‘दु:ख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना...!’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 07:07 PM2018-02-01T19:07:49+5:302018-02-01T19:09:07+5:30

दिवा लावू अंधारात : नऊ वर्ष झाले त्या घटनेला. पाटोदा तालुक्यातील नाळवंडी नावाचे गाव. बालघाटातील परिसरात डोंगराच्या कुशीत वसलेले. ऊसतोडीला गेल्याशिवाय नव्वद टक्के लोकांच्या घरी चूल पेटणे अशक्यच. गावातील रामा पठाडे लेकरा-बाळाचे बिºहाड घेऊन पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी गेलेला. दिवसभर ऊस तोडून थकलेल्या रामाने रात्री उसाच्या फडात आलेले ट्रॅक्टर भरून दिले. कारखान्यावर जाईपर्यंत मागे एक माणूस असावा म्हणून मुकादमाने रामाला उसाच्या भरलेल्या ट्रॉलीवर बसून ट्रॅक्टरसोबत जायला सांगितले. जात असताना दिवसभर काम करून थकलेल्या रामाला झोप लागली. खड्ड्यातून जाताना आदळत ट्रॅक्टर चाललेले होते. एका खड्ड्यातून जाताना ट्रॅक्टर उडाले आणि वर झोपलेला रामा रस्त्यावर खाली पडला. यातच रामाच मृत्यू झाला.

'Two people with tears of sadness ...!' | ‘दु:ख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना...!’ 

‘दु:ख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना...!’ 

googlenewsNext

- दीपक नागरगोजे 

कोपीवर रामाची वाट पाहणार्‍या पत्नी उषा, मुली सीमा आणि ऊर्मिला यांना अपघाताची बातमी समजली. सर्वांनी  टाहो फोडला. रामाचा मृतदेह गावी आणला. दुसर्‍या दिवशी अंत्यसंस्कार झाले. हळहळ व्यक्त करून गाव शांत झाले. अंत्यविधी करून मुकादम कारखान्यावर निघून गेला. रामा देवाघरी गेला; पण मागे अनेक प्रश्न सोडून. अपंग असणारी पत्नी उषा, १३ वर्षांची  शाळाबाह्य सीमा आणि ५ वर्षांची ऊर्मिला या दोन मुलींना रामाने मागे सोडले. चार दिवसांनी सुरेश राजहंस, भगवान भांगे या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी आणि कावेरी नाळवंडीत पोहोचलो. तीन खनाच्या छोट्याशा मातीच्या घरात उषा बोडख्या कपाळाने चिंताग्रस्त अवस्थेत बसलेली. घडलेली सर्व हकीकत उषा आणि तिच्या शेजारी बसलेल्या बाया-बापड्यांकडून ऐकली. ऐकतानाही अंगावर शहारे येत होते.  मुली कुठे आहेत म्हणून कावेरीने विचारले. त्यावर उषा गप्प बसली. ‘जवळ बसलेली दुसरी बाई म्हणाली, म्हटले जमीन किती आहे तुम्हाला...?’ १ एकर पडीक जमीन आहे; पण मुली दुसर्‍याच्या शेतावर कापूस वेचायला गेल्यात..!  दुसर्‍या बाईने हे सांगितल्यानंतर आम्ही थक्क झालो. बाप जाऊन चार दिवसही झाले नाहीत तर मुलींना मजुरी करायला का पाठवले...?  आम्ही केलेल्या या प्रश्नावर माहीत असूनही उषा उत्तर देऊ शकली नाही. रामाचा दहावा घालायलासुद्धा तिच्याकडे पैसे नव्हते, ती काय करणार..? गेली लेकरं कापूस वेचायला..!

किती हे दारिद्र्य? सुरेश आणि भगवान भांगे एका छोट्या मुलाला घेऊन शेतावर गेले. कापूस वेचत असलेल्या लेकरांना घेऊन आले. उषाला मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात विचारले. सीमा तर शाळाबाह्यच होती. ऊर्मिलाच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले. मी म्हटले ‘शाळेत याल का...?’ ऊर्मिला हसून हो म्हणाली, तर गुडघ्यात मुंडके ठेवून बसलेल्या सीमाने मान वर केली नाही. या कुटुंबाकडे असणारी १ एकर जमीनही कुणातरी सावकाराने कर्जात लिहून घेतली होती. आम्ही तिथेच उषासाठी ३० हजार रुपये मदत करण्याचे ठरवले. तसेच सीमा आणि ऊर्मिलाला शाळेत पाठवा, त्यांची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ, असे सांगितले. शेजारी बसलेल्या एका माऊलीने उषाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत पाठवा म्हणून सांगितले. दोन्ही मुलींना दत्तक घेत आम्ही या कुटुंबावर निर्माण झालेल्या भविष्यातील प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. सारे काही ऐकून काय करायचे ते ठरवून आम्ही परत शांतिवनला निघालो. त्या दु:खाने आम्ही इतके सुन्न झालो होतो की, शांतिवनला पोहोचेपर्यंत एकमेकांशी काहीही बोललो नाहीत.

१० दिवसांनंतर आम्ही उषाला ३० हजार रुपयांची मदत दिली आणि ऊर्मिला व सीमाला घेऊन शांतिवनमध्ये आलो. दुसर्‍या दिवशी सीमा आम्ही वयावर आधारित सातवी वर्गात प्रवेश दिला, तर ऊर्मिला बालवर्गात बसू लागली. एकदम सातवीच्या वर्गात बसलेली सीमा शिकताना मात्र बाराखडीपासून शिकू लागली. आपण सातवीत आहोत आणि वर्गातील बाकी मुलांसारखे आपल्याला काहीच येत नाही याची सीमाला लाज वाटायची. शिकणे नको वाटायचे तिला. कावेरी तिला समजावून सांगायची. काही दिवस असेच गेले. नंतर तिने चांगली ग्रीप घेतली. बारावीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केले. पुढे शाळेवर लिपिक म्हणून कार्यरत असणार्‍या शिंदे मामांनी आपल्या एकुलत्या एका मुलाशी सीमाचे लग्न  केले. शिंदे मामांसारखी देव माणसे भेटली की, शांतिवनच्या या कामात हात्तीचे बळ निर्माण होते. आज ऊर्मिला शांतिवनमध्ये ८ वीमध्ये शिकत आहे. सीमाप्रमाणे नाही तर एकूण मुलांत ती पहिली किंवा दुसरी असते. तिला वडील आठवत नाहीत; पण मलाच ती वडील म्हणते. तिला तिची जन्मदाती आई क्वचितच भेटायला येते; पण कावेरीलाच ती आई म्हणते. तिला डॉक्टर व्हायचे आहे. आम्ही तिच्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तुम्ही सर्वजण पाठीशी राहून सहकार्य करीत आहात म्हणून...
 (deepshantiwan99@gmail.com )

Web Title: 'Two people with tears of sadness ...!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.