फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील रसायन संपल्याने शहरातील बहुतांश वॉर्डांत दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:04 PM2018-04-06T16:04:53+5:302018-04-06T16:12:16+5:30

: शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली.

Due to the completion of chemicals in the Farola Water Purification Center, most of the wards in the city have contaminated water supply | फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील रसायन संपल्याने शहरातील बहुतांश वॉर्डांत दूषित पाणीपुरवठा

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील रसायन संपल्याने शहरातील बहुतांश वॉर्डांत दूषित पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्दे जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी असून तेथे रसायनसाठा तीन दिवसांपुरताच शिल्लक असल्याचे पाहणीअंती समोर आलेज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती तातडीने गठित करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी गुरुवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी असून तेथे रसायनसाठा तीन दिवसांपुरताच शिल्लक असल्याचे पाहणीअंती समोर आले. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती तातडीने गठित करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण रसायनांची तातडीने खरेदी करावी, असे आदेशही महापौरांनी दिले. 

दूषित पाण्यामुळे अंंबिकानगर, पदमपुरा भागात काही नागरिकांना साथरोगाची लागण झाली होती. त्यामुळे पालिकेकडे अनेक तक्रारी आल्यानंतर आज महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सचिन खैरे, किशोर नागरे आदींनी फारोळा गाठले. 
फारोळ्यातील जलशुद्धीकरणाची माहिती घेताना तेथील भांडारगृहात शुद्धीकरण रसायनांचा साठा तीन दिवस पुरेल इतकाच असल्याची बाब समोर आली. तुरटी, ब्लीचिंग आणि क्लोरीनचा साठा संपत आला आहे. ठेकेदाराचे बिल बाकी असल्याने त्याने जलशुद्धीकरण रसायन पुरवठा केलेला नाही. शुक्रवारी रसायन पुरवठा होणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडीमधून येणारे पाणी व शहराकडे जाणारे शुद्ध पाणी या दोन नमुन्यांची तपासणी खासगी संस्थेकडून करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

पाणीपुरवठा अभियंता नॉट रिचेबल
पाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल यांना महापौरांनी वारंवार फोन करण्याचा  प्रयत्न केला; परंतु ते काही उपलब्ध झाले नाहीत. शहरातील दूषित पाण्याची कारणे, फारोळ्यातील रसायनसाठा याची माहिती घेण्यासाठी चहल यांना संपर्क केला; परंतु त्यांचा फोन नॉटरिचेबल होता. 

पाण्याच्या नमुन्यांची तपासणी 
शहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामागील नेमके कारण पुढे आलेले नाही. फारोळा केंद्रात चांगले पाणी असून शहरातील जलवाहिन्यांमध्ये ते दूषित होते काय, हे पाहण्यासाठी नक्षत्रवाडी ते फारोळा आणि नक्षत्रवाडी ते जलकुंभापर्यंत विविध ठिकाणचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. शहर अभियंता एस.डी. पानझडे, तांत्रिक कक्षप्रमुख एम.बी. काझी, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांची समिती तयार करण्यात आली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने पाण्याचे नमुने घेऊन ते तपासावेत, असे आदेश घोडेले यांनी दिले. 

Web Title: Due to the completion of chemicals in the Farola Water Purification Center, most of the wards in the city have contaminated water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.