देवी रुख्मिणीच्या पालखीचे जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:09 PM2018-06-20T23:09:56+5:302018-06-20T23:10:43+5:30

पंढरपूरला विशेष मान लाभलेल्या विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीच्या पालखीचे बुधवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसातही अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली. ४२४ वर्षांची परंपरा व शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या या सोहळ्याचे आयोजन आ. यशोमती ठाकूर मित्र मंडळाने केले होते.

Welcome to the Goddess Rukmini Palkhi | देवी रुख्मिणीच्या पालखीचे जंगी स्वागत

देवी रुख्मिणीच्या पालखीचे जंगी स्वागत

Next
ठळक मुद्देभर पावसात सर्वपक्षीय उत्स्फूर्त सहभाग यशोमती ठाकूर मित्र मंडळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पंढरपूरला विशेष मान लाभलेल्या विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रुक्मिणीच्या पालखीचे बुधवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसातही अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली. ४२४ वर्षांची परंपरा व शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या या सोहळ्याचे आयोजन आ. यशोमती ठाकूर मित्र मंडळाने केले होते.
राज्यात सर्र्वाधिक प्राचीन व सन १५३४ पासून अविरत सुरू असलेल्या व पंढरपूर येथे देवी रुक्मिणीच्या माहेराची म्हणून विशेष मान असलेल्या या पालखीचे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून १७ जून रोजी पंढरपूर येथील आषाढी सोहळ्याकरिता प्रस्थान झाले. २७ जुलै रोजी पालखी पंढरीला पोहोचणार आहे. बुधवारी जि.प. सदस्य अभिजित बोके व प्रभाकर लव्हाळे यांच्या घरी पालखीची पूजा करण्यात आली. आगमनापूर्वी चौकात आ. यशोमती ठाकूर यांच्यासह उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीचा फेर धरला. यावेळी पदाधिकाºयांनीही ‘हरी ओम विठ्ठला’ या भजनावर ताल धरला. बियाणी चौकात दिंडीचे आगमन होताच पावसाला सुरुवात झाली. तरीही टाळ-मृदंगाचा निनाद व ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषात जंगी स्वागत करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी याठिकाणी सपत्नीक पूजा व आरती केली, तर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते, आ. यशोमती ठाकूर, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, यशोमतींच्या मातोश्री पुष्पलता आदींच्या उपस्थितीत पालखीची पूजा करण्यात आली.
पालखीच्या स्वागतासाठी शहरातील बियाणी चौकात चौकोनी रिंगण करण्यात आले होते. यामधील चौथºयावर पालखी ठेवण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी चौकासह मार्गावर भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. पालखीच्या स्वागताला आ. यशोमती ठाकूर आदींनी सामोरे जाऊन ती खांद्यावर घेऊन चौकात आणली. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीचा जयघोष करण्यात आला व पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, विलास इंगोले, बबलू शेखावत, जयंतराव देशमुख, प्रफुल्ल देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहोड, प्रल्हाद चव्हाण, मुकुंदराव देशमुख, दिलीप काळबांडे, सुरेखा लुंगारे, अलका देशमुख, हरीश मोरे, वैभव वानखडे, शीतल मेटकर, विनोद गुडधे, जितेंद्र ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त अतुल ठाकरे, सदानंद साधू, नामदेवराव अमाळकर आदी उपस्थित होते.
एकवीरा देवी संस्थानमध्ये मुक्काम
देवी रुक्मिणीच्या पालखीचा अंबानगरीत दोन दिवस मुक्काम राहणार आहे. बियाणी चौकातील स्वागत सोहळ्यानंतर पालखी एकवीरा देवी मंदिरात मुक्कामाला रवाना झाली. गुरूवारी रविनगर, छांगाणीनगर, गणेश विहार आदी ठिकाणी स्वागतानंतर भामटी मठात मुक्काम आणि रविवारी बडनेरा येथे पोहोचून अकोला मार्गे दिंडी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
पालखीला पंढरपूरपर्यंत सेवा पुरविण्याचा पदाधिकाऱ्यांचा संकल्प
राज्यात सर्वाधिक प्राचीन असलेल्या पालखीचे वैभव व यानिमित्त संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी सर्वपक्षीय सहभाग असलेली स्वागत समिती गठित करावी व पालखी सोहळ्याचे स्वरूप आणखी व्यापक व्हावे, अशी अपेक्षा आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त करताच, सर्वांनी या सूचनेचे स्वागत केले. सीपींनी पालखी ज्या जिल्ह्यातून जार्ईल, त्या जिल्ह्यतील डीएसपींना पत्र देऊन वारकऱ्यांच्या सुरक्षेची हमी घेतली. जिल्हा परिषदद्वारा पालखीला पंढरपूरपर्यंत कायमस्वरूपी टँकर मिळावा, यासाठी ठराव घेणार असल्याचे सांगितले, तर स्वागत समितीद्वारा रुग्नवाहिका पुरविली जाईल, याची ग्वाही विलास इंगोले यांनी दिली. पालखीमधील वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा पुरविण्यासाठी समितीने संचालकांकडे प्रस्ताव द्यावा, त्याचा पाठपुरावा करतो, याचे आश्वासन सीएस श्यामसुंदर निकम यांनी दिले. गुरुवारी सर्वपक्षीय पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
देखणा, शिस्तबद्ध सोहळा
देवी रुक्मिणीच्या पालखीचे बियाणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. भर पावसात बायपास मार्गावरील चौकात अत्यंत शिस्तबद्धपणे हा सोहळा पार पडला. पालखी पूजनासाठी दोन तासपावेतो जुन्या बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली. सीपी दत्तात्रय मंडलिक याकडे जातीन लक्ष ठेवून होते. माहेश्वरी समाजाच्या महिलांनी उत्स्फूर्त सेवा दिली. अनेक मुस्लीम समाजाचे युवकही भगवा फेटा लावून सोहळ्याला उपस्थित राहिले. सर्व समाज व सर्व पक्षांच्या एकदिलाने रंगलेल्या या सोहळ्याला शहरासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Welcome to the Goddess Rukmini Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.