International Yoga Day 2018 :  प्राणायाम मुळासकट आजार नष्ट करते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:08 PM2018-06-21T14:08:50+5:302018-06-21T14:10:22+5:30

प्राणायाम : जगातील कोणत्याही ‘पॅथी’मध्ये मानवी शरीरातील आजार समूळ नष्ट करण्याची शक्ती नाही. केवळ प्राणायाम कोणताही आजार मुळासकट नष्ट करू शकते. प्राणायाम ही निसर्गाची लाभलेली अमूल्य देणगी असल्याचे मत योगतज्ज्ञ डॉ. गिरीधर करजगावकर यांनी जागतिक योग दिनानिमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. 

International Yoga Day 2018: Pranayama destroys disease completely | International Yoga Day 2018 :  प्राणायाम मुळासकट आजार नष्ट करते

International Yoga Day 2018 :  प्राणायाम मुळासकट आजार नष्ट करते

googlenewsNext

- राजेश भिसे, औरंगाबाद

जगातील कोणत्याही ‘पॅथी’मध्ये मानवी शरीरातील आजार समूळ नष्ट करण्याची शक्ती नाही. केवळ प्राणायाम कोणताही आजार मुळासकट नष्ट करू शकते. प्राणायामचे मूळ पतंजली असून, ही एक परंपरा आहे. दुर्धर आणि औषधी उपलब्ध नसलेले अनेक आजार आपण प्राणायामच्या माध्यमातून दूर केले आहेत. प्राणायाम ही निसर्गाची लाभलेली अमूल्य देणगी असल्याचे मत योगतज्ज्ञ  डॉ. गिरीधर करजगावकर यांनी जागतिक योग दिनानिमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. 

डॉ. करजगावकर यांनी ‘प्राणायाम’ या विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी. केली असून, ते सध्या याच विषयात पीएच.डी.चे गाईड आहेत. राज्याच्या आयुष समितीवर सदस्य आणि जळगाव विद्यापीठात परीक्षकदेखील आहेत. डॉ. करजगावकर म्हणाले की, प्राणायाममध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक असे दोन प्रकार आहेत. योगासनामध्ये ईहम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे प्रकार आहेत. योगासनामध्ये ऊर्जा खर्च होते, तर प्राणायाममुळे ऊर्जानिर्मिती होते. चालणे, बोलणे, विचार करणे यावर ऊर्जा खर्च होत असते. शरीरातील प्रत्येक सेलला योग्य त्या प्रमाणात ऊर्जा म्हणजेच आॅक्सिजन पुरवठा झाला तरच आजार होत नाहीत. कोणत्या अवयवाची ऊर्जा कमी होते, त्यावर आजार ठरतो आणि तेच निरोगी शरीराचे मूळ आहे. ध्यान, धारणा आणि समाधीमध्ये ऊर्जा वाचविली जाते, तर प्राणायाम अतिरिक्त ऊर्जा निर्माण करते.  जगभरात लोकांनी प्राणायाम आणि ध्यान अकारण वाढवले आहे. शतपथ या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आढळतो. रक्तदाब, मधुमेह, तणाव आणि लठ्ठपणा यावर आपण संशोधन केले. प्राणायामच्या माध्यमातून या सर्वांवर नियंत्रण मिळवता येते. या चारही विषयांमध्ये केलेल्या संशोधनात ९९.९९ टक्के रिझल्ट मिळाले.

आजार आपणच निर्माण करतो. निसर्गचक्राच्या विरोधात गेले की आजार बळावतात. विशेष म्हणजे जगातील कोणत्याही ‘पॅथी’मध्ये आजार समूळ नष्ट करण्याची ताकद नाही. पॅथींच्या उपचारातून आजारावर नियंत्रण ठेवता येते; पण केवळ प्राणायाम कोणताही आजार समूळ नष्ट करू शकते. प्राणायामचे मूळ हे पतंजलीमध्ये आहे. पतंजली ही परंपरा असून, शेवटची पतंजली ही नागालँडमध्ये होती. पतंजली, व्यास आणि गौतम ही परंपरा होऊन गेली आहे. त्याकाळी या परंपरेत शास्त्रज्ञ होऊन गेले. इतिहासातील उल्लेखानुसार आतापर्यंत चार पतंजली होऊन गेले आहेत. यात अनेकांनी भर टाकली आणि यातून अष्टांगयोग तयार झाला.

पतंजलीवर आधारित अष्टांगयोगामध्ये हटयोग, गिरंडसहिता, दत्तात्रयाचे संप्रदाय, याज्ञवलकर, वशिष्ठयोग आदी मिळून २८ प्रकारचे योग आहेत. याची मोडतोड करून ते ७ हजारांपर्यंत नेण्यात आल्याचेही ते सांगतात. कोणत्याही आजाराची सुरुवात ही थकव्यापासून होते. मानवी शरीरातील प्रत्येक सेलमध्ये ३२ लाख जीन आहेत. आतापर्यंत केवळ दीड लाख जीन विज्ञानाला माहिती आहेत. उर्वरित जीनचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. सेलचे स्पाँटेनियस, मिस सेन्स, नॉन सेन्स आणि म्युटेशन हे चार प्रकार असतात. या प्रकारांतून सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची की नकारात्मक हे ठरते. यातूनच शरीरात विकार तयार होतात. सकारात्मक ऊर्जेमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, तर नकारात्मकतेमुळे विकाराची उत्पत्ती होते. यातून वेगवेगळ्या आजारांची लागण होत असल्याचे डॉ. करजगावकर म्हणाले.

आतापर्यंत आपण कर्करोगाचे १५ रुग्ण ठीक केले आहेत. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते सामान्य जीवन जगत आहेत. प्राणायाममध्ये नैसर्गिकरीत्या ऊर्जा असून, यामुळे मानवी जीवन सुकर होऊन आजारमुक्त होते. आपण केवळ प्राणायामवर २५० पानांचे पुस्तक लिहिले आहे. तीन आवृत्त्या संपल्या असून, चौथी आवृत्तीही लवकरच येत आहे. तसेच इंग्रजी भाषेतून पुस्तक लिहिण्याचा विचार डॉ. करजगावकर यांनी बोलून दाखवला. 

असाध्य व औषधी उपलब्ध नसलेले आजार दूर
प्राणायामच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे हृदय, फुप्फुस, यकृत आदींचे असाध्य आजार वा उपचार आणि औषधी नसलेले आजार दूर केले आहेत. अनेकांच्या उच्च रक्तदाबाच्या गोळ्या बंद झाल्याचा दावा डॉ. करजगावकर यांनी केला.

या प्राणायामचे साईड इफेक्ट
भस्त्रिका : या प्राणायाम प्रकारात उच्च रक्तदाबाच्या गोळ्या सुरू असेल, तर हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे; पण पुढे काहीच उपचार केले नाहीत, हर्निया, डोळ्यांचे, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, तर अर्धांगवायूचा झटका आलेला असेल, तर भस्त्रिका हा प्राणायामचा प्रकार करूनये. 
वज्रासन : गुडघ्याचा सांधा बदलला असेल, पायाचे फ्रॅक्चर झाले असेल, हाडाचे जॉइंट टोकदार झाले असेल, तर या लोकांनी वज्रासन करूनये, असा सल्ला डॉ. करजगावकर यांनी दिला आहे. 

प्राणायाम क्रियेतील टप्पे
- संथ, हळुवार, दीर्घ श्वास रोखणे अर्धावेळ
- गुद्द्वार आकुंचन करून श्वास नाकाद्वारे बाहेर सोडावा
- श्वास सोडल्यानंतर थोडा वेळ थांबणे
- ७ सेकंद प्रत्येक प्राणायाम करावा.

Web Title: International Yoga Day 2018: Pranayama destroys disease completely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.