विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पेपर हिसकावल्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा वडिलांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 01:23 PM2022-04-02T13:23:00+5:302022-04-02T13:48:58+5:30

महाविद्यालयाने आपल्या मुलाला शुल्क भरण्याचा तगादा लावला. परीक्षेदरम्यान पेपरदेखील हिसकला. याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला.

Student commits suicide by strangulation; father blamed college saying he was deprived of paper due to non payment of fees | विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पेपर हिसकावल्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा वडिलांचा आरोप

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पेपर हिसकावल्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा वडिलांचा आरोप

Next

बड़नेरा (अमरावती) : सौ. वसुधाताई देशमुख अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गुरुवारी उशिरा रात्री राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. अनिकेत अशोक निरगुडवार (वय २१, रा. रिधोरा, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

महाविद्यालयाने आपल्या मुलाला शुल्क भरण्याचा तगादा लावला. परीक्षेदरम्यान पेपरदेखील हिसकला. याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने ते आरोप नाकारले आहेत.

अकोला मार्गावरील पाळा फाट्यानजीकच्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात अनिकेत हा बी.टेक. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. गुरुवारी महाविद्यालयातच त्याची परीक्षा होती. गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास साईनगर परिसरातील अनुराधा कॉलनीतील राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. बडनेरा पोलीस ठाण्यातून रात्री दहा वाजता फोनद्वारे मृतक अनिकेतच्या वडिलांना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर उशिरा रात्री त्याचे संपूर्ण कुटुंब बडनेरात पोहोचले. 

असा आहे आक्षेप

माझ्या मुलाचा गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फोन आला होता - महाविद्यालयाचे शुल्क भरा, असा तगादा लावला जात आहे. गुरुवारी त्याचा पेपर हिसकावून घेतला. तो दोन तास महाविद्यालयाच्या बाहेर रडत बसला होता. माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, मला पुढची तारीख द्या, असेदेखील त्याने म्हटले, असा आरोप मृताचे वडील अशोक गुलाबराव निरगुडवार यांनी केला आहे. बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

या घटनेसंदर्भात सविस्तर जबाब नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. अनिकेतच्या वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

- बाबाराव अवचार, पोलीस निरीक्षक, बडनेरा.

अनिकेतच्या मृत्यूमुळे महाविद्यालयात हळहळ व्यक्त होत आहे. त्याने संपूर्ण पेपर सोडविला. महाविद्यालयात फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तगादा लावला जात नाही. याप्रकरणी पोलिसांना आमच्याकडून सहकार्य केले जाईल.

एस. आर. माणिक, प्राचार्य, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय

Web Title: Student commits suicide by strangulation; father blamed college saying he was deprived of paper due to non payment of fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.