्या वतीने तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला होता. त्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. सरकारच्या निषेधाच्या आरोळ्या आसमंत भेदून जात होत्या. लोक अत्यंत ताणलेल्या मन:स्थितीत आणि उद्दीपित अवस्थेत होते. खरं म्हणजे अशाच वेळी शासकांच्या संयमी वर्तनाची गरज असते. पण असा संयम सत्तादर्प असणाºया सरकारी अधिकारी वर्गाकडे कुठून असणार? तसा तो मुळात नव्हताच.
बघता बघता अगदी अकल्पितपणे सैन्याच्या एका तुकडीने आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला. क्षणात प्रचंड गोंधळ उडाला. बघता-बघता रक्ताचा सडा पडला. आक्रोश टिपेला पोहोचला आणि पाठोपाठ अमृतसर शहराचं रूपांतर अक्षरश: रणभूमीत झालं. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाºया इमारती अग्निनारायणाने एकामागोमाग गिळल्या. टाऊन हॉल, दोन बँकांच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम यांची राख झाली. खाल्ल्या मिठाला जागणाºया गुरखा रेजिमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाच्या एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत जळाले, तर
एका युरोपियन नागरिकाचा भर चौकात खून करण्यात आला.
याच काळात पंजाबमधील इतर भागात हिंसा चालूच होती. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले आणि तारघर-डाकघर-सरकारी इमारती आगीला समर्पित करण्यात आल्या. काही कारण नसताना भावनिक उद्रेकापोटी तीन युरोपियन नागरिकांना जीवे मारण्यात आले. या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी अमृतसरमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.
अशा या वातावरणात १३ एप्रिल १९१९ ची पहाट झाली. पंजाबी बांधवांचा- ज्यात शीख बंधू-भगिनी-मुले यांची संख्या मोठी होती- जो अत्यंत आनंदाचा दिवस, तो बैसाखीचा दिवस साजरा करायला, सामूहिक भजन-कीर्तन-पूजाविधी यात सहभागी व्हायला मोठ्या उत्साहाने सारे बागेत जमले होते. जालियनवाला बागेत एकत्र आलेल्या पुरुष-स्त्रिया-मुलंबाळं यांना अवघ्या काही मिनिटांच्या अवधीत, काही कळण्या-सवरण्याच्या आत अखेरचा श्वास घ्यावा लागला. ही घटना म्हणजे आधुनिक भारतीय इतिहासाला वळण देणारी आणि त्यापूर्वी झालेल्या सामूहिक म्हणाव्या अशा हत्याकांडातील अधिक निर्दयी-निर्मम अशी घटना म्हणवली जाते. त्याला कदाचित एक कारण असंही असेल की, या हत्याकांडात खरोखरच निष्पाप जीव मारले गेले. मात्र त्यांना मारण्याचा पक्का हेतू, पक्की योजना नकळत नाही, तर नीट विचार करून, ठरलेल्या विचारानुसार आखणी करून तयार करण्यात आली होती. या योजनेमागील मास्टरमाइंड म्हणजे ओडायर. त्यानेच डायरला योजना अमलात आणायला प्रोत्साहित केलं. आखलेल्या योजनेची अंमलबजावणी इतक्या नेटक्या आणि तंतोतंत पद्धतीनं करण्यात आली की, अमानुषांच्या अंगी असलेल्या कौशल्यानं जगानं थक्क व्हावं.
जालियनवाला बाग इथे जे हत्याकांड झालं त्याला काही एक पार्श्वभूमी होती. १९१९ याच वर्षात जालियनवाला बाग येथील घटना घडण्याच्या अगोदर ब्रिटिश सरकारने भारतातील क्रांतिकारी घटना आणि व्यक्ती यांना पायबंद घालण्याच्या हेतूने ‘रौलेट कायदा’ संमत करून घेतला होता. सरकारच्या संशयी स्वभावानुसार समाजातील जी जी मंडळी त्यांना संशयास्पद वाटत होती, ज्यांच्याबद्दल सरकारला भय वाटत होतं, त्यांना कसल्याही चौकशीशिवाय अटक करण्याचा सपाटाच सरकारने लावला होता. त्याला अनुसरूनच सरकारनं १० एप्रिल १९१९ पासून डॉ. सत्यपाल आणि डॉ. किचलू यांना अटक करून तुरुंगात डांबले होते. या अटकेची अतिशय तीव्र प्रतिक्रिया समाजात उमटणं स्वाभाविक होतं. समाजात संतापाचा उद्रेक होईल अशी भीती सरकारला होती आणि त्याचमुळे सरकारने जाहीर सभा, संमेलनं, जमावाने एकत्र येणं यावर अमृतसर शहरात बंदी घातली होती. ही अशी संचारबंदी समाजाला अर्थातच रुचलेली नव्हती. प्रतिकार उफाळण्याच्याच बेतात होता. समाजमनात आग भडकलेली होती. ही स्वदेशप्रेमाची आणि स्वाभिमानाची आग सरकारला इतकी छळत होती, की त्यांना प्रत्येक भारतीय क्रांतिकारीच वाटत होता. एका अर्थाने असं म्हणता येईल की, जनरल रेजिनाल्ड डायर याचा विलक्षण संशयी स्वभाव, अतिरेकी मनोवृत्ती, अमर्याद सत्तेमुळे आलेला उन्मत्तपणा आणि भयगंड यांचा एकत्रित परिपाक म्हणजे त्याने घेतलेला सामूहिक हत्याकांडाचा निर्णय होय. डायरच्या कृती आणि मानसिकता यांचा शोध घेतला तर त्याच्या कृतींना अनुसरून मनोविश्लेषण कोणी केलं का आणि त्याचे निष्कर्ष काय होते याची कल्पना नाही, पण डायरने गोळीबाराच्या फैरी झाडण्यापूर्वी बागेचे सगळे दरवाजे बंद करण्याची खबरदारी घेतली होती हे यासंदर्भात लक्षात घेण्यासारखं आहे. सहा ते दहा हजार लोकांना जालियनवाला बागरूपी पिंजºयात कोंडून, त्यांना जीव बचावण्याची एकही संधी न देता त्यांच्या रक्ताचा सडा घालणे, या कृतीतील पाशवीपणा आणि अमानुषता अंगावर काटा आणणारी आहे. या हत्याकांडाची तीव्रता इतकी मोठी होती की, सारा देश हतबद्ध झाला, थरकापला आणि सर्व थरांतून सरकारवरच्या संतापाची आग भडकली.
ब्रिटिश सरकारच्या आकडेवारीनुसार या सामूहिक हत्याकांडात ३७९ व्यक्ती मारल्या गेल्या आणि १२०० जखमी झाल्या. या आकडेवारीतली गोम अशी की, सरकारने मृतांचा जो आकडा दिला, तो ज्या मृतांची ओळख पटविण्यात आली त्यांचा होता. ज्यांची ओळख पटली नाही असे मृतदेह किती होते ते रहस्य अद्यापी उलगडलेलं नाही, असं म्हणता येईल. एवढ्या हत्या झाल्या ते केवळ बागेत बैसाखी साजरी करण्यासाठी जमा झालेल्या लोकांनी जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून. इतिहासात डोकावलं तर असं दिसतं की, असा आदेश जारी झाला आहे याची कल्पना लोकांना नव्हती किंबहुना गावागावातले लोक अशा आदेशाबद्दल अनभिज्ञच होते.
अतिशय योजनाबद्ध रीतीने हे हत्याकांड पार पाडणारा डायर त्याच्या मातृभूमीत या त्याच्या कृत्याबद्दल लोकांची वाहवा मिळवणारा ठरला. ‘हाउस आॅफ लॉर्ड्स’मधील सदस्यांनी त्याला ‘नायक’पदी विराजमान केलं, तर ‘हाउस आॅफ कॉमन्स’ने त्याची निंदा करून त्याला पदावरून दूर करण्याचा ठराव केला. डायरला नायकत्व बहाल करण्यात साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणारा आणि भारताशी दृढ संबंध असणारा रूडयार्ड किपलिंग अग्रभागी होता हे लक्षात घेण्यासारखं आहे. ‘हाउस आॅफ कॉमन्स’ने आग्रह धरला म्हणून जुलै १९२०मध्ये त्याला पदावरून दूर करण्यात आलं आणि त्याला कोणत्याही संबंधाने पुन्हा भारतात न पाठवण्याचा निर्णय झाला. रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर हा परत कधी भारतात येऊ शकला नाही. त्याचा १९२७ मध्ये वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्याच्या मायदेशातच मृत्यू झाला. या हत्याकांडाने एक महत्त्वाची गोष्ट घडली, आणि ती म्हणजे सैन्याच्या एकूण भूमिकेचं आणि वर्तणुकीचं मूल्यांकन करण्यात आलं आणि जमाव हाताळणीसाठी सैन्याला पुन्हा एकदा प्रशिक्षित करण्यात आलं.
या घटनेनं भारतीयांची स्वातंत्र्यकांक्षा नुसती उफाळून आली असं नाही, तर तिला एक निकडीचं विधायक, व्यापक स्वरूप प्राप्त झालं. १९४० मध्ये सर ओडायर, जो जालियनवाला बाग हत्याकांडाचा मूळ सल्लागार आणि सूत्रधार होता त्याची हत्या
सरदार उधमसिंग याने केली आणि या हत्याकांडाचा बदला घेतला.

Web Title: Jalianwala Bagh: Criminal Century Reminder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Punjabपंजाब