‘शहीद मेजर प्रफुल्ल अमर रहे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:36 AM2017-12-26T00:36:32+5:302017-12-26T00:36:51+5:30

काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेले भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचे पार्थिव रविवारी रात्री ११ वाजता पवनी नगरात पोहोचले.

'Shahid Major Praful Amar Rai' | ‘शहीद मेजर प्रफुल्ल अमर रहे’

‘शहीद मेजर प्रफुल्ल अमर रहे’

Next
ठळक मुद्देआसमंत निनादला : पवनीत शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार

अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेले भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचे पार्थिव रविवारी रात्री ११ वाजता पवनी नगरात पोहोचले. पार्थिवाच्या प्रतीक्षेत ‘शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर अमर रहे’ अशा घोषणा देत हजारो नागरिक रस्त्याच्या दुतर्फा नागपूर मार्गाकडे एकटक लावून वाट पाहात होते. पार्थिवाचे अंतिम दर्शन प्रथम कुटुंबीयांनी व त्यानंतर नागरिकांनी घेतल्यानंतर वैजेश्वर घाटाकडे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचे स्वगृहापासून स्मशानभूमीपर्यंत नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आपल्या लाडक्या सुपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी रात्रभर जागले.
रात्री १२ वाजता वैजेश्वर मंदिरासमोर अंतिम दर्शन व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सजविलेल्या चबुतºयावर शवपेटी ठेवण्यात आली. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार नाना पटोले, आ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, पवनीच्या नगराध्यक्ष पुनम काटेखाये, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., द गार्डस कामठीचे युनिट प्रमुख संजोग खन्ना, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नितीन पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, पोलीस निरीक्षक एस. बी. ताजणे, पवनी नगरविकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, अ‍ॅड.आनंद जिभकाटे, न.प. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, न.प.चे सर्व नगरसेवक या सर्वांनी पुष्पचक्र वाहून लाडक्या सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
वैजेश्वर घाटावरील स्मशानभूमीवर द गार्डस् कामठीच्या तुकडीने मानवंदना देऊन बंदुकीतून फैरी झाडल्या. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने मानवंदना देऊन बंदुकीच्या फैरी झाडल्या. रात्री १.४८ वाजता शहीद मेजर प्रफुल यांच्या पार्थिवाला त्यांचे काका युवराज मोहरकर यांनी मुखाग्नी दिली. त्यावेळी प्रफुलचे वडील अंबादास मोहरकर, आई सुधाताई मोहरकर, पत्नी अबोली मोहरकर, भाऊ परेश मोहरकर, भावजय शुभांगी मोहरकर, सासरे विजय शिंदे, मेहुणे अभिषेक शिंदे व आप्तस्वकीयांसह संपूर्ण पवनीवासीय आणि भंडारा जिल्ह्यातील हजारावर जनसमुदाय उपस्थित होता. पवनी नगरातील जनतेने साश्रुनयनांनी आपल्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खी रात्र जागुन काढली. पवनीसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला.
अंत्यसंस्कारासाठी सजले वैजेश्वर घाट
ऐतिहासिक स्वच्छता म्हणावी असे पवनी येथील वैजेश्वर घाट स्मशानभूमी स्वच्छ व प्रकाशमय करण्यासाठी पवनी नगर परिषदेचे पदाधिकारी व पवनी विद्युत वितरण कंपनीचे अधिकाºयांनी रविवारला दिवसभर परिश्रम घेतले. शांतता व सुरक्षेसाठी पवनीचे पोलीस मोहरकर यांच्या घरापासून वैजेश्वर घाटापर्यंत बंदोबस्तात व्यस्त राहिले. हे आपले स्वत:चे काम या भावनेतून सर्वांनी कार्य केले. शहीद मेजर प्रफुल्ल यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात कोठेही कमीपणा राहू नये, यासाठी पवनी नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, नगराध्यक्ष पुनम काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी, विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता के. मदन नायडू त्यांचे सहकाºयांनी परिसर स्वच्छता व प्रकाश व्यवस्थेसाठी दिवसभर व्यस्त दिसून आले.

Web Title: 'Shahid Major Praful Amar Rai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.