सावधान ! पाचशे, शंभराच्या बनावट नोटा पुन्हा चलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 20:04 IST2018-12-12T19:59:42+5:302018-12-12T20:04:28+5:30
व्यवहारात प्रत्येक नोट तपासून घ्या, नसता आर्थिक भुर्दंड बसू शकतो.

सावधान ! पाचशे, शंभराच्या बनावट नोटा पुन्हा चलनात
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा पुन्हा चलनात आल्याचे निदर्शनात आले आहे. काही व्यापाऱ्यांकडे आलेल्या नोटांच्या बंडलामध्ये या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. यामुळे सावधान, व्यवहारात प्रत्येक नोट तपासून घ्या, नसता आर्थिक भुर्दंड बसू शकतो.
औरंगपुऱ्यातील एका किरकोळ व्यापाऱ्याला नोटांच्या बंडलात १०० रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळून आल्या. तसेच मोंढ्यातील एका व्यापाऱ्याकडेही ग्राहकाने बंडलमध्ये एक ५०० रुपयांची बनावट नोट दिली. रात्री हिशोब करताना त्या व्यापाऱ्याला ही नोट आढळून आली. एवढेच नव्हे तर एका होलसेलरला बंडलात ५०० रुपये व २ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या व्यापाऱ्यांनीही माहिती अन्य व्यापाऱ्यांना दिल्याने हे लक्षात आले. या नोटांकडे बघितले असता ओरिजनल नोटांचे रंगीत झेरॉक्स काढल्याचे लगेच लक्षात घेते. बँकेत गेल्यावर या बनावट नोटा नष्ट केल्या जातील, आर्थिक नुकसान होईल, पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल. हे टाळण्यासाठी मग काही जण बनावट नोटा फाडून नष्ट करीत आहेत किंवा काही जण नोटांच्या बंडलात टाकून दुसऱ्यांना देत आहेत. मात्र, अशा नोटा बँकेत जाणार नाहीत याची खबरदारीही घेतली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अनेक व्यापारी सध्या ५०० व २ हजार रुपयांच्या नोटा तपासूनच घेत आहेत. आता १०० रुपयांच्या बनावट नोटा येत असल्याने त्याही तपासून घेऊ लागले आहेत. बाजारपेठेत बनावट नोटा थोड्याफार प्रमाणात आढळून येऊ लागल्यामुळे सध्या व्यापारी वर्गात बनावट नोटांबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अशा किती बनावट नोटा शहरातील अर्थव्यवस्थेत आहेत, याचा अंदाज लावणे कठीण आहे. या बनावट नोटांबद्दल पोलिसांत कोणी माहिती देत नसल्याने बनावट नोटा तयार करणाऱ्या गुन्हेगारांचे फावत आहे.
बनावट नोटांसह आरोपी पकडल्याच्या शहरातील काही घटना
२८ फेब्रुवारी २०१८ रोजी, सिडकोतील कॅनॉट प्लेस परिसरात फिरणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून दीड लाखाच्या ३०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. २० डिसेंबर २०१७ तेलंगणातून बनावट नोटा घेऊन शहरात आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.४२३ जुलै २०१७ ला शहरात दोन हजारांच्या बनावट नोटा चालवणारे रॅकेट उघडकीस आले होते. २७ मे २०१७ रोजी पोलिसांनी सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या व प्रिंटरसह दोघांना अटक केली होती.