स्वामींचे लाडके शिषोत्तम; मोहातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 05:06 PM2024-02-28T17:06:14+5:302024-02-28T17:07:27+5:30

Shri Krishna Saraswati Kumbhar Swami Maharaj Jayanti 2024: श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे.

know about birth anniversary of shri krishna saraswati kumbhar swami maharaj jayanti 2024 | स्वामींचे लाडके शिषोत्तम; मोहातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज

स्वामींचे लाडके शिषोत्तम; मोहातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज

Shri Krishna Saraswati Kumbhar Swami Maharaj Jayanti 2024: माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांची जयंती असते. यंदा सन २०२४ मध्ये गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे. श्रीकृष्ण सरस्वती महाराज हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्य होते, असे म्हटले जाते. गुरुवार हा दिवस दत्तगुरू, स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. त्यामुळे त्यांचेच शिष्य असलेल्या श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांचा जयंतीदिन याच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनचरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...

राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम, प.पू.सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज दत्त संप्रदायातील ते एक थोर सत्पुरुष होते. सांप्रदायिक श्रद्धेनुसार स्वामीजी दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. कोल्हापुरातील कुंभार आळीत वास्तव्यास असल्याने ते मुख्यत: कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात असत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावी राहणाऱ्या वे.मू. अप्पा जोशी व अन्नपूर्णाबाई या सत्शील दांपत्याच्या पोटी, अपार दत्तसेवेचे फळ म्हणून ७ फेब्रुवारी १८३६, माघ कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी बालपणीपासूनच अलौकिक लीला करीत असत.

स्वामी समर्थांची आज्ञा आणि श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचे अवतारकार्य

तरुणपणी ते सद्गुरुभेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले. इकडे श्री स्वामी समर्थ महाराज सारखे, "माझा कृष्णा येणार !" असे म्हणत खुशीत होते. श्रीकृष्ण स्वामी अक्कलकोटाच्या वेशीजवळ पोचले नाहीत तोवरच स्वामी महाराज मठातून घाईने निघाले. लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात गेले. ते दोघेही देहाचा व्यापार विसरले. नृसिंहभान सावध झाले. समोर कृष्णाला पाहिले. त्याच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले की, बाळा, सावध हो. अजून खूप कार्य करावयाचे आहे. तेव्हा आत्ताच हे उचित नाही. आता आमचे वसतिस्थान गाणगापुरी राहिले. आम्ही तेथे तीन महिने राहू. तुमच्याकडे एक सांगाती येईल. त्याला बरोबर घेऊन करवीर नगरीत जावे. तोपर्यंत येथेच रहावे. यावर, कृष्ण म्हणाला, तुमची आज्ञा ती प्रमाण. यानंतर तब्बल सात दिवसांनी हे दोघे गुरु-शिष्य परत आले. थोड्याच दिवसांनी सलग रात्रंदिवस याप्रमाणे दोन दिवस रस्ता क्रमीत श्रीकृष्ण सरस्वती स्वामी करवीरक्षेत्रात आले व राममंदिरात त्यांनी वस्ती केली. अद्याप हे राममंदिर करवीरक्षेत्री आहे. श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहेत. ते बालोन्मत्तपिशाचवत् राहात असत. ते कुंभार गल्ली मध्ये राहात असत, म्हणून त्यांना "कुंभारस्वामी" असेही म्हटले जाते.

स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केल्याचे उल्लेख आढळतात

श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभार आळीतील ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंपासून मानवास मुक्त करणे व त्याचे देवस्वरूप दाखविण्याचे काम श्रीकृष्ण सरस्वती स्वामी यांनी केले. या वाड्याला स्वामीजींनी वैराग्यमठी असे नाव दिले. स्वामीजी अखंड बालभावात राहत असत. स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केल्याचे उल्लेख ग्रंथात आढळून येतात. गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे तप करणाऱ्या अनेक भक्तांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देऊन, करवीर येथे मी कुंभार स्वामी या नावानी अवतार घेतला असून तेथे जावे, असे सांगितले. स्वामीजी त्यांना भेटत असत व काही वाक्ये बोलून खूण पटवत असत. स्वामी कोल्हापूर सोडून कधीही बाहेर जात नसत. मात्र, अनेकदा नरसोबाच्या वाडीस काही लोकांना स्वामींची भेट होत असे. तसेच अक्कलकोटवासी स्वामी समर्थांनी अवतारकार्य समाप्त केल्यानंतर काही भक्तांना, मी कुंभारस्वामी या नावाने कोल्हापूर येथे आहे, असे दृष्टांत स्वामी समर्थांनी दिल्याच्या आख्यायिका आहेत. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी त्या भक्तांना अक्कलकोट स्वामी स्वरूपात दर्शन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत, असे मानले जाते.

अवतार समाप्ती अन् थोर सद्गुरुपरंपरा

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज श्रावण वद्य दशमी म्हणजेच २० ऑगस्ट १९०० रोजी समाधीस्त झाले. स्वामींचे संपूर्ण चरित्र, स्वामींचे कोल्हापुरातील शिष्य गणेश नारायण मुजुमदार यांनी लिहिले असून, ते 'श्रीकृष्ण विजय' या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगावेशीपाशी बांधला, त्याला "निजबोध मठी" म्हणतात. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांची श्रीगुरुपरंपरा, श्रीकृष्ण सरस्वती स्वामींपासूनच सुरू होते. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज - प.पू.श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज, कोल्हापूर - प.पू.धोंडीबुवा महाराज, पलूस - प.पू.श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी - प.पू.श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज, फलटण - प.पू.बागोबा कुकडे महाराज, दौंड ; अशी ही थोर सद्गुरुपरंपरा आहे.

श्रीकृष्णसरस्वती दत्ता जय जय कृष्णसरस्वती दत्ता।
श्रीसमर्था जय गुरुदत्ता अनाथांच्या नाथा।।

 

Web Title: know about birth anniversary of shri krishna saraswati kumbhar swami maharaj jayanti 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.