Shravan Maas 2023: शिवपूजनात शंख वर्ज का मानतात? वाचा, पौराणिक कथा अन् यामागील नेमके कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 09:12 AM2023-08-31T09:12:54+5:302023-08-31T09:16:49+5:30

Shravan Maas 2023 Shiv Pujan: लक्ष्मी देवी आणि श्रीहरि विष्णूंचा अत्यंत प्रिय मानला गेलेला शंख शिवपूजनात मात्र वर्ज का मानला जातो? जाणून घ्या...

shravan maas 2023 know about why conch shell is not used in lord shiva worship shiv pujan shankha varja mythology story in marathi | Shravan Maas 2023: शिवपूजनात शंख वर्ज का मानतात? वाचा, पौराणिक कथा अन् यामागील नेमके कारण

Shravan Maas 2023: शिवपूजनात शंख वर्ज का मानतात? वाचा, पौराणिक कथा अन् यामागील नेमके कारण

googlenewsNext

Shravan Maas 2023 Shiv Pujan: नवचैतन्य, नवोत्साह, नवनर्मिती आणि शिवपूजन या गोष्टींसाठी श्रावण प्रसिद्ध आणि पवित्र मानला जातो. श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावण महिना शिवपूजन, महादेवांची आराधना, उपासना, नामस्मरण यासाठी अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. श्रावणातील सोमवारी केलेल्या शिवपूजनामुळे महादेवाचे विशेष शुभाशिर्वाद लाभतात, असे मानले जाते. श्रीविष्णू आणि अन्य देवतांच्या पूजनात शंखाचा वापर जलाभिषेक करताना केला जातो. शंखाने केलेला जलाभिषेकाचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. मात्र, शिवपूजनामध्ये शंख वर्ज का मानला जातो? यामागील नेमके कारण काय? पौराणिक कथा जाणून घेऊया...

शिवमहिमा अगाध आहे, असे मानले जाते. त्रिमुर्तींमध्ये तसेच पंचदेवतांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान शिवाला आहे. शिवाशिवाय पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे. कारण महादेव शिवशंकर लयतत्त्वाचे स्वामी आहेत, असे मानले जाते. महादेवाचे विविध स्वरुपात पूजन केले जाते. तसेच शिवाची निगडीत असलेल्या अनेक गोष्टींचे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. शिवपूजनामध्ये शंख वर्ज असण्याबाबत पुराणात एक कथा असल्याचे सांगितले जाते. 

देवतांवर विजय मिळवण्याचे वरदान ब्रह्माजींनी दिले

एका कथेनुसार, शंखचूड नामक एक पराक्रमी दैत्य होता. दैत्यराज दंभ याचा तो पुत्र. दैत्यराज दंभाने पुत्रप्राप्ती होण्यासाठी श्रीविष्णूंचे कठोर तप केले. दंभाने त्रिलोकात अजेय पुत्रप्राप्ती होण्याचे वरदान मागितले. तथास्तू म्हणून श्रीविष्णू अंतर्धान पावले. यानंतर दंभाला पुत्रप्राप्ती होऊन त्याने त्याचे नाव शंखचूड ठेवले. काही कालावधीनंतर शंखचूडाने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. देवतांवर विजय मिळवण्याचे वरदान ब्रह्मदेवाने दिले. तसेच एक श्रीकृष्णकवचही प्रदान केले. ब्रह्मदेवांकडून वरदान मिळालेल्या शंखचूडाने त्रिलोकावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. मात्र, यानंतर तो महालोभी, अहंकारी बनला. त्याने त्रिलोकात त्राहिमाम करण्यास सुरुवात केली. 

शिवनाथाने देवतांची समस्या सोडवण्याचा निश्चय केला

श्रीविष्णू आणि ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे कोणत्याच देवतेच्या शक्तीचा, युक्तीचा त्यावर परिणाम होईना. शेवटी त्रस्त देवगण श्रीहरिंकडे आले. मात्र, स्वतःच वरदान दिल्यामुळे श्रीविष्णूही काही करू शकत नव्हते. सर्व देवतांना श्रीविष्णूंनी महादेव शिवशंकरांकडे जाण्याचा सल्ला दिला. शिवनाथाने देवतांची समस्या सोडवण्याचा निश्चय केला. श्रीकृष्णांचे कवचामुळे अनेकदा आक्रमण करूनही महादेव शंखचूडाचा वध करू शकले नाहीत. काही केल्या शंखचूडाचा वध होत नाही आणि त्याचे अत्याचारही थांबत नाही म्हटल्यावर श्रीविष्णूंनी स्वतः पुढाकार घेतला. 

...म्हणून शिवपूजनात शंख वर्ज मानला जातो

काही केल्या शंखचूडाचा वध होत नाही आणि त्याचे अत्याचारही थांबत नाही म्हटल्यावर श्रीविष्णूंनी स्वतः पुढाकार घेतला. श्रीविष्णूंनी एका तपस्वाचा वेष धारण करत दैत्यराजाकडून श्रीविष्णूकवच दान स्वरुपात मागून घेतले. त्यानंतर महादेव शिवशंकरांनी तात्काळ त्रिशूलाचा वार करत शंखचूडाचा वध केला. शंखचूडाच्या हाडापासून शंखाची निर्मिती झाली असल्याचा दावा केला जातो. शंखचूड हा श्रीविष्णूंचा भक्त होता. या कारणामुळे त्यामुळे शंखातून केलेला जलाभिषेक लक्ष्मी देवी आणि श्रीहरिंना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. मात्र, अहंकारातून केलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठल्यावर महादेव शिवशंकरांनी शंखाचूडाचा वध केला. या कारणामुळे शिवपूजनात शंखातून जलार्पण केले जात नाही किंवा शंख वर्ज मानला जातो, अशी पौराणिक कथा आढळते.

- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.


 

Web Title: shravan maas 2023 know about why conch shell is not used in lord shiva worship shiv pujan shankha varja mythology story in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.