का खालसा होतंय आयपीएलमधील युवी'राज'?

By Namdeo Kumbhar | Published: April 3, 2018 02:48 PM2018-04-03T14:48:36+5:302018-04-03T14:48:36+5:30

२०११ च्या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवला होता. त्यावेळी धोनी आणि सचिन यांचीच चर्चा झाली, पण २०११ च्या विश्वचषकाच्या विजयात युवराजचा वाटा सिंहाचा होता हे नाकारता येणार नाही.

Yuvraj Singh's Performance in all IPL seasons | का खालसा होतंय आयपीएलमधील युवी'राज'?

का खालसा होतंय आयपीएलमधील युवी'राज'?

२०११ चा वनडे वर्ल्ड कप आणि २००७ मध्ये टी-२०चा पहिला विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या युवराज सिंगला गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आयपीएलमध्येही त्याची किंमत कमी झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये युवराज पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघाकडून - किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू असलेल्या युवराजला यंदाच्या मोसमात प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने बेस प्राईसला म्हणजे फक्त २ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. २००८ साली आयपीएलच्या पहिल्या मोसमात युवराजने किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले होते. त्यावेळी पंजाबचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. तीन मोसम युवराज पंजाबकडून खेळला. त्यानंतर त्याला २०११ साली पुणे वॉरियर्सने विकत घेतले. त्यानंतर तो आरसीबी आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला. २०१६ साली सनरायझर्स हैदराबादने आयपीएलचे जेतेपद मिळवले त्यावेळी युवराज त्या संघात होता. दोन मोसमात हैदराबादकडून खेळल्यानंतर आता तो पुन्हा पंजाबकडून खेळणार आहे.

बंगळुरूत झालेल्या लिलावामध्ये युवराज सिंगला खरेदी करण्यात कुठल्याही मालकाने फारसा रस दाखवला नाही. काही वर्षांपूर्वी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून युवराजच्या नावाची चर्चा केली जात होती. पण आज त्याच युवराजला एकाही संघमालकाने खरेदी करण्यास रस दाखवला नाही. यामागील कारण नेमकं काय असू शकतं? फिटनेस? तो भारतीय संघातून बाहेर फेकला गेला म्हणून? की त्याची कामगिरी समाधानकारक नाही म्हणून?

२०१५ साली आठव्या हंगामात युवराज सिंगची बोली १६ कोटी होती. एवढी प्रचंड रक्कम युवराज सिंगला मिळाली. पण या मालिकेत तो पूर्णपणे अपयशी ठरला. ज्या अपेक्षेने त्याला १६ कोटी रुपये मोजले, त्या मानाने त्याला आपला खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे त्याच्या अपयशाची खमंग चर्चा रंगली. २०१५मध्ये युवीवर बोली लावणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्सला त्याच्या एका धावेसाठी तब्बल ६.४५ लाखांची किंमत मोजावी लागली होती. मात्र, तरीही दिल्लीच्या पदरात अपयशच पडले. 

२०१४मध्ये युवराजसिंग १४ सामन्यांसाठी तब्बल १४ कोटींत विकला गेला. विजय माल्ल्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने युवीला आपलेसे केले होते. त्यावर्षीही सर्वात महागडा खेळाडू म्हणून युवराजचा बोलबाला झाला होता. २०१३ मध्ये युवराजने पुणे संघाचे नेतृत्व केलं होतं. यावेळी त्याने १३ सामन्यांत २३८ धावा आणि ६ बळी अशी ठीकठाक कामगिरी केली होती. २०१६ आणि २०१७ च्या सत्रामध्ये युवराजने हैदराबाद संघाचे नेतृत्व केलं होतं. हैदराबादने युवराजला सात कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. आयपीएलमधील आपल्या कामगिरीमध्ये युवीला सातत्य राखता आलं नाही. त्यामुळे दर दोन वर्षांनी युवीचा संघ बदलेला दिसतो. आतापर्यंत युवराज पंजाब, पुणे, बंगळुरु, हैदराबाद आणि दिल्ली अशा पाच वेगवेगळ्या संघाकडून खेळला आहे. 

आंतरराष्ट्रीय सामन्यात खोऱ्यानं धावा काढणारा तसेच मोक्याच्या वेळी संघाला विकेट मिळवून देणाऱ्या युवराजला आयपीएलमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 

२०११ च्या विश्वचषकादरम्यान कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लक्षणे जाणवत असतानाही त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. २०११ मध्ये विश्वचषकानंतर लगेचच तो कॅन्सरच्या विळख्यात सापडला. सुमारे एक वर्ष उपचार घेतल्यानंतर युवराजने पुन्हा क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. पण त्यासाठी युवराजला चांगलाच संघर्ष कराला लागला. युवराजने टी-२० बरोबरच वन डे क्रिकेटमध्येही पुनरागमन केले. आयपीएलच्या आठव्या सत्रात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. कॅन्सरपूर्वीचा युवराज आणि आजचा युवराज यामध्ये खूप फरक जाणवतो. त्यानं आपल्या मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरसारख्या आजारावर मात केली. 

युवराजने टी-२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत ६ षटकार खेचून क्रिकेटच्या मैदानात एक इतिहास रचला होता. २००२ मध्ये नेटवेस्ट मालिकेतील इंग्लंडविरुद्धची त्याची खेळी अविस्मरणीय अशीच होती. टी-२० सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम त्याच्याच नावे आहे. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बनच्या मैदानात युवीने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याने यासारख्या अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. युवराजने अर्धशतक केलं की भारत जिंकला हे जणू समीकरणच झालं होतं. २०११ च्या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवला होता. त्यावेळी धोनी आणि सचिन यांचीच चर्चा झाली, पण २०११ च्या विश्वचषकाच्या विजयात युवराजचा वाटा सिंहाचा होता हे नाकारता येणार नाही. युवराजसाखरे जिगरबाज खेळाडू घडण्यासाठी दशकं लागतात पण तसा खेळाडू तयार होत नाही. 

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकविणाऱ्या युवराजच्या हातात बॅट असो वा बॉल कमाल झालीच समजा, असा हा हुकमी एक्का. या हुकमी एक्का आजच्या घडीला वाढतं वय, फिटनेस आणि नव्या येणाऱ्या खेळाडूंशी दोन हात करत भारतीय संघात पुन्हा एकदा येण्यासाठी धडपड करतोय. २०१९ च्या विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी तो अथक मेहनत घेताना दिसतोय. माझ्या मते तर, युवराज सिंग म्हणजे भारतीय संघाला मिळालेले गॉड गिफ्ट अर्थात दैवी देणगी आहे. २०१९ च्या विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी युवीला यंदाच्या आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी लागले. यंदाच्या आयपीएलमध्ये न भुतो न भविष्यति कामगिरी करत भारतीय संघातील दरवाजे पुन्हा एकदा खुले करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. भारतीय क्रीडाप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या या 'पंजाब दा पुत्तर'ला आगामी कामगिरीसाठी शुभेच्छा...!

Web Title: Yuvraj Singh's Performance in all IPL seasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.