पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर सर्व ताकदीने मैदानात उतरू - अमरसिंह पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:33 AM2019-03-13T00:33:32+5:302019-03-13T00:33:53+5:30

अमरसिंह पंडित यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून निश्चित मानली जात असून तशी चर्चाही जोरात चालू आहे.

If order by high command, I will come with all the strength - Amar Singh Pandit | पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर सर्व ताकदीने मैदानात उतरू - अमरसिंह पंडित

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर सर्व ताकदीने मैदानात उतरू - अमरसिंह पंडित

Next
ठळक मुद्देभाजप-शिवसेना युती झाल्यामुळे इकडे भाजपात ‘अतिउत्साह’ दिसून येत आहे. राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न करणे ही बाब भाजपाच्या पथ्यावर पडत आहे.

- सतीश जोशी
बीड : निवडणूक जाहीर झाली तरी बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंगेसचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार अमरसिंह पंडित यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून निश्चित मानली जात असून तशी चर्चाही जोरात चालू आहे. यासंदर्भात अमरसिंह पंडित यांच्याशी चर्चा केली असता याबद्दल माझ्याशी कुणीही चर्चा केली नाही. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर सर्वताकदीने मैदानात उतरू, हे ही तितकेच खरे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यासंदर्भात व्यक्त केली.

मी नित्यनियमानुसार ग्रामीण भागात जनतेच्या संपर्कात असून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे नाव निश्चित झाले असेल तर ते सर्वप्रथम मला समजेल. माझ्याशी कुणीही यासंदर्भात संपर्क केला नाही, त्यामुळे उमेदवारीच्या संदर्भात बोलणे उचित होणार नाही, असे मुत्सद्दीपणाचे उत्तर देऊन उमेदवारीचा विषय टाळला. उमेदवार कुणीही असो, आम्ही सर्व ताकदीने निवडणूक लढवू. पक्षश्रेष्ठीने आदेश दिला तर रिंगणातही सर्वताकदीने उतरू. रिंगणात उतरल्यानंतरच बोलणे उचित ठरेल, असे ते म्हणाले.
सर्वकाही अलबेल आहे, विजय निश्चित आहे, असे वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणी प्रयत्न भाजपाकडून होत आहे. एवढे जर वातावरण पोषक असेल तर फिरता कशाला? घरी बसूनच निकालाची प्रतीक्षा करा ना. गेल्या पाच वर्षात जनतेने खूप काही सोसले आहे. त्यांच्या ह्या यातना मतदानातून प्रकट होतील, असा उपरोधिक टोलाही पंडित यांनी यावेळी मारला.

भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे इकडे भाजपात ‘अतिउत्साह’ दिसून येत आहे. भाजपाच्या विद्यमान खासदार तथा युतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे ह्यांचा मतदार संघात संपर्कही सुरु झाला आहे. गोपीनाथरावांच्या अपघाती मृत्यूमुळे मतदार संघात निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये फाटाफूट झाली असतानाही शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. शरद पवार यांनीही राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही, असे त्यावेळी जाहीर केल्यामुळे काँग्रेसने माजी मंत्री अशोकराव पाटील यांना मैदानात उतरविले होते. या सर्व पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे ह्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.

यावेळी तशी भावनिक लाट नसली तरी राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न करणे ही बाब भाजपाच्या पथ्यावर पडत आहे.
मतदार संघातील सहा विधानसभापैकी पाच मतदार संघ भाजपाच्या ताब्यात आहेत. सुरेश धसांना स्थानिक स्वराज्यमधून विधान परिषदेवर निवडून आणून भाजपाने आपली ताकद वाढविली आहे. वर्चस्वाच्या लढाईत पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात वारंवार खटके उडत गेले. मंत्रीपदाचा लालदिवा न मिळाल्याने मेटे आणि मुंडे यांच्यातील वाद विकोपाला गेला असून त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत मुंडेना बसू शकतो.

क्षीरसागर बंधू : भूमिकेबद्दल आश्चर्य
उमेदवार जाहीर न झाल्यामुळे इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामसूम आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा असून तेच तगडे उमेदवार ठरू शकतात. दुसरीकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार तथा विधानसभेतील पक्षाचे उपनेते जयदत्त क्षीरसागर हे निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्क क्षेत्राबाहेर असून दिवसेंदिवस त्यांचा भाजपाशी घरोबा वाढत आहे. ही बाब राष्ट्रवादीसाठी चिंतेची आहे. निर्धार मेळाव्याच्या परळीतील समारोप कार्यक्रमास शरद पवार आले असतानाही आ.जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. दुसरीकडे मात्र बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बीडमध्ये निमंत्रित करून विविध विकास कामांचा शुभारंभ क्षीरसागर बंधूंनी त्यांच्या हस्ते केला. चार दिवसांपूर्वीच गेवराईत आयोजित भाजपाच्या कार्यक्रमासही ते आवर्जून उपस्थित राहिले. क्षीरसागर बंधूंच्या या भूमिकेबद्दल मात्र जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: If order by high command, I will come with all the strength - Amar Singh Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.