Inner voice | आतला आवाज
आतला आवाज

- ज्योती कदम 

अंतरीचे सगळे आवाज गूढ मौन पांघरून दडून बसतात भित्र्या सशासारखे मनाच्या तळाशी. नि:शब्दांचं पांघरून घेऊन. खरं तर या आवाजाला हवा असतो घुंगूरवेडा साज सतत छुमछुमत रहाणारा. हवी असते स्वत:शीच गिरकी घेणारी रुणझुण फिरकी; पण असंख्य इतर आवाजांनी दबून जातं हे सगळंच; पण एखादं बेट गवसतंच. जोरानं ओरडलं तरी किंवा नुसता श्वास चालू राहिला तरी प्रतिध्वनित होणारं. स्वत:चं असं स्वत:तच तादात्म्य पावणं खूप गरजेचं ठरतं. नवीन काही शोधू पाहताना. भोवतालच्या सगळ्या सृष्टीपासून वेगळं होत जाणं जमलं, की हा आतला आवाज गवसतोच गवसतो आणि सोबत नव्यानं गवसतं आपल्याच आतलं आणखी एक अस्पर्शी बेट. आपल्याचसाठी आसुसलेलं. मनाची नवीन आवर्तसारणी मात्र शोधावी लागते आणि एकेका कोष्टकात नीतनवा ऋतू मात्र सहजी बसवावा लागतो आपणच आपल्यासाठी. आपल्यातली नवऊर्जा अखंडित वाहत राहण्यासाठी.

 या बेटाला स्वत:चा आवाज नसतो असं नाही; पण याला प्रतिध्वनित होणं जास्त आवडतं. इतकी निगर्वी तादात्म्यता लाभलेलं बेट गवसणं तसं दुर्मिळच; पण एकदा असं बेट गवसलं, की त्याचं मौन आणि स्वत:चा अखंड बिनधोक संवाद अधाशीपणानं भरून ठेवावा एखाद्या मोतीशंखात... हवं तेव्हा काळजाशी कवटाळून ऐकून घ्यावं हे संगीत. डोळ्यांच्या सार्‍या पायवाटा खुश्शाल मोकळ्या सोडाव्यात. हवं तर वाहून टाकावेत डोळेही. कार्तिक पौर्णिमेच्या सांजसमयी नदीत सोडतात ना ताफ्यावरचे दिवे. तसे हे दोन डोळे. आपल्या आतला समुद्र करता आला, तर जरूर करावा बंदिस्त या अशा मौन मोतीशंखात. सगळ्या कोलाहलापासून दूर. खूप दूर... एका वत्सल बेटावर. आभाळातल्या चंद्राच्या प्रतिबिंबासह वाहत जाणारे आपले दोन डोळे आणि त्या बेटाच्या हातात हात देऊन शांत पहुडलेला आपला आवाज. मनातल्या असीम शांततेचा.

हा आवाज कधी अनिवार लाटांसारखा, तर कधी धीरगंभीर वार्‍याच्या नाजूकशा झुळकेसारखा... कानात साठवत नि हृदयात गोंदवत डोळे बंद करून चिरशांतता अनुभवावी. गाण्याची लांबलचक तान घेत घेत समेवर येणार्‍या गायकासारखं हळूच उतरवावं मनाला मनाच्याच रेताळ फेसाळलेल्या भुईवर. गोंजारून घ्याव्यात गाण्याच्या ‘बीटवीन द लाइन्समधील’ सगळ्या रिकाम्या जागा आपल्याला हव्या त्या अर्थानं आशयाचं प्रावरण बाजूला सारत किंवा अर्धविराम,पूर्णविराम, प्रश्नार्थक, उद्गारवाचक चिन्हांशिवाय वाहत राहू द्यावेत सगळे शब्द. फक्त त्यांच्या अंगभूत आवाजासहित. मनाच्या आतल्या मनावर हळूच चढत जाईल दाट साय या आवाजाच्या प्रतिध्वनींची. हे प्रतिध्वनी हळूच उंडारत येतील मनाच्या बाहेर. कदाचित खेळत राहतील आपल्याच अंगा-खांद्यावर किंवा तुडवून-तुडवून पार लोळागोळा करतील मनाच्या चिखलाचा. मनाचा खुश्शाल होऊ द्यावा चिखल. गाळात रुतलेलं सगळं करकचून बांधलं तरी जाईल किंवा एकरूप तरी होईल स्वत:तच!

आपल्या आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या अपूर्णांकाची बेरीज करीत पूर्णांकात उत्तर देणारी ही एकरूपतेची नवी कसोटी. कोणत्याच गणितात न सापडणारी. या अद्भुत कसोटीचं स्वागत करीत संपूर्ण सृष्टीच मग कवेत घेऊ पाहते या ऊर्जेला आतल्या आवाजासकट. आत्मभानाचं हे नवं आत्मपर्व इतिहास घडवू शकतं. फक्त गरज आहे ती आपल्या आतला आवाज ऐकण्याची!

(Jyotikadam07@rediffmail.com)


Web Title: Inner voice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.