वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कवींना रसिकांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:45 AM2018-11-27T00:45:53+5:302018-11-27T00:45:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ३४ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील कवी संमेलनाने वास्तववादी विषयांवर प्रकार करीत रंगत आणली. ...

The poems depicting reality | वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कवींना रसिकांची दाद

वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कवींना रसिकांची दाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : ३४ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील कवी संमेलनाने वास्तववादी विषयांवर प्रकार करीत रंगत आणली. समाजातील वास्तवाचे चित्रण करणाºया कवींना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. महाराष्ट्राच्या कोनाकोप-यातून अतिशय प्रतिभावान व ताकदीचे कवी संमेलनातून अंबाजोगाईकरांना ऐकता आले.
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजलगाव येथील ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर हे होते. या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन पवन नालट (अमरावती) यांनी केले.
या संमेलनात शामसुंदर सोन्नर (परळी),एजाज शेख (भुसावळ), अंकुश आरेकर (मोहोळ), संगीता कदम-झिंजुरके (बीड), डी.के.शेख (उस्मानाबाद) या कवींनी संमेलनात सहभाग घेतला. सूत्रसंचालन अभिकथाकार विवेक गंगणे राडीकर यांनी केले. प्रास्ताविक अभिजीत जोंधळे यांनी केले. प्रभाकर साळेगावकर यांनी
‘बाराच्या भावात आम्हीच विकले
काल जे पिकले वावरात
सोडी नाही पाठ भावाचा उन्हाळा
आता आल्या झळा जीवघेण्या’
या ओळी सादर करत संमेलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांची व्यथा मांडली.
यावेळी गजलकार एजाज शेख (भुसावळ) यांनी कवी संमेलनात आपली पहिली रचना सादर केली.
‘ठेवले मी जसे ओठ ओठावरी
श्वास गंधाळला चिंब झाल्या सरी
काय देणार ते सांत्वना यार हो
दु:ख माझे निघाले आता भरजरी
पाहिजे तर तुझी पूर्णकर वासना
पण मला देवून जा एक भाकरी’
या सारख्या रचनेमधून उपस्थित रसिक श्रोत्यांना साद घातली. प्रेम, विरह, धर्म, राजकारण, शेती आणि समाजकारण या विषयीचे वास्तववादी भाष्य एजाज शेख यांनी आपल्या मराठी, उर्दू गजलांमधुन पेश केले.
शामसुंदर सोन्नर यांनी आपल्या विडंबन कवितांमधून, समाजातील, शासन व्यवस्थेतील विरोधाभास नेमकेपणाने टिपला. ‘शेतकºयांचा हनीमून’ व ‘संपादक साहेब’ या कवितांना रसिक श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली.
‘आला भरात जोंधळा
उधाणलं सार रानं
अन बांधावरल्या कुपीत
तुझा माझा हनीमुन’
या कवितेसह त्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळाचे विदारक चित्र मांडले. संगीता कदम झिंजुरके यांनी ‘श्रृंगार मराठीचा’ या कवितेतून मराठीचे सौंदर्य खुलविणारी तसेच दुष्काळावर भाष्य करणारी कविता सादर केली.
अंकुश आरेकर या तरूण कवीने आवाज, बहारदार सादरीकरण, चपखल शब्दफेक करत ‘बोचलं म्हणून’ ही कविता सादर केली. चहा विकला असे सांगणा-या पंतप्रधान मोदी यांचा समाचार ‘विकला असेल चहा, म्हणून देश विकायचा असतो का?’ या कवितेतून आरेकर यांनी घेतला. उस्मानाबाद येथील बी.के.शेख यांनी ‘अयं’ या कवितेतून पुढारी व कार्यकर्त्यांमधील दरी दाखविली.
‘अयं राजकारण करतोस काय
अयं आपलंच घर भरतोस काय
आलिशान माडीत राहतोस काय’
असा सवाल करून त्यांनी राजकीय नेत्यांचा जगण्यातील विरोधाभास सभागृहासमोर ठेवला. त्यांच्या दख्खणी भाषेतील कवितांनाही रसिक श्रोत्यांनी डोक्यावर घेतले.
‘घडी-घडी खुजाता कैकू
खुजाकर अपनी सुजाता कैकू
एक कोनेमे चुप बैठना साले
गाजर की पुंगी बजाता कैकू’
अशी रचना सादर केली. कवि संमेलनाचे सूत्रसंचालन करून पवन नालट यांनी दाद मिळविली.
कवि संमेलनास भगवानराव शिंदे, राजपाल लोमटे, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, दगडू लोमटे, सतीश लोमटे, प्रा.भगवान शिंदे, त्र्यंबक पोखरकर, प्रा.सुधीर वैद्य, डॉ.प्रकाश प्रयाग, प्रा.शर्मिष्ठा लोमटे आदींसह संयोजन समितीचे पदाधिकारी, साहित्य रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: The poems depicting reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.