पीककर्ज वाटपात बीड जिल्ह्यातील बँकांचा हलगर्जीपणा; २१४२ कोटींचे उद्दिष्टे असताना केवळ ६१.३४ कोटींचेच केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:49 PM2018-06-14T16:49:58+5:302018-06-14T16:49:58+5:30

शासनाचे आदेश असताना देखील पीक कर्ज वटपात बँका हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे.

negligence of banks for crop laon in Beed district; As per the target of 2142 crores, the allotment was made to only 61.34 crores | पीककर्ज वाटपात बीड जिल्ह्यातील बँकांचा हलगर्जीपणा; २१४२ कोटींचे उद्दिष्टे असताना केवळ ६१.३४ कोटींचेच केले वाटप

पीककर्ज वाटपात बीड जिल्ह्यातील बँकांचा हलगर्जीपणा; २१४२ कोटींचे उद्दिष्टे असताना केवळ ६१.३४ कोटींचेच केले वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देकर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

बीड : खरीप हंगाम पेरणी, लागवडीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र पीक कर्जाविना शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. शासनाचे आदेश असताना देखील पीक कर्ज वटपात बँका हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे. कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

शेतकरी आत्महत्येला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्याचे दाखले शासन नेहमीच देत असते. मात्र, शासनाच्या कर्जवाटप योजनेस जिल्ह्यातील सर्व बँकांनी हरताळ फासल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १८ बँकांना २ हजार १४२ कोटी रूपयांचे खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यामध्ये बँकांनी कर्ज वाटप न केल्यामुळे खरीप लागवडीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे बँकांविरोधात तक्रारी करू लागले आहेत.

बीड जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी अनुकूल आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांशी बैठकीच्या माध्यमातून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश देत आहेत. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपली दाखवली गेल्याने जिल्हा प्रशासन देखील बँकांपुढे हतबल झाले आहे.  ज्या बँका पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

बँकांचे अधिकारी आरबीआयच्या परिपत्रकाची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वैधानिक अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे. बँकांची मुजोरी अशीच सुरु राहिली तरी जिल्हाभर आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.

१८ बँकामार्फत केले जाणार कर्जवाटप
जिल्ह्यातील प्रमुख १८ बँकांना २ हजार १४२ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, त्यापैकी फक्त ६१ कोटी रूपये बँकांनी वाटप केले आहे.
शेतकरी हवालदिल खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्जासाठी सामान्य शेतकऱ्यांना बँकांचे खेटे घालावे लागत आहेत. मात्र, बँकाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे

कर्जवाटपाच्या संदर्भात दिलेल्या आदेशाला बँकांच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे येत्या १८ तारखेला बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
- एम. डी. सिंह
जिल्हाधिकारी, बीड

 

Web Title: negligence of banks for crop laon in Beed district; As per the target of 2142 crores, the allotment was made to only 61.34 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.