जाणिवेचे रुपांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 07:40 PM2018-08-02T19:40:48+5:302018-08-02T19:43:14+5:30

ध्यान : ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे असे नाही तर प्रत्येक कामातच परमेश्वराला पाहणे. आपण फक्त आनंदाने काम करायचे व फळाचा निर्णय परमेश्वराला घेवू द्यायचा. 

Knowledge conversion | जाणिवेचे रुपांतरण

जाणिवेचे रुपांतरण

Next

- माऊलीजी

'काहीतरी करणे' म्हणजे ध्यान नाही. 'काहीच न करणे' म्हणजे सुद्धा ध्यान नाही. काहीच न करण्यातून सर्व काही करणे म्हणजेच ध्यान होय. आपण करायचे काहीच नाही फक्त वाहू द्यायचे, म्हणजेच कर्म करायचे व कर्त्याचा भाव विलीन करायचा. एकदा ही जाणीव झाली की जे काम करत असताना आधी तणाव येत होता त्याच कामातून आपल्याला आत्मिक समाधान व आनंद मिळतो. यातून जीवन तृप्ततेने जगायला सुरवात करतो. 

एका लाकुड तोड्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरही तो तेच काम करत राहिला. लोकांनी त्याला विचारले की आताही तू तेच काम करतो आहेस मग तुझ्या आत्मज्ञानाचा काय फायदा ? लाकुडतोड्या हसला आणि म्हणाला, ''पहिलेही मी लाकडे फोडायचो आणि आताही लाकडेच फोडतो पण आत्मज्ञानामुळे एक महत्त्वाचा बदल माझ्या कामात झाला आहे. तो म्हणजे पहिले मी लाकडे फोडायचो आता लाकडे फोडल्या जातात. यामुळे पहिले मी कामानंतर थकायचो आता मात्र कामानंतरही मी आनंदी व ताजातवाना राहतो.'' 

यालाच ध्यानावस्था म्हणतात. तुम्ही फक्त 'मी' ला सोडा, रिक्त व्हा, अस्तित्वातील परमात्मारूपी उर्जा तुमच्यातून वाहायला लागेल. तुम्ही फक्त माध्यम बना व तुमच्याद्वारे 'त्याला' कार्य करू द्या.. कामाचे रूपांतर ध्यानात होईल. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे असे नाही तर प्रत्येक कामातच परमेश्वराला पाहणे. आपण फक्त आनंदाने काम करायचे व फळाचा निर्णय परमेश्वराला घेवू द्यायचा. 

जेव्हा 'तुम्ही' असता तेव्हा परमात्मा नसतो व जेव्हा तुम्ही संपता तेव्हा फक्त 'तोच'  असतो. अहंकार संपला, मीपणाचा भाव संपला की जिकडेतिकडे तोच जाणवतो. जीवाचे शिवाशी मिलन होते. या एकत्वालाच ध्यान म्हणतात. हा प्रत्येक क्षणाचा अनुभव आहे. ध्यान हा कधीच न संपणारा प्रवास आहे, जीवन जगताना सदोदित जागृक राहून कामाला परमेश्वराला समर्पित करण्याचा..! ध्यान जाणिवेचे रुपांतरण आहे. 'मी' च्या जाणिवेतून परमात्माच्या जाणिवेत राहणे म्हणजेच ध्यान.

Web Title: Knowledge conversion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.