पुन्हा नवी चाल कर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 06:45 PM2018-03-24T18:45:44+5:302018-03-24T18:47:19+5:30

वर्तमान : ‘बरे झालो देवा कुणबी केलो नाही तरी असतो दंभेची मेलो’ हे उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवायचे दिवस गेल्या काही दशकांनी ‘सापाने बेडूक गिळावं तसं गिळून टाकले’. अंगावर येणार्‍या  वर्तमानात करुण व दयनीय स्थिती कोणाची असेल तर ती मातीत राबणार्‍या माणसांची. कधी अस्मानी कधी सुलतानीचे ‘पाश’ गळ्याभोवती घेऊन तो लढतो आहे काळासंगे. पण निपजत नाही या वांझोट्या मातीतून त्याच्यासाठी पुन्हा ‘सुपीक’ हंगाम. उलट दिवसेंदिवस खंगतच चालले त्याचे ‘वर्तमान’; दिसतही नाही ‘भविष्य’ अन् नाही कोणालाही त्याचे सोयरसुतक. तू मोर्चा काढ, तू आक्रोश कर, तू मैलोन्मैल पायपीट कर, तू आणखी काही कर; आम्ही पाडू आश्वासनांचा पाऊस. कारण एकच खरे तुझेच तुझे उरले नाही पाठचे वारस तुझ्या पाठीवरचे ‘वळ’ आपले मानायला. जळत्या घरातून उड्या मारावीत तशा मारल्या उड्या ज्यांनी तेही विसरले ‘घराला’ लागलेली ‘आग’ विझवायला. तुज्याच खांद्यावर उभं राहून जग पाहणार्‍या पिढ्याच ‘बेईमान’ झाल्या या मातीला....! याचे कारण ही तसेच ‘बापा’ तुला स्वातंत्र्यानंतर होता आले नाही मतपेटीत बंदिस्त ‘शेतकरी’ म्हणून.

Play again again..! | पुन्हा नवी चाल कर...!

पुन्हा नवी चाल कर...!

googlenewsNext

-  गणेश मोहिते

तू ओळखलं नाही तुझे फक्त ‘कुणबी’ असण्याचे महत्त्व. तुला ठरवता आला नाही तुझा भाव. तू विखुरलास ठिबक्या ठिबक्यासारखा. तुझी बोली लावणं झालं सोपं. तू ठरला अडाणी, गावंढळ या ‘व्यवहारी’ जगात. तुला कळालीच नाही तुझ्या ‘कुणबी’ असण्याची ताकद! तू पांगलास जातीतपातीत आणि गणितं सोपी झाली बघ सर्वच दलालांची. तुझी लावली इतरांनीच ‘बोली’ वस्त्या-वस्त्यात निवडणुकांचे हंगाम पाहून, बाकी तुझ्या कष्टांचा आणि घामाच्या ‘दामा’चा येतोच कुठे संबंध तुझे ‘मत’ पेटीत बंद झाल्यावर. तेव्हा तू उरतोस फक्त एक फाटका ‘इसम’ तुझ्या जातीच्या वस्तीत. म्हणून वर्षभर तुलाही आता लावावी लागते रांग तूच पिकवलेल्या पसाभर धान्यासाठी; किड्यामुंग्याप्रमाणे केशरी रंगाचे सरकारी कार्ड हातात घेऊन स्वत:लाच ‘आधार’ देत स्वस्त धान्य दुकानापुढे. बघ कसा ‘काळ’ उलटलाय तुझ्यावर आणि तो गिळत चालला रांगेतला एक एक ठिपका. तसा तू आणखी काळा ठिक्कर पडला. हतबल झालास. ‘धूळपेर’ करून वांझोट्या ढगांनाही ‘रोहिण्या’तच प्रसवकळा आणणारा तू आणि तुझा तो दुर्दम्य ‘आशावाद’ मातीत गाडून जेव्हा तूच परागंदा होऊ लागलास तेव्हा नियतीनेही साथ सोडली तुझी लक्षात ठेव! मग तूच ठरव आता लढायचे? की असे रणांगण सोडून पळायचे? तू पळ काढला म्हणून प्रश्न सुटणार नाहीत. तर लढून सुटतील हेही लक्षात घे! तोच तुझा खरा वारसा.

भले या जगरहाटीत तुला कोसागणिक ‘वामन’ भेटेल. पण तुला तो आता ओळखता आला पाहिजे. तुला ‘पातळा’त घालू पाहणारी व्यवस्था उखडून फेकता आली पाहिजे. ऐन हंगामात येणारे पांढरे ‘बगळे’ आणि खुर्चीत बसून तुझे रक्त शोषणारे ‘गोचीड’ तुला ठेचता आले पाहिजेत. तेव्हा ते होतील नव्या क्रांतीचा नायक. पण फक्त आताशा धीर धर अन् समजून चाल की ‘काळ’ सदा सारखा नसतो. उन्हामागून सावली, सावली मागून ‘ऊन’हा खेळ चालूच असतो आयुष्यात. ऐसे कित्येक दर्दभरे ‘हंगाम’ पालथे घातलेत तुझ्या पूर्वजांनी जरा याद ठेव. नाही तरी ‘नांगरून टाकलेल्या काळ्या माथ्यावरची ठेकळं वैशाख उन्हात तळून निघावीत’ तसा आतून बाहेरून भाजून निघतच असतो देह तुझा.. तुझ्यासाठी ऊन-पाऊस-वारा हे नवं नाही.

पण फक्त आता दृष्टी तितकी बदल. ‘वहिवाट’ चालावी म्हणून करूनको कुणबीक. तर कूस बदल. हवा बदलली तू बदल, तिचा रंग-रूप-गंध ओळख अन् हो तिच्यावर स्वार. तुझ्यातला ‘बळीराजा’ होऊ दे जागा आणि फिरव ‘नांगर’ तुला नागवणार्‍या कुळांवर. खणून काढ ही हरळ, कुंदा आणि मातीच्या पोटात खोलवर गेलेली यांची मुळं एकदाची. ‘संगरा’ ची कधी होती तुला भीती म्हणून आता तू दूर पळतो आहे. ‘हरऽऽहर महादेव’ म्हणत तूच बांधलेस पराक्रमाचे किल्ले आणि तूच रचलेस तुझ्या शौर्याचे पोवाडे. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ विसरूच कसा शकतोस तू ही सिंहगर्जना. आता निदान एक कर झाले गेले विसर, पुन्हा नवा करार कर नियतीशीच. विझता विझता सावरण्याचे बळ दे म्हणावं स्वत:ला. तुझ्या जाण्याने कोणतेच हंगाम पिकत नाहीत भरभरून याची याद ठेव..!

तू गेल्यावर होते काय?..तर आकाशभर शोधत असते चिल्यापिल्यांची नजर तुला, अंगावर आलेल्या उन्हाने येते अकाली प्रौढत्व तुज्या बछड्यांना, उघड्या पडलेल्या संसारावर चोचा मारतात कावळे-गिधाडं, तोडतात लचके तुझ्या फाटक्या संसाराचे. रोज मरत मरतच जगतात तुझ्या मागची माणसं तुझ्याविना. कुठून येणार ‘बळ’ त्यांच्या पंखात, तिचे पांढरं कपाळ सांगत असतं तुझ्या पळपुट्यापणाच्या खुणा. ती मात्र त्यातच शोधत असते तुझे अस्तित्व तासन्तास वावरभर. ‘ठेकुळ’ झालेला तुझा काळा ठिक्कर देह तुला होऊ देत नाही नजरेआड; पण तू टाकून गेला उघड्यावर याचीही ‘सल’ बोचत असते तिला खोलवर अंत:करणात. म्हणून असा...पाठमोरा होऊ नको भरल्या ताटाला.. तुला आकाशभर शोधणार्‍या चिल्यापिल्यांच्या नजरेत स्वत:चा  श्वास भर... त्यांच्या पंखांना बळ दे.. पुन्हा नवी चाल कर. देणार नाहीत कोणीच तुला राबणारे हात.. तूच राबता हो..नको पसरू ‘हात’ या ओसाड माळरानावर..फाटके खिसे इथे सगळे. उलट तूच टाकत आलाय पिढ्यान्पिढ्या यांच्या पदरात ‘माप’ याचं भान ठेव. ‘काळ’ उलटला म्हणून असा ‘डाव’ मोडू नकोस. बदलेल काळ थोडी हिंमत ठेव अन् पुन्हा नवी चाल कर..!

( dr.gamohite@gmail.com )

Web Title: Play again again..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.