बीडमध्ये हातकडीसह पळालेला चोरटा अर्ध्या तासात पुन्हा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:45 AM2018-06-20T00:45:44+5:302018-06-20T00:45:44+5:30

A sneaky snatch with a handcuff in Beed rearmed in half an hour | बीडमध्ये हातकडीसह पळालेला चोरटा अर्ध्या तासात पुन्हा जेरबंद

बीडमध्ये हातकडीसह पळालेला चोरटा अर्ध्या तासात पुन्हा जेरबंद

Next

बीड : चोरीच्या मोटारसायकलसह रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चोरट्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने पोलिसाच्या हातास झटका देऊन हातकडीसह पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात पुन्हा या चोरांना ताब्यात घेतले.
केज पोलीस ठाण्यात १६ जून रोजी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदरील मोटारसायकल ज्ञानेश्वर कृष्णनाथ सुरवसे (रा. देवगाव, ता. वडवणी) याने चोरली असून तो सध्या गावाकडे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे १७ जून रोजी दुपारी केज ठाण्याचे सहा. फौजदार गुजर आणि पो.ना. सचिन आरदवाड यांनी चोरट्यास त्याच्या खापरवाडी शिवारातील शेतातून चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

१८ जून रोजी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. केज येथे न्यायालयीन कोठडीतील आरोपींना ठेवण्याची सोय नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी सुरवसेला बीड येथील कारागृहात दाखल करण्यासाठी आरदवाड त्याला घेऊन बीडला आले. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सुरवसेची एमसीआरपूर्व वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यास जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

त्या ठिकाणी पोलीस नाईक आरदवाड हे आरोपी तपासणी रजिस्टरवर नोंद करण्यात गुंग असल्याची संधी साधून ज्ञानेश्वर सुरवसे याने त्यांच्या हातास जोराचा झटका देऊन हातकडीसह रुग्णालयातून पलायन केले. ही माहिती नियंत्रण कक्षास दिली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच शिवाजीनगर भागातील एका हॉस्पिटलच्या पाठीमागे त्याला पुन्हा जेरबंद केले. दरम्यान, सुरवसे याच्यावर बीड शहर पोलिसात कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्ञानेश्वरचे वडील कीर्तनकार
ज्ञानेश्वर सुरवसे याचे वडील कीर्तनकार आहेत. शिवाय त्यांचे एकत्र कुटूंब असून घरात ५० च्या वर सदस्य आहेत. या सर्वांपासून ज्ञानेश्वर नेहमीच वेगळा राहत असे. घरात चांगले संस्कार असताना केवळ वाईट संगतीने तो चोरीच्या मार्गाला लागल्याचे सांगण्यात आले. त्याचे घरचे त्याला भेटण्यासाठी सुद्धा आले नसल्याचे सूत्रांकडून समजते.

दुसऱ्याच ज्ञानेश्वरला त्रास
देवगावमध्ये ज्ञानेश्वर उर्फ माऊली सुरवसे हे माजी सरपंच आहेत. त्यांच्या नावाप्रमाणेच या चोरट्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर सुरवसेला चोरीच्या गुन्ह्यात पकडल्याचे समजताच माजी सरपंच ज्ञानेश्वर यांनाच फोन सुरू झाले. परंतु ते आपण नसल्याचा खुलासा त्यांना प्रत्येकासमोर करावा लागला. ‘सेम’ नावाचा त्रास त्यांना चांगलाच सहन करावा लागला.

 

Web Title: A sneaky snatch with a handcuff in Beed rearmed in half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.