सेदान व हॅचबॅकला अतिरिक्त फ्रंट गार्ड हवे की नको हे तुम्हीच ठरवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 07:00 PM2017-09-18T19:00:00+5:302017-09-18T19:00:00+5:30

कारला मोटार उत्पादकांनी दिलेले बंपर पुरेसे असतात. तरीही अतिरिक्त फ्रंट गार्ड बसवण्याचे काम अनेकजण मोठ्या हौशीने करतात. त्यामुळे कारचे वजन वाढते पण खरोखरच त्यामुळे अपघातात ते संरक्षक ठरतात की अधिक त्रासदायक ठरतात, त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.

You decide whether the sedan and the hatchback should have an additional front guard | सेदान व हॅचबॅकला अतिरिक्त फ्रंट गार्ड हवे की नको हे तुम्हीच ठरवा

सेदान व हॅचबॅकला अतिरिक्त फ्रंट गार्ड हवे की नको हे तुम्हीच ठरवा

ठळक मुद्देकालांतराने मोटार उत्पादकांनी या बंपरसाठी प्लॅस्टिक वा फायबरचा वापर सुरू केलाप्लॅस्टिक वा फायबच्या बंपरच्या वर लोखंडी संरक्षक कवच असावे, या भूमिकेतून या गार्डची निर्मिती झालीकेवळ एक सिंगल बारसारखा वाटणारा गार्डही यामध्ये मिळतो

वाहन उद्योगांमध्ये केवळ मोटारींचे उत्पादन ही संकल्पना अभिप्रेत नाही, अन्य अनेक संलग्न उद्योग वा उपउद्योग या वाहन उद्योगाबरोबरीने निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची साधनसामग्री तयार केली जात आहे. अर्थात कोणती साधनसामग्री आपल्या मोटारीला गरजेची आहे, ही बाब पूर्णपणे वैयक्तिक आहे. काहींना कारच्यासाठी केवळ दर्शनीय बाजू म्हणून ती सामग्री लावावीशी वाटते तर काहींना ती सामग्री उपयुक्त वा संरक्षक वाटते. या मोटार उद्योगामध्ये फ्रंट गार्ड किंवा फ्रंट बंपर गार्ड या साधनाचा वापर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या जोमाने सुरू झाला. काही वर्षांपूर्वी भारतात मोटारींना मागील व पुढील बंपर जे मोटार उत्पादक देत असत, ते धातूचे विशेष करून लोखंडाचे देत होते. कारच्या या भागाचे संरक्षण त्यामुळे मोठ्या अंशाने होत असे.

कालांतराने मोटार उत्पादकांनी या बंपरसाठी प्लॅस्टिक वा फायबरचा वापर सुरू केला व लोकांना कालांतराने मोटार उत्पादकांनी या बंपरसाठी प्लॅस्टिक वा फायबरचा वापर सुरू केला तो प्रकार हा नाजूक असल्याचे निदर्शनास आले. मुळात त्यामागे असलेल्या तांत्रिकतेत तूर्तास जायचे नाही. मात्र या प्लॅस्टिक वा फायबच्या बंपरच्या वर लोखंडी संरक्षक कवच असावे, या भूमिकेतून या गार्डची निर्मिती झाली. खास करून एसयूव्ही वा प्रवासी वाहतूक या उद्दिष्ठासाठी असलेल्या मोटारींसाठी प्रामुख्याने वापरले गेलेले हे गार्ड हॅचबॅक, सेदान या प्रकारच्या मोटारींनाही वापले जाऊ लागले. मोटारीच्या बॉडीला आतील बाजूने वेल्ड करून नटबोल्टच्या सहाय्याने हे गार्ड लावले जातात. ट्युब्यूलर पद्धतीने तयार केलेले हे गार्ड अनेक प्रकारात, आकारात, आरेखनामध्ये उपलब्ध आहेत. केवळ एक सिंगल बारसारखा वाटणारा गार्डही यामध्ये मिळतो. स्टील, लोखंड, अॅल्युमिनियम यामध्ये हे मिळतात. त्यावर ऑईलपेंट, पावडरकोट आदी प्रकाराने रंग देण्याचे काम केलेलेही दिसते.

सेदान, हॅचबॅक या मोटारी तशा वजनाला एसयूव्हीच्या तुलनेत फार जास्त नसतात. त्यांचे वजन कमी असते. त्यांचा ग्राऊंड क्लीअरन्स हादेखील प्रामुख्याने एसयूव्हीच्या तुलनेत कमी असतो. या मोटारींना मोटार उत्पादकांमार्फत दिला जाणारा प्लॅस्टिक वा फायबरचा बंपर हा तसा पुरेसा असतो. तो धक्का अॅब्सॉर्ब करणारा घटक असतो. मात्र अतिरिक्त बसवण्यात येणारे हे धातूचे ट्युब्यूलर आकाराचे गार्ड वजनाला जड असतात. त्याचा वापर केल्यास साहजिकच कारच्या वजनात अधिक भर पडते. काही लोक केवळ दर्शनीय म्हणून त्याचा वापर करतात. तर काही लोकांना ते संरक्षक असल्याचे वाटते. वास्तविक ते ज्या पद्धतीने बसवले जातात, ते पाहाता अपघाताच्यावेळी त्यांना बसणारा धक्का हा जास्त असेल तर ते गार्ड तुमच्या कारचा पुढच्या भागाचे अधिक नुकसान करणाराही ठरू शकतो. कारण तो भाग हार्ड असल्याने कारच्या मूळ भागालाही धक्का देतो. धक्का सोसून वा अॅब्सॉर्ब करून घेत नाही, धक्क्यावला प्रतिकार केल्याने धक्का कारलाही बसतो. अर्थात कशा प्रकारे धक्का आहे, त्यावर अवलंबून असते.

या अतिरिक्त गार्डला काही जण अतिरिक्त हेडलाईट वा फॉगलाईट बसवण्यासाठी वापर करतात. मुळात हे वजनी असल्याने कारच्या पुढील बाजूला इंजिन व अन्य वजनी भाग असल्याने त्याचे वजन पुढील टायरवर असते, त्यामुळे एक तर तुमच्या पुढच्या टायरमध्ये हवा जास्त भरणे आवश्यक असते. तसे केल्यास कार वेगात असताना उडतही असते. वजन वाढल्याने मायलेजवरही परिणाम होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे अतिरिक्त फ्रंटगार्ड कारला बसवण्यापूर्वी नक्कीच विचार असा तांत्रिक बाजूचा विचार करावा.

Web Title: You decide whether the sedan and the hatchback should have an additional front guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.