श्रीराम आख्यान: त्रिवार जयजयकार रामा... जोवर सूर्य-चंद्र आणि पृथ्वी आहे, रामनामाचा दीप तेवत राहील!

By देवेश फडके | Published: April 17, 2024 01:04 PM2024-04-17T13:04:20+5:302024-04-17T13:08:27+5:30

Shriram Aakhyan: राम नाम अविनाशी आणि व्यापक रूपाने सर्वत्र परिपूर्ण आहे. श्रीरामकथेची महती अन् रामनामाचे महात्म्य कालातीत आहे.

shriram aakhyan know about amazing importance of lord shri ram and ram naam in kalyug shri ram katha trivar jayjaykar rama | श्रीराम आख्यान: त्रिवार जयजयकार रामा... जोवर सूर्य-चंद्र आणि पृथ्वी आहे, रामनामाचा दीप तेवत राहील!

श्रीराम आख्यान: त्रिवार जयजयकार रामा... जोवर सूर्य-चंद्र आणि पृथ्वी आहे, रामनामाचा दीप तेवत राहील!

Shriram Aakhyan: कलियुगाची अवघी काही हजार वर्षे लोटली आहेत. आणखी लाखो वर्षे जाणे बाकी आहे. अवघी काही हजार वर्षे लोटूनही समाज, देश आणि विश्वात आश्वासकता, सकारात्मकता, सत्य काही प्रमाणात मागे पडताना दिसत आहेत. भाऊ भावाला विचारत नाही, कुटुंबातील कलह, समाजातील द्वेष वाढताना दिसत आहेत. देशादेशांमध्ये वैर, वर्चस्व आणि सुडाची भावना वाढत असल्याचे चित्र आहे. अनिश्चिततेत मोठी वाढ झाली आहे. मात्र, एक आशेची पणती हे विश्व उजळवून टाकण्याची क्षमता आणि दृष्टी ठेवते. आजच्या काळात अनेक सकारात्मक बाजूही दिसतात आणि नकारात्मक बाजूही दिसतात. मात्र, नकारात्मक बाजूचे पारडे कधी कधी झुकताना दिसते. अशा परिस्थितीत माणसाला एक आशा लागते आणि ती आशा म्हणजे श्रद्धा, आस्था आणि विश्वास. 

त्रेतायुगात रामायण घडले असे मानले जाते. त्यानंतर द्वापारयुग अवतरले. यात महाभारत घडले आणि आता कलियुग सुरू आहे. रामायण काळातील जेवढे आदर्श, नीतीमत्ता, बंधुत्व, आपलेपणा, नातेसंबंध, कुटुंब, रामराज्य यांचे जेवढे टिकून होते. त्या सगळ्याचा ऱ्हास हा महाभारत काळात झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही युगांमध्ये श्रीविष्णू यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अवतार धारण केले. वास्तविक पाहता रामायण आणि महाभारताला हजारो वर्षे उलटली आहेत. मात्र, तरीही या दोन्हींबाबतची अविट गोडी अद्यापही कायम आहे. रामायण आणि महाभारताचा कालखंडही वेगवेगळा आहे. दोन्हींमध्ये दोन युगांचे अंतर आहे. तरीही दोन युगांमधील सर्वश्रेष्ठ घटना म्हणून आजही त्यांकडे पाहिले जाते. वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले असून महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले आहे. रामायण कालखंडात श्रीविष्णूंचा सातवा रामावतार झाला आणि महाभारताच्या कालखंडात श्रीविष्णूंनी आठवा कृष्णावतार धारण केला. मर्यादेचा आदर्श म्हणजे श्रीराम, तर मुसद्देगिरीचा कळस म्हणजे श्रीकृष्ण. एकाने स्वतः शस्त्र हातात घेऊन पराक्रमाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. तर दुसऱ्याने स्वतः सर्वशक्तिमान असूनही शस्त्र हातात न धरता महाभारत घडवता आणि जिंकता येऊ शकते, याचा वस्तुपाठ घालून दिला. भगवद्गीतेचे अमृतज्ञान ब्रह्मांडाला दिले. 

आजच्या काळात नियती, परिस्थिती आणि वृत्ती या गोष्टी बदलणे माणसाच्या हातात नाही. असे असले तरी अधिकाधिक विवेक, सत्य, बंधुत्व, कुटुंब, समाज टिकवणे आपापल्या परीने शक्य होऊ शकते. या गोष्टी स्वतःपासून सुरू करता येऊ शकतात. आज अनेक देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे. जगभरात अनेक ठिकाणी अराजकासारखी स्थिती असल्याचे चित्र आहे. 

तालिबान-अफगाणिस्तान, रशिया-युक्रेन आणि आता इराक-इराण युद्धांनी जगभराची चिंता वाढवली आहे. चीनसारखा विस्तारवादाची वृत्ती असलेला देश स्वबळकटीकरणासाठी कोणत्याही थरला जाऊ शकतो आणि देश-प्रदेश गिळंकृत करू शकतो, हे आपण पाहिले आहे. जगात अनिश्चितता आणि भीतीचे वातावरण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना हा या शतकातील कधीही न विसरता येण्यासारखा नकोसा काळ. या सगळ्या परिस्थितीत कायम राहिलेली गोष्ट म्हणजे श्रद्धा, आस्था आणि चांगले होण्याचा विश्वास. कोरोना काळात टीव्हीवर पुन्हा एकदा रामायण या गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण करण्यात आले. प्रेक्षकांनी पुन्हा ही मालिका डोक्यावर घेतली आणि नवे उच्चांक स्थापन केले. यातूनच रामायण, रामचरित्रकथेची मोहिनी आणि रामनामाचा महिमा, याची प्रचिती येते. 

त्रिदेवांपैकी एक भगवान शंकरही रामनामाचा जप करतात, अशी मान्यता आहे. पार्वती देवी आणि शंकर यांच्यात राम आणि रामनामाविषयीचे संवाद झाल्याचे काही पुराणात आढळते. शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती दोन अक्षरे आहेत, असे म्हटले जाते. पौराणिक कथांसह अनेक ठिकाणी श्रीरामचरित्र, रामकथा आणि रामनामाचा महिमा वर्णन केल्याचे सांगितले जाते. त्यानुसार, ‘राम’नाम वेदांच्या प्राणासमान मानले गेले आहे. राम नाम इहलोकी आणि परलोकी निर्वाह करणारे आहे. राम नाम अविनाशी आणि व्यापक रूपाने सर्वत्र परिपूर्ण आहे. सत आहे, चेतन आहे आणि आनंदरुप आहे. ‘राम राम’ जपण्याने त्यात इतकी अलौकिकता येते की, ज्ञानेन्द्रिय, त्यापुढचे अंतःकरण, अंतःकरणाच्या पुढची प्रकृति आणि प्रकृतिपासूनचे जे अतीत परमात्मतत्व आहे, त्या तत्वाला जाणण्याची शक्ती या रामनामामधे आहे. ‘राम नाम’ मणिदीप आहे. एक असतो दीपक, आणि दुसरा मणिदीप. तेलाच्या दिव्याला दीपक म्हणतात. मणिदीप स्वयंप्रकाशित असतो, तो कधीच विझत नाही. जसे दीपकाला दरवाज्यात ठेवल्यावर घरात आणि बाहेर दोन्हीकडे प्रकाश पडतो तसेच राम नामरूपी मणिदीपाला जिभेवर ठेवण्याने अंतःकरण आणि बाह्य आचरण दोन्ही प्रकाशित होते.

या विश्वामध्ये सूर्य पोषणकर्ता आहे आणि चंद्र अमृतवर्षाकर्ता. ‘राम नाम’ विमल आहे. सूर्य-चंद्राला राहु–केतुचे ग्रहण लागते, पण रामनामाला कुणाचे कधीच ग्रहण लागत नाही. रामनामाचा महिमा सदैव वृद्धिंगतच होत असतो. ते सदा शुद्ध आहे. अमृताच्या स्वादासामान आणि तृप्तिसमान राम नाम आहे. ‘रा’ म्हणताना तोंड उघडते आणि ‘म’ म्हणताना बंद होते. जसे भोजनसमयी घास घेताना तोंड उघडते आणि घासाच्या चवीच्या तृप्तीने तोंड बंद होते, त्याच प्रकारे ‘रा’ आणि ‘म’ अमृताच्या स्वाद आणि संतोषासारखे आहे. ‘राम नाम’ निर्गुण आणि सगुण यांच्यामधला सुंदर साक्षी आहे.  ‘राम’ जपाने रोम रोम पवित्र होते. रामनाम कधीही घेता येते असे आहे. चित्त थाऱ्यावर नसले तरी रामनामाचे ते जागेवर येऊ शकते. रामनामात प्रचंड ताकद आहे. 

कलिगुगातही रामनामाचा महिमा आणि रामाचे आकर्षण कमी झालेले नाही. श्रीराम, रामायण आणि रामचरित्रावर अनेक प्रकारची स्तोत्रे, मंत्र, श्लोक यांची रचना ऋषी-मुनी, संत-महंत आचार्यांनी केलेली पाहायला मिळते. रामकथा आणि रामनामाची भूल एवढी जबरदस्त आहे की, आधुनिक काळातही अनेक कवी, रचनाकार, गीतकार यांनी रामायण, रामकथा यावर अप्रतिम आणि अवीट गोडीच्या रचना केल्या आहेत. त्यांच्या प्रतिभा आणि काव्यशक्तीचे तर कौतुक आहेच, परंतु, त्या रचना ऐकताना रामनामामुळे जो मनाला आनंद मिळतो, तो अधिक आल्हाददायक आहे. या सर्वांवरील कळस म्हणजे आधुनिक वाल्मिकी असे संबोधले जाणारे ग.दि.माडगुळकर यांची रचलेले गीतरामायण. स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजे बाबूजी यांनी दिलेले गीतरामायणाला दिलेले संगीत केवळ अद्भूत आहे. संगीत रचनेला दाद द्यावी की, गीतरचनेला अशी द्विधा मानसिक अवस्था अनेकदा होते. कोणा एकाची निवड करणे कठीणच. याचे मूळ श्रीरामचरित्र आणि रामकथा. गीतरामायण कोणी केले नाही, ते घडले, असे सांगितले जाते. यातील प्रत्येक गीतरचना वाचताना किंवा स्वरबद्ध ऐकताना मनात एक वेगळेच रोमांच उभे राहते आणि आपण आपसुकच रामनामात तल्लीन होऊन जातो. 

रामनामाने समुद्रातील दगड तरून गेले आहेत, तर या मनुष्य जीवाचा उद्धार होणार नाही का? ‘राम-नाम’ आपल्या भक्तांना धारण करणारे असे नाम आहे. राम-नाम हे निरपेक्ष साधन आहे, तेच स्वयं सर्वसमर्थ परमब्रह्म आहे. अनेक शतकांच्या अथक प्रयत्नांनंतर कायदेशीर पद्धतीने अयोध्येत श्रीराम मंदिर दिमाखात उभे राहिले आहे. दररोज लाखो भाविक येऊन सुकुमार स्वरुप रामललाचे दर्शन घेत आहेत. सन २०२४ ची रामनवमी अयोध्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरी झाली. हे सगळे केवळ रामनामाबाबत असलेला विश्वास आणि श्रीरामांवर असलेल्या भाविकांच्या प्रेमापोटी शक्य होत आहे. रामनामाची महती वर्णावी तेवढी कमीच आहे. रामकथा कालातीत आहे. आजही देश-विदेशात या किंवा त्या निमित्ताने रामकथा आयोजित केले जाते. हजारो, लाखो भाविक, सश्रद्ध रामनामात तल्लीन होऊन जातात. 

जोपर्यंत सूर्य-चंद्र आणि पृथ्वी आहे, तोपर्यंत रामनाम अबाधित राहणार आहे. जोपर्यंत कलियुग आहे, तोपर्यंत कितीही संकटे, आव्हाने, बिकट परिस्थिती आली, तरी रामनाम आपल्याला तारणारे आहे. रामचरित्र आणि रामकथेच्या अमरत्वाचे हनुमंतांनी मागितलेले पसायदान उत्तरोत्तर भवतारक ठरणारे आहे. निरपेक्ष मनाने रामनाम घेऊन ते श्रीरामचरणीच अर्पण करावे. तुमचे आराध्य कुणीही असो. तुमची श्रद्धा कोणावरही असो. अगदी तुमचे कर्म हीच तुमची श्रद्धा आणि आस्था असो. परंतु, सत्य आणि सकारात्मकतेचा दीप मनात सतत, कायम तेवत ठेवणे गरजेचे आहे. देशात शेकडो देव-देवी-देवता यांचे पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना केली जाते. ज्याने त्याने आपापल्यापरिने ते सुरूच ठेवावे. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेल्या ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी, असे सांगितले जाते. अगदी त्याचप्रमाणे श्रीरामांनी अनेक आदर्श घालून दिले आहेत. रामराज्य आणून कैक गोष्टी सिद्ध आणि साध्य करून दाखवल्या आहेत. त्यापैकी एक तरी गोष्ट संकल्प घेऊन आपण काही प्रमाणात या जीवनात उतरवू शकलो, तरी जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आणि प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. 

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे। 
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:॥
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। 
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥ 
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। 
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥

॥श्रीराम जय राम जय जय राम॥

- देवेश फडके.

Web Title: shriram aakhyan know about amazing importance of lord shri ram and ram naam in kalyug shri ram katha trivar jayjaykar rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.