नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?

By देवेश फडके | Published: January 23, 2024 03:53 PM2024-01-23T15:53:41+5:302024-01-23T16:12:14+5:30

ज्योतिष हे एक शास्त्र असून, त्याकडे तशा दृष्टीने पाहिल्यास त्याचे महत्त्व आणि वेगळेपण अधिक ठळकपणाने अधोरेखित होऊ शकेल.

know about how important is the position of navagraha planets in astrology what and how impactful on janam kundali | नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?

- देवेश फडके.

भारत देश हा जसा विविधतेने नटलेला आहे. इथे अनेकविध संस्कृती परंपरा गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत प्रचंड बुद्धिमत्ता असलेले विद्वान लोक भारतभूमीने पाहिले आहेत. ज्ञान-विज्ञान, तत्त्वज्ञान, शास्त्र, अध्यात्म, कला, क्रीडा, संगीत अशा अनेकविध क्षेत्रात लोकांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली आहे. आपल्याकडे जी अनेक प्रकारची शास्त्रं आहेत, त्यातील विशेष महत्त्व असलेले आणि त्याबाबत संमिश्र भाव असलेले शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिष हे एक शास्त्र असून, त्याकडे तशा दृष्टीने पाहिल्यास त्याचे महत्त्व आणि वेगळेपण अधिक ठळकपणाने अधोरेखित होऊ शकेल. 

भारतीय संस्कृती आणि अनेकविध परंपरा अतिशय समृद्ध आहेत. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टी अगदी नित्यनेमाने करत असतो. ती-ती वेळ झाली की, आपसूकच आपण त्या गोष्टीकडे वळतो. यातील एक म्हणजे स्वतःचे राशीभविष्य पाहणे. सकाळी वर्तमानपत्र आले की, बातम्या, मनोरंजनाच्या गोष्टी, जाहिराती यांसह कोट्यवधी लोक आपले दिवसाचे राशीभविष्य न चुकता पाहतात. आपले भविष्य ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून वर्तवले जात असते. ज्योतिषशास्त्र हे समुद्राप्रमाणे आहे; ते जेवढे खोल आहे, तेवढेच ते अथांग अन् व्यापकही आहे. एक शास्त्र म्हणून पाहिल्यास याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तयार होऊ शकते. आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळापासून खगोलीय घटनांचा अगदी बारकाईने अभ्यास करून ग्रह, नक्षत्र, राशी यांसंदर्भात काही नोंदी करून ठेवलेल्या आहेत. विशेष म्हणजे आजतागायत त्या लागू होतात आणि भविष्यातही लागू होतील. ज्योतिष हा विषय अतिशय व्यापक आणि सखोल आहे. ज्योतिषशास्त्र हे अवकाशाप्रमाणे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, यानुसार या विषयाकडे जेवढे अभ्यासक त्या त्या पद्धतीने ज्योतिषशास्त्राकडे पाहिले जाते. नवग्रह, नक्षत्रे, राशी, कुंडली, स्थाने याच्या आधारे ज्योतिषशास्त्रात भविष्याचा वेध घेतला जातो.  

ताऱ्यांचा समूह नक्षत्र आणि राशीविचार

ज्योतिषशास्त्र हे मुख्यत्वे करून पंचांग, ग्रह, नक्षत्रे यावर आधारलेले आहे.  राशी ही संकल्पना मूळ भारतीय नसली तरी प्राचीन काळातील विद्वान व्यक्तींनी ती आपलीशी केली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांनुसार राशींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पंचांग हे तिथी, वार, नक्षत्र योग आणि करण या पाच अंगांनी तयार होते. खगोलातील तारे, ग्रह यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून ज्योतिषशास्त्र बनलेले आहे. अगदी प्राचीन काळापासून सूर्य-चंद्राचे भ्रमण, त्याचा मार्ग, ते ज्या मार्गावरून भ्रमण करतात, त्या मार्गात येणारे ताऱ्यांचे समूह, त्यातील विविधता या सर्वांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ज्योतिषशास्त्र विकसित झाले आहे. आपल्याकडे २७ नक्षत्रे सांगितलेली आहेत. ही नक्षत्रे म्हणजेच ताऱ्यांचे समूह आहेत. कैक लाख वर्षांपासून त्यांची घोडदौड सुरू आहे. अमूक एका ताऱ्यांच्या समूहात तयार होणाऱ्या भासमान आकृतीवरून राशी घेण्यात आलेल्या आहेत. सूर्य आणि चंद्राचे भ्रमण ज्या मार्गावरून होत असते, त्या मार्गावर ही नक्षत्रे आणि राशी पाहायला मिळतात. आजही आकाशदर्शन केले, तरी अमूक एक रास म्हटली की, त्याचा जो आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे, तो प्रत्यक्ष आकाशात पाहिला जाऊ शकतो. उदा. वृश्चिक रास. या राशीची एक विशिष्ट चिन्ह किंवा आकृती आहे. विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्रांपासून वृश्चिक रास तयार होते. म्हणजेच आकाशात पाहताना, या तीन नक्षत्र समूहात वृश्चिक राशीचे चिन्ह असलेल्या विंचू किंवा स्कॉर्पिओची आकृती आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो. पृथ्वीवरून पाहताना हे तारे, ताऱ्यांचा समूह स्थिर असल्याचे जाणवते. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा वेग प्रचंड असतो. ते पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असल्यामुळे त्याचा वेग आणि स्थित्यंतर याचा अंदाज बांधला जाऊ शकत नाही. यासाठी आपण जमिनीवरून उंच आकाशात दिसणाऱ्या विमानाचे उदाहरण घेऊ शकतो.    

नवग्रह भ्रमण आणि प्रभाव

एखाद्या माणसाचा जन्म झाल्यावर, त्यावेळेची ग्रहस्थिती कशी होती, त्यावरून कुंडली मांडली जाते. ही कुंडली मांडायची एक विशिष्ट पद्धत आहे. या कुंडलीवरून ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीच्या भूत, भविष्यातील गोष्टींचा आढावा घेतला जाऊ शकतो. या शास्त्राचा जसा ज्याचा अभ्यास असेल, तसे अंदाज, आराखडे बांधले जाऊ शकतात. यातील महत्त्वाचा भाग हा नवग्रह आणि बारा राशी हा आहे. एका नियमित अंतराने सर्व ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असतात. उदा. सूर्य हा ग्रह घेतल्यास तो ज्या मार्गावरून भ्रमण करतो, त्या मार्गात येणाऱ्या ताऱ्यांच्या समूहातून त्याचा निरंतर प्रवास सुरू असतो. तो अमूक एका ताऱ्यांच्या समूहाजवळ असेल, तो त्या नक्षत्रात आणि राशीत असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना अनेकविध गोष्टीचे स्वामित्व आणि प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव पाहिला जातो. 

जन्मकुंडली आणि नवग्रहांचा प्रभाव

अफाट आणि कधीही थांग न लागणाऱ्या अंतराळात विविध सूर्यमाला असल्याचे सांगितले जाते. यापैकीच आपली सूर्यमाला आहे. या सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, हर्षल, नेपच्युन, प्लुटो ग्रह आहेत.  तर राहु आणि केतु यांना छाया ग्रह मानले गेले आहे. सूर्यमालेत सूर्य हा मध्यबिंदू असून, त्याभोवती सर्व ग्रह भ्रमण करत असतात. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यास भूमध्य पद्धतीने केला जातो. सर्व ग्रहांना आपण पृथ्वीवरून पाहतो आणि त्यांचे अवलोकन करतो.  नवग्रहांचे राशीतील भ्रमण, त्याचा त्या राशीवर आणि त्या राशीच्या व्यक्तींवर होणारा प्रभाव, परिणाम याचा अभ्यास केला जातो. तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील स्थानांवर नवग्रहांपैकी कोणता ग्रह असता, त्याचे काय परिणाम, प्रभाव त्या व्यक्तीवर पडत असतो, हेही आवर्जून पाहिले जाते. विवाहावेळी किंवा एखादी समस्या आली तर जन्मकुंडलीतील ग्रहस्थितीवरून अंदाज, आडाखे बांधले जातात. त्यावरून समस्यांचे निरसन कसे होऊ शकते. ग्रहदोष, ग्रह कमकुवत असणे, त्याचे उपाय सांगितले जातात. 

जन्मकुंलीतील एक ते बारा स्थानांवर एखादा ग्रह असता, त्याचे साधारण आणि सामान्यतः त्या व्यक्तीच्या जीवनावर, व्यक्तिमत्त्वावर, गुणवैशिष्ट्यांवर कसा प्रभाव पडू शकतो, याचा अगदी धावता आढावा आपण या लेखमालेतून घेणार आहोत. यातून नवग्रहांची वैशिष्ट्ये, त्यांचे स्वभाव, त्याची व्याप्ती, त्या ग्रहाची कारकत्व, प्रभाव अशा अनेकविध गोष्टी या लेखमालेतून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. देवाचे काही करताना भक्तिभावाने केले जाते, कोणतेही काम करतान त्यावर श्रद्धा असणे चांगले मानले जाते, अगदी तसेच विश्वास असेल तर ज्योतिषशास्त्रात हा विषय आपलासा वाटू शकतो.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: know about how important is the position of navagraha planets in astrology what and how impactful on janam kundali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.