भंडारा : शेतावर मजुरीसाठी येत असलेल्या २१ वर्षीय पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाच्या आणाभाका देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात तिला दिवस गेल्याने समाजात बदनामी होईल या भीतीने आरोपी युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना लाखनी तालुक्यात घडली.

पीडित २१ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून सोपान गजानन बोरकर (२५) रा.खेडगाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित मुलगी व आरोपी हे दोघेही एकाच गावातील असून पीडिता आरोपीच्या शेतावर नेहमी मजुरीच्या कामावर जात होती. यात दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान युवकाने पीडितेला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात मुलीला दिवस गेल्याने सध्या ती सहा महिन्याची गर्भवती आहे. दरम्यान पीडित मुलीने आरोपी सोपानकडे लग्नाची मागणी केली. मात्र त्याने नेहमी उडवाऊडवीची उत्तरे दिल्याने ही बाब एव्हाना गावात सर्वांना माहित झाली. यामुळे बदनामी झाल्याने आरोपी सोपानने शेतातील झोपडीत असलेली कीटकनाशक औषधी प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

पीडित मुलीने तिची फसवणूक झाल्याप्रकरणी सोपान बोरकरविरुद्ध सोमवारला लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान आरोपी सोपानची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सत्यराज हेमने, मयूर सिंगनजुडे, महेंद्र उपरीकर करीत आहेत.