ठळक मुद्देअजित पवार, धनंजय मुंडेने आम्हाला शिकवू नये सुरेश धस यांची आष्टीत पत्रकार परिषद

गणेश दळवी।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कुटूंबाचा छळ करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने धनजंय मुंडेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले. परंतु, ते विधान परिषदेत फक्त ‘मॅनेज’मेंट, तोडपाणी करतात, त्या धनुभाऊंनी आपल्यावर केलेल्या आरोपावर ठाम रहावे,  शेपुट घालून गप्प बसू नये, असा टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी धनंजय मुंडेवर लगावला. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


 राज्याचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी काल आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सुरेश धसांवर अनेक आरोप केले होते. धस यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत १५ कोटी रुपये घेऊन भाजपला मदत केल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता.

त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी सुरेश धस यांनी मंगळवारी आष्टीत पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर कडाडून टिका केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,  सरपंच अनिल ढोबळे, युवराज पाटील, सुनिल रेडेकर, माऊली जरांगे आदि उपस्थित होते.


पुढे धस म्हणाले, धनजंय मुंडे हे स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जे स्वत:च्या काकाचे होऊ शकले नाहीत,  ते पवार काका-पुतण्याचे केव्हा होणार? काल भरसभेत त्यांनी मी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १५ कोटी रूपये घेतल्याचा आरोप केला. स्व.पंडित आण्णा मुंडे हे स्वत:च्या शब्दावर जसे ठाम असायचे,  तसेच धनंजय यांनीही वडिलांप्रमाणे आपल्या शब्दावर ठाम रहावे.

कारण आपण त्यांच्यावर रीतसर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. वेळ आल्यावर आपले शेपूट घालून घेऊ नये, असे सांगत धस यांनी  धनजंय मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला. धनजंय मुंडे ग्रामपंचायत सदस्य होण्याअगोदरपासून मी आमदार आहे. धनजंय मुंडे यांनी अगोदर लोकमतातून निवडून यावे व नंतर बोलावे.


जे पाठीमागच्या दारातून निवडून आले आहेत, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तसेच मला शशिकलाच्या पक्षात जाण्यासाठी त्यांना जेलमध्ये भेटण्यास सांगतात. हे खरे असले तरी धनुभाऊ, तुम्ही लुटलेल्या डि.सी.सी.बॅकेचे पैसे अगोदर भरा. कारण तुम्ही सध्या जामिनावर आहात, हे ही लक्षात राह ुद्या, असा सल्लाही धस यांनी दिला.  मी जरी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना उजेडात भेटत असलो तरी धनजंय मुंडे ही भाजपाच्या मुख्यमंत्री, पालकमंत्री व बड्या नेत्यांची अंधारात भेट घेऊन पाय धरत असल्याचा आरोपही धस यांनी केला. ज्यावेळेस धनजंय मुंडेना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व्हायचे होते, त्यावेळेस या सुरेश धसने सात मते आपल्याला दिले होते. त्यावेळी तुम्ही मला किती रुपये दिले हे सांगावेच.

राष्ट्रवादीला गद्दारांची निष्ठा
 ज्या राष्ट्रवादीत खालपासून वरपर्यंत सर्व गद्दारांची फौज भरली आहे, त्या राष्ट्रवादी नेत्यांनी आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांचे आत्मपरिक्षण करावे. कारण त्या राष्ट्रवादीला, गद्दारांची निष्ठा असणाºयांना गद्दार म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोलाही धस यांनी अजित पवार यांचे  नाव न घेता लगावला.


  वेळ प्रसंगी राजकारण सोडून देईन-धस
 मी ज्यावेळेस राष्ट्रवादीला रामराम केला, त्याच वेळेस सांगितले होते की पुन्हा राष्ट्रवादी पक्षात जाणार नाही. हे जाहीर केले होते परंतु या राष्ट्रवादीच्या बहाद्दरांनी मी राष्ट्रवादीत येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे काल सांगितले. अरे मी, राजकारण सोडून देईन पण राकाँमध्ये जाणार नसल्याचे धस म्हणाले.