सराईत गुन्हेगाराची पोलिसाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:23 AM2019-01-07T00:23:27+5:302019-01-07T00:23:38+5:30

पाण्याची बकेट बाजूला घे असे म्हटल्याच्या कारणावरुन खुनाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने रक्षकास मारहाण केली.

Criminal beats policeman | सराईत गुन्हेगाराची पोलिसाला मारहाण

सराईत गुन्हेगाराची पोलिसाला मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पाण्याची बकेट बाजूला घे असे म्हटल्याच्या कारणावरुन खुनाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने रक्षकास मारहाण केली. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा कारागृहात घडली. दोन दिवसांपूर्वीच हा बंदी न्यायालयीन तारखेसाठी कल्याण जेलमूधन बीडच्या जेलमध्ये आला होता.
बाळू बाबूराव घडशिंगे (बंदी क्रमांक २७५/१९, रा. लवूळ, ता. माजलगाव) असे मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी सर्व कैद्यांना उठून नाश्त्यासाठी बराकबाहेर काढले. मात्र, बाळू हा उठलाच नाही. कारागृहाचे रक्षक भरत रामगुडे यांनी त्याला उठवून बाहेर आणले. स्वयंपाकगृहाजवळील पाण्याची बकेट बाजूला उचलून ठेवण्यास त्याला सांगितले. बाळूने अरेरावी करीत रामगुडे यांना ‘तू कोण मला सांगणारा ?’ असे म्हणत मारहाण केली. जवळ असलेल्या इतर कैद्यांनी त्याला पकडले. त्यानंतर इतर रक्षकांनी मिळून त्याला पुन्हा बराकमध्ये बंद केले. सदरील प्रकार समजताच प्रभारी कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांनी धाव घेतली. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे नोंद झाली आहे.
कल्याण जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न
कल्याण जेलमध्ये बाळूने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. तसेच अनेक वेळा आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे. तसेच कल्याण जेलमध्ये तो खूनाच्या गुन्ह्यातच बंद असल्याचे सूत्रांकडून समजते. येथील कारागृह प्रशासनही त्याच्या गैरवर्तनास वैतागलेले आहे. आता बीडमध्येही त्याने असे कृत्य केल्याने त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
चक्कर आल्याचे केले नाटक
कारागृह रक्षकास मारहाण केल्यानंतर सर्व पोलीस आपल्याला मारतील अशी भीती वाटल्याने बाळूने गेटकडे धाव घेतली. येथे त्याने आपल्याला चक्कर आल्याचे नाटक केले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तो येथे उपचार घेत आहे. प्रकृती ठणठणीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. येथेही कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे.

Web Title: Criminal beats policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.