युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 01:30 PM2019-01-09T13:30:47+5:302019-01-09T13:32:06+5:30

सरकारने खोटी आकडेवारी दाखवून खोटी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त कागदावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

No discussion of alliance, first solve the issues of farmers - Uddhav Thackeray | युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा - उद्धव ठाकरे

युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा - उद्धव ठाकरे

बीड : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून बीड, जालन्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटप करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी युतीची चर्चा गेली खड्ड्यात आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत भाजपावर टीका केली.

खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत,  असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, परंतु, हे सरकार आश्वासनाची खैरात करत आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात, ना राम मंदिराचा मुद्दा. आता हा मुद्दा घटनापीठाकडे टोलविला. मग, राम मंदीराचे आश्वासन दिलेच कशाला. अजूनही घोषणाबाजी चालूच आहे. घोषणा कशाला करता, अंमल करा हे सांगताना तुमचे दिवसच किती उरलेत असा प्रश्न भाजपावर टीका करताना उपस्थित केला. युतीची चर्चा गेली खड्यात जनता, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार ते सांगा, असे बीड येथील जाहीर सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांवर सुद्धा टीका केली. पीक विमा, सौभाग्य योजनेचे कुणाला फायदा झाला असा सवाल करत पीकविमा घोटाळा हा राफेल घोटाळ्यापेक्षा मोठा आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला. सरकारने घोषणांचा पाऊस बंद करावा, आधी दिलेल्या घोषणांची नीट अंमलबजावणी करावी, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. 

दुष्काळी दौऱ्याची सुरुवात त्यांनी बीड येथून केली. यावेळी शेतकऱ्यांना पशूखाद्य, पाण्याच्या टाक्याचे वाटप त्यांच्याहस्ते झाले. शेतकऱ्यांशी संवादही साधला. प्रशासकीय यंत्रणा सूस्त झाली आहे, या यंत्रणेला जागे करण्यासाठी आलो आहे. सरकारच्या घोषणा कशा फसव्या आहेत, हे सांगताना त्यांनी लोकमतच्या बातमीचा वारंवार उल्लेख करून अंक दाखविला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय करण्यासाठी राज्यात कर्ज मागणाऱ्यांची संख्या ३० हजारांवर आहे आणि प्रत्यक्षात मात्र ६ हजार लोकांनाच कर्ज मिळणार, अशी बातमी लोकमतच्या बीड आवृत्तीने छापली होती. याचा उल्लेख करून ते म्हणाले की, लोकमतने छापले आहे. लोकांचे मत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात लोकमतचा अंक दाखवून केला.

Web Title: No discussion of alliance, first solve the issues of farmers - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.