Adjustment of 58 teachers in Beed district | बीड जिल्ह्यात ५८ शिक्षकांचे समायोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पटसंख्या कमी असल्याने बंद करण्यात आलेल्या २३ आणि गतवर्षीच्या समायोजनेतील ९ अशा ३२ शाळांमधील ५८ शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया गुरुवारी पार पडली.

शासन निर्देशानुसार बंद केलेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. त्यानंतर तेथील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया तीन दिवसांपासून रखडली होती. गुरुवारी मुहूर्त लागला.

जि. प. मध्ये शिक्षकांची गर्दी होती. जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री राजेंद्र मस्के, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, शिक्षण अधिकारी भावना रजनोर आदींच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पार पडली. निकषांनुसार तसेच शिक्षकांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार जिल्ह्यातील जि. प. च्या शाळांमधील रिक्त पदांच्या ठिकाणी या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. गेवराई तालुक्यात २० जागा रिक्त होत्या. या समायोजनेमुळे १९ जागा भरण्यात आल्या. वार्षिक समायोजनेतील १६ शिक्षक दिलेल्या ठिकाणी रुजू झाले नव्हते. यावेळी त्यांचेही समायोजन करण्यात येणार होते. मात्र, अंशत: बदलाची मागणी होती. उपाध्यक्षांनी हा मुद्दा मांडल्यानंतर हे प्रकरण आयुक्तांकडे पाठविले जाणार असल्याचे समजते.