तीन दिवसांत सर्वेक्षण, महिनाभरात नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:01 PM2018-02-12T23:01:46+5:302018-02-12T23:02:11+5:30

Survey in three days, loss compensation during the month | तीन दिवसांत सर्वेक्षण, महिनाभरात नुकसान भरपाई

तीन दिवसांत सर्वेक्षण, महिनाभरात नुकसान भरपाई

Next
ठळक मुद्देप्रवीण पोटे-पाटील यांचे आदेश

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे तीन दिवसांच्या आत सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा प्रशासनास आठवड्याच्या आत सादर करा, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, लीड बँक मॅनेजर, पोकराचे समन्वयक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा व धारणी या आठ तालुक्यांत गारपिटीसह पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसाने हरभरा, गहू, केळी, संत्रापिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकूण ३८४ गावातील सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी, महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल तीन दिवसांचे आत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, अहवाल करीत असताना बाधित शेतकºयांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळायला हवी, या दृष्टीने अहवाल करावा, असे निर्देश पालकमंत्री पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कृषी संजीवनी योजनेंतर्गत ५३२ गावांची निवड
जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या प्रकल्पाविषयी शेतकºयांना माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी. या प्रकल्पांतर्गत समूह तसेच वैयक्तिक प्रकल्पांसाठी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी अनुक्रमे ७५ टक्के व ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ५३२ गावांची निवड करण्यात आली असून सुमारे ५८ क्लस्टर हे खारपाणपट्ट्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपरोक्त सर्व गावांत पाच टप्प्यांत कामे पूर्णत्वास जाणार आहे. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी शेतकºयांना सहकार्य करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यासाठी भरीव निधी मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत ३० कोटींचा निधी मंजूर
सन २०१७-१८ या वर्षाकरिता सुमारे ३० कोटी निधी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत मंजूर झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या निधीतून प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचयातींनी रस्ता व नाला बांधणीच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुठलेही काम करताना ते गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे होईल याची दक्षता घ्यावी. विकासकामात प्रत्येक पदाधिकाºयांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले.
तालुकानिहाय नुकसान
मोर्शी तालुक्यात ४० गावांमध्ये २,५०४ हेक्टर, वरूड तालुक्यात ६ गावांमध्ये ५० हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात १५४ गावांमध्ये १७,१०३ हेक्टर, अचलपूर तालुक्यात ५७ गावांत ६,३७५ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात १७ गावांत ४३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४,५२५ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ६ गावांमध्ये १६ हेक्टर, तर धारणी तालुक्यात २० गावांमधील ११० हेक्टरमध्ये नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे.

Web Title: Survey in three days, loss compensation during the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.